Monday, July 14, 2008

प्रासंगिक!

बातमीदारीच्या स्पर्धेमुळे बातमीमागे पळताना बातमीच्या विश्‍वासार्हतेला प्रश्‍नचिन्ह लागते आणि नवनव्या चॅनेल्समधील चढाओढीमुळे मीडियाचीच विश्‍वासार्हता संपुष्टात आल्याची भावना समाजात व्यक्त होते, हे खरे असले, तरी काहीसे खेदजनक आहे. वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमे हा समाजमनाचा आरसा आहे. साहजिकच, समाजातील घडामोडींचेच प्रतिबिंब त्यात अपरिहार्य आहे. असे असले तरी, फक्त चांगलेचांगले तेवढे त्यामध्ये उमटत राहावे, आणि "विदारक' मात्र समाजासमोर येऊ नये, अशी सर्वसाधारण धारणा दिसते. पण समाजातील अशा घटनांना प्रसारमाध्यमांत स्थान मिळणे ही एक गरज आहे, म्हणून एक स्वानुभव मुद्दाम नमूद करावासा वाटतो.
"चॉकलेटचे आमीष दाखवून बालिकेवर बलात्कार' अशी बातमी एकदा प्रसिद्ध झाली, आणि नेहमी आपल्या सांस्कृतिक उपक्रमांना प्रसिद्धी मिळावी यासाठी प्रामाणिक धडपड करणारे एक मित्र तातडीने त्या वृत्तपत्राच्या कार्यालयातील माझ्या टेबलसमोर येऊन थडकले. त्या अंकाची त्या बातमीचे पान सहज दिसेल अशी घडी माझ्यासमोर आदळून काही न बोलता ते माझ्याकडे पाहात होते. त्यांच्या डोळ्यात उमटलेली रागाची छटा स्पष्ट दिसत होती.
मिनिटभर काहीच न बोलता मी त्यांना स्वस्थ होऊ दिले, आणि बाजूचीच एक खुर्ची ओढून त्यांना बसावयास सांगत "काय झाले' असे विचारले.
"हे काय आहे?'... आपल्या आवाजातला राग अजिबात न आवरता बातमीवर जोरजोरात बोट आदळत त्यांनी मला विचारलं. मी शांतच.
'अशा बातम्या छापायला तुमच्याकडे जागा असते. आणि आमच्या, विधायक, समाजाला काही विचार देणाऱ्या, समाजात चांगुलपणा पेरणाऱ्या बातम्या छापायला तुमच्याकडे जागा नसते. त्यांच्याकडे बघायलाही वेळ नसतो...' रागारागाने ते बोलत होते.
त्यांचं बोलणं संपलं, आणि मी त्यांच्यासाठी चहा मागवला. त्यांचा राग रास्त होता, हे मलाही पटलं होतं. वेगवेगळ्या विषयांवर विचार व्यक्त करण्यासाठी "हाईड पार्क'च्या धर्तीवर मुंबईत ठिकठिकाणी "कट्टा' सुरू करणाऱ्या या "साहित्यिक चळवळ्या'विषयी आम्हाला कौतुक होतं. त्याच्या उपक्रमांमधला तोचतोचपणा लक्षात घेऊनही, ती चळवळ सर्वत्र पसरावी यासाठी आम्ही सहकार्यही करत होतो. पण आजच्या "त्या' बातमीएवढी जागा आपल्या उपक्रमाला कधीच मिळाली नाही, अशी त्याची तक्रार मात्र मला पटली नाही.
या एका बातमीमुळे, आपल्या लहानग्यांना अनोळखी माणसाबरोबर घराबाहेर पाठवू नये, अशा एखाद्या व्यक्तीने दिलेला खाऊ घेऊ नये, हा "धडा' आईबापांना मिळाला असेल. अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्हेगारीच्या असंख्य बातम्या वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांना जागा मिळाली नाही, आणि फक्त विधायक बातम्यांना प्रसिद्धी मिळाली, तर अशा घटनांविषयी समाज अनभिज्ञच राहील, आणि ‘सारे काही छान आहे’, अशीच समजूत समाजात फोफावेल, असे सांगून मी त्याला त्या भडक बातमीमागची वृत्तपत्रीय भावना समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
चहा संपवून तो ऊठला, तेव्हा त्याने हातातल्या घडीवरची ती बातमी पुन्हा वाचून काढली होती. माझ्याकडे बघून त्यानं मान डोलावली, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या...
त्या चळवळ्या मित्राचा राग केव्हाच निवळला होता.
या बातम्या लोकजागृतीच करतात, आणि ही जागृतीच आजच्या काळात आवश्‍यक आहे, यावर आमचे एकमत झाले होते.

1 comment:

Anonymous said...

माणसा,
(मुद्दामच तुम्हांस माणसा असं म्हटलंय. हल्ली ही जमात दुर्मिळच झालीय!)
छान लिहिलंयत. आवडलं.
चांगली शैली आहे. नेमकं टिपायचं भान आहे.
लिहिते राहा...
- विसोबा खेचर