Friday, April 29, 2022

भ्रमयुगाचे भविष्य...


चि. मोरूस 

अनेक आशीर्वाद

अलीकडे आपला पत्रव्यवहार सुरू झाल्यापासून माझ्या मनातील विचारांना भलतीच चालना मिळू लागली असली तरी परवा उदगीरला जे काही घडले तेव्हापासून मनाची काहीशी चलबिचलही सुरू झाली आहे. त्या साहित्य संमेलनात अध्यक्षांनी सांगितले की काळ मोठा कठीण आला आहे. खरे म्हणजे, लेखकाने प्रत्येक काळात तसे सांगायचे असते अशी प्रथा असल्याचे वाचल्यावर थोडे बरेही वाटले. पण काळ जर कठीण आला असेल तर त्यावर काही औषध शोधले पाहिजे असे मला वाटू लागले, आणि मी विचार करू लागलो. आता सल्ले देणे बंद करायचे मी ठरविले असून, कोणाचे सल्लेही न स्वीकारता आपले निर्णय आपणच घ्यावेत असा माझा मानस आहे. ते काहीसे कठीण आहे याची कल्पना असल्याने, त्यावर काय उपाय करावा असा विचार करताना मला जे काही सुचले ते तुला सांगावे असे वाटते.

मोरू, आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे ते आधीच जाणून घेऊन त्यानुसार पुढच्या दिवसाची घडी बसविण्याची सवय ठेवावी असे शेजारच्या अण्णांनी सांगितल्यावर, ते कसे करावे असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर हसून त्यांनी वर्तमानपत्राची घडी उलगडून एका कोपऱ्यावर बोट ठेवल्यानंतर मी बारकाईने तेथे पाहिले असता, राशीभविष्य असा मथळा दिसल्यावर मी उत्सुकतेने वाचून काढले. अर्थात मी कोणत्या राशीचा ते मला अजूनही नक्की ठाऊक नसल्याने मी काहीसा भ्रमितही झालो, आणि सध्या आपण सारे भ्रमयुगात वावरत आहोत, याची आठवण झाली. भ्रमयुगातून सावरण्यासाठी भविष्याची घडी अगोदरच नीट बसवावी असे मी ठरविले असून, त्याआधी भविष्याची पडताळणी करण्याचा प्रयोगही करून पाहिला. तो नेमका जमल्याने आता मी दररोज तसेच करावयाचे ठरविले आहे.

तर मोरू, पहिल्या दिवशी मलाकमी पडू नका, आपले काम साधून घ्या, त्यासाठी लेकी बोले सुने लागे करावे लागेल असा सल्ला मिळाला. पण त्या दिवशी उशीर झालेला असल्याने उरलेल्या दिवसाचा वेळच कमी पडला. त्यामुळे ते भविष्य फुकट गेले. दुसऱ्या दिवशी मात्र, सकाळीच भविष्य पाहिले, आणि वाद टाळा, कौटुंबिक कटकटींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा सल्ला मिळाला असता, दिवसभर मी घराबाहेर राहिलो. त्यामुळे वाद टाळता येतील असे वाटल्याने संध्याकाळी उशिरा घरी परतल्यावर दिवसभर बाहेर काय करत होता, म्हणून घरात आगपाखड झालीच, आणि वादही झाला. त्यामुळे भविष्य खरे ठरते असे लक्षात आले. मग भविष्य सकाळी न पाहता, रात्री निजायच्या वेळी वाचून दिवसभरात त्यानुसार काय काय घडले त्याची मी पडताळणी घेतली. बऱ्याचदा ते खरेच निघते असे लक्षात येऊ लागल्यावर पुन्हा सकाळी भविष्य पाहण्याचे ठरविले. भ्रमयुगातून स्वतःस सुरक्षित ठेवायचे असेल, तर भविष्याची नेमकी दिशा आपल्याला ठाऊक असली पाहिजे, असा निष्कर्ष मी काढला आहे. त्यामुळे, रोजचे राशिभविष्य सकाळीच वाचून घ्यावे असे आता माझे ठाम मत आहे. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजेभविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर आपले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्यविद्येवर आपला विश्वास बसतोआणि दुसरे म्हणजेआपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने त्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतातत्याचे वाईट वाटत नाही. उलटतसे घडणार हे भविष्यातच लिहिलेले असल्याने जे घडले ते तसे घडणारच असल्याने आपण त्या टाळूच शकलो नसतो ही भावना दृढ असल्याने परिणाम स्वीकारण्याचे धाडस प्राप्त होते, व जे घडले त्याविषयी संभ्रम रहात नाही.

मोरू, तरीही, सावधगिरी बाळगण्याचे मी ठरविले आहे. वैद्यकीय उपचाराबाबत आपण सेकंड ओपीनियन घेतो, त्याप्रमाणे अन्य वर्तमानपत्रातील आपल्या राशीचे भविष्यही समोर ठेवून दिवसाच्या वागण्याची त्या भविष्यानुसार आखणी करणे आणखी चांगले असे माझे स्वत:चे मत आहे. पण माझ्या मते भ्रमयुगातून बाहेर पडावयाचे असेल, तर एकमेकांच्या हातात हात घालूनच भविष्याची वाटचाल करणे चांगले. या पत्रात तुला कोणताच सल्ला दिला नसल्याबद्दल तुला बरे वाटले असेल याची खात्री वाटते. पण तुझे ‘सेकंड ओपीनियन’ विचारात घ्यावे असा विचार आहे, हे लक्षात घे.

सल्ला न देता तुझे मत कळवशील याची खात्री आहे. कळावे,

तुझा

दादू 

 


No comments: