Wednesday, April 27, 2022

प्रभू आले मंदिरी...

 

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. अमावस्येच्या रात्री किर्र अंधारातून चाचपडत तो स्मशानाजवळ पोहोचला. अंधारातूनच त्याला एक विचित्र घुत्कार ऐकू आला. क्षणभरच त्याच्या अंगावर भीतीचा शहारा आला. पण काहीही झाले तरी आज काम तडीस न्यायचेच असा निर्धार करून तो पाचोळ्याने भरलेल्या पायवाटेवरून पुढे चालू लागला. ‘या ठिकाणी विजेची व्यवस्था करावयास हवी होती’ असा विचारही त्याच्या मनात आला. ‘वीज असती तर रात्र एवढी भयाण भासली नसती’, असेही तो मनाशी बोलला. पण नुसत्या तारा आणि खांब टाकून वीज मिळत नाही, हे त्याला लक्षात आले, आणि ‘अंधाराची सवय करून घ्यायला हवी’ असे स्वतःस बजावत त्याने स्मशानाबाहेरचे ते झाड गाठून वर पाहिले. ते प्रेत फांदीवर तसेच लटकत होते. काही क्षणातच खदाखदा हसण्याचा आवाज आला, आणि विक्रमादित्य संतापला. कमरेची तलवार सावरत त्याने चाचपडत झाडावर चढण्यास सुरुवात केली. फांदीजवळ पोहोचून त्याने प्रेताच्या मानेभोवतीचा फास सैल केला, आणि प्रेत खांद्यावर टाकून तो खाली उतरला. तितक्यात खांद्यावरच्या प्रेताच्या मुखातून वेताळ बोलू लागला. “विक्रमा, तुझ्या हट्टाचे मला कौतुक वाटते. पण तुझा हेतू साध्य व्हावा असे वाटत असेल, तर मी तुला एक गोष्ट सांगून प्रश्न विचारेन. त्याचे योग्य उत्तर दिलेस तर मी तुझ्यासोबत येईन. आणि उत्तर माहीत असूनही तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्या पायाशी लोळू लागतील.”
विक्रमादित्य काहीच बोलला नाही. डोक्याची शकले होण्यापेक्षा उत्तर देण्याचा प्रयत्न करणे चांगले असा विचार करून त्याने वेताळास संमती दिली, आणि वेताळाने गोष्ट सुरू केली...
“आटपाट नगरीत एका दिवशी मोठी धामधूम सुरू होती. प्रधानाने सेवकांस सांगितले, “करा रे हाकारे, पिटा रे नगारे...” मग सेवक बुचकळ्यात पडले. आज अचानक नगारे पिटण्यासारखे काय झाले, त्यांना काहीच समजेना. मग प्रधान काहीसा संतापला. “तुम्हास ठाऊक नाही? आज महाराज राजवाड्यात परतणार आहेत. त्यांचा विजनवास संपुष्टात येत असून आता ते पुन्हा एकदा नव्या जोमाने राज्यकारभार सुरू करणार आहेत.”
ते ऐकताच काहीसे नाराज झाले. आता आपल्याला काम करावे लागणार की काय अशी भीती त्यांच्या मनात दाटली. प्रधानाच्याही मनात तीच भीती होती, पण शिष्टाचारामुळे विजनवासातून परतणाऱ्या राजाचे स्वागत करणे अपरिहार्यच होते. अखेर सेवकांनी राजवाड्याच्या चहुबाजूंना दवंडी पिटण्यास सुरुवात केली. कॅमेरेवाले बाहेर वाटच पाहात होते. त्यांनी राजवाड्यात गर्दी केली. सेवकांनी दवंडी पिटताच राजवाड्याच्या आसपास वेळ घालविण्यासाठी भटकणारे कर्मचारी जागेवर येऊन बसले. मोठ्या विजनवासानंतर परतणाऱ्या महाराजांस आपण काम करत आहोत असे भासविण्याची तयारी पूर्ण झाली. नगरजनांनी घराबाहेर गुढ्या तोरणे उभारली. चौकाचौकात नगारे वाजत होते. काही सैनिकांनी तर शोभायात्रांचेही आयोजन केले. सर्वत्र उत्सवी वातावरण पसरले होते. ते पाहून प्रधान खुश झाला. तयारी पूर्ण झाल्याची खात्री होताच त्याने महाराजांना निरोप पाठविला. तेव्हा महाराज अंतःपुरात विश्रांती घेत होते. प्रधानाचा निरोप पोहोचताच राजांनी निघण्याची तयारी केली. सेविकेने औक्षण केले, आणि प्रसन्न हसून महाराजांनी राजवाड्याकडे प्रस्थान ठेवले. पुन्हा नगारे धडधडू लागले. तुताऱ्या वाजू लागल्या. उत्सवी वातावरण आणखीनच मोहरून गेले. आणि महाराजांचा यंत्ररथ राजवाड्याच्या प्रवेशद्वारी पोहोचताच प्रसन्न वदनाने हात जोडून महाराज पायउतार झाले. त्यांनी राजवाड्याबाहेरील कुलदैवतास नम्रपणे झुकून प्रणाम केला, आणि राजवाड्याचा फेरफटकाही मारला. नोकरजनांची आस्थेने चौकशी केली. हा दुर्मीळ क्षण टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचा लखलखाट सुरू होता. महाराज प्रसन्न झाले. एका सेवकाशी त्यांनी कामकाजाबाबत जुजबी चर्चा करून कामाची माहीतीही घेतली. ते पाहून सेवकाचा धीर चेपला, आणि त्याने विचारले, “महाराज आपण इतके दिवस कोठे होता. तुमच्या पादुका सिंहासनावर ठेवून इथे राज्यकारभार सुरू होता...” महाराज हसले. “आम्ही विजनवासात होतो”, असे जुजबी उत्तर देऊन ते आपल्या दालनी परतले...”
विक्रमादित्य ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होता. आता वेताळ कोणता प्रश्न विचारणार याचाही त्याला अंदाज आला होता. उत्तर तयारच होते. अपेक्षेप्रमाणे वेताळाने मान वाकडी करून विचारले, “विक्रमा, आता सांग बरे, ही कोणत्या नगरीतील कोणत्या राजाची गोष्ट आहे?” विक्रम हसला. क्षणाचाही विलंब न लावता तो उत्तरला, ‘अरे वेताळा, ही गोष्ट तर आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तुझ्याकडच्या साठा संपला असेल, तर अशा फालतू गोष्टी न विचारता निमूटपणे माझ्यासोबत ये... ही रामचंद्र नावाच्या राजाची गोष्ट आहे...”
वेताळ पुन्हा खदाखदा हसला. “राजा, तुझे उत्तर चुकले”, असे म्हणून त्याने विक्रमाच्या खांद्यावरून पुन्हा झेप घेतली, आणि प्रेतासह तो झाडाच्या फांदीवर लटकू लागला...
-- शीर्षासन. पुण्यनगरी, १५-०४-२२

No comments: