Saturday, June 6, 2009

`भाऊसंस्कृती'!

...एक नवी संस्कृती निवडणुकीच्या माहोलात जोर धरते आहे.
निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला आहे... गावोगावी नवे नेते उदयाला येत आहेत.
नेता, आमदार, खासदार जणू आपल्या खिशात आहेत, अशा थाटात हे नवे नेते वागतात आणि गावातल्या प्रचाराची, खर्चाची आणि गाड्याघोड्यांची, झेंडे-टोप्यांची सगळी व्यवस्था आपोआपच त्यांच्याकडे येते.
प्रचारासाठी गावात आलेला उमेदवार, सोबतचा नेता, पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी जवळीक साधत गावावर इम्प्रेशन मारणारी ही संस्कृती नेत्याला आणि उमेदवाराला टाळताच येत नाही.
`सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशा अवघड स्थितीत अखेर नेते आणि उमेदवार या संस्कृतीपुढे गुडघे टेकतात.
`कार्यकर्त्यां'चा `नेता' होण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा, म्हणजे ही संस्कृती...
उमेदवार, खासदार किंवा नेता हा या संस्कृतीचा `भाऊ' असतो. त्यांच्यापुढे `भाऊ, भाऊ' म्हणत घुटमळणे हा या नवसंस्कृतीचा गुणधर्म म्हणून ही `भाऊसंस्कृती.'
अंगावर खादीचे कडक कपडे, डोळ्यावर भारी गॉगल, पायात पांढऱ्या चपला आणि गळ्याभोवती झेंड्याच्या रंगाचा पट्टा... एवढं भांडवल या संस्कृतीच्या संवर्धनासाठी पुरेसं असतं.
मग भाऊसंस्कृती `कामाला' लागते.
गावात आमदार, खासदार प्रचाराला येणार असला, की हे नवोदित नेते त्याआधीच ठिकाणावर हजर होतात. नेत्याचं आगमन झालं, की हार घालण्यासाठी, स्वागतासाठी चढाओढ करणाऱ्या गर्दीच्या नियोजनाचं काम ते स्वतःहून हातात घेतात.
भाऊ येऊन बसले, की यांच्या खिशातला मोबाईल बाहेर निघतो. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा नंबर फिरवला जातो. पलीकडून अधिकाऱ्यानं फोन उचलला, की याचा आवाज चढतो.
`जरा भाऊंशी बोला...' असं सांगून आपला मोबाईल तो भाऊंच्या हातात देतो.
भाऊ गोंधळतात... कुणाशी बोलायचंय, काय बोलायचंय, काहीच कल्पना नसते. मग केविलवाणेपणाने भाऊ याच्याकडेच बघतात. मग हा भाऊंच्या कानाला लागतो.
आजूबाजूची गर्दी हे न्याहाळत असते. भाऊंशी याची जवळीक असल्याचा एक पुरावा आपोआपच गर्दीला मिळतो.
आणि हा नेता होतो!
पलीकडचा अधिकारी, साहेबाच्या `आदेशा'ची वाट बघत फोन कानाला लावून ताटकळत असतो. यानं सांगितलेलं ऐकलं न ऐकलं करत भाऊ त्या अधिकाऱ्याला फर्मान सोडतात आणि अधिकाऱ्यासोबतचं पुढचं बोलणं हाच करतो.
याच्या फोनवरून प्रत्यक्ष साहेबांनीच आदेश दिलेले असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी यालाही साहेब म्हणून स्वीकारतात...
आणि हा नेता होतो!
... सकाळी भाऊंना दौऱ्यावर निघायचं असतं; पण बंगल्याबाहेर `जनते'ची गर्दी असते.
हाही बंगल्यावर पोचतो. दोन-चार वेळा उगीचच आतबाहेर करतो.
भाऊ घाईगडबडीत असतात. घरातला फोन खणखणत असतो. त्याच गडबडीत ते फोनवर कुणाकुणाला काही काही सांगत असतात. त्यातले काहीबाही याच्याही कानावर पडते.
मग बाहेर आल्यावर, त्यातलं काहीतरी सांगून हाच गर्दीवर इंप्रेशन मारतो. आपण भाऊंना अंतर्बाह्य ओळखतो, असा त्याचा तेव्हा चेहरा असतो...
आणि हाही नेता होतो!
भाऊसंस्कृतीच्या या उदयामुळे नवनेतृत्वाची दारे खुली झाली आणि अनेकांचे दरवाजे बंद झाले.
भाऊसंस्कृतीमुळे उदयाला आलेल्या नव्या नेत्यांचा सांभाळ करण्यासाठी, त्यांना खूष ठेवण्यासाठी जुन्या नेत्यांना, भाऊंना कसरती करण्याची वेळ आली.
या नव्या संस्कृतीच्या आपापसातील स्पर्धेमुळे, सरकारी समित्यांवर कुणाची नियुक्ती करावी, ही समस्या भाऊंपुढे उभी राहिली आणि त्या नियुक्त्याच रखडत गेल्या. निवडणुका आल्या, जुन्या सरकारचा कालावधी संपायची वेळ आली, तरी समित्याच अस्तित्वात आल्या नाहीत.
...भाऊसंस्कृतीचा उदय असो!
या संस्कृतीतून उदयाला आलेल्या नेत्याला जपण्यासाठी, विहिरीच्या लाभार्थींच्या याद्या बदलाव्या लागतात. पॅकेजचे लाभार्थी बदलतात. अकोल्यात पाच वर्षांत विहिरींच्या लाभार्थींची अंतिम यादी झालीच नाही... कारण भाऊसंस्कृती!
अकोल्यात ठेकेदारीचीही मक्तेदारी झाली... ठराविक लोकांचीच कामं सरकारी अधिकारी सर्टिफाय करतो. भाऊसंस्कृतीमुळे...!
पूर्वी, जेव्हा ही संस्कृती फोफावली नव्हती, तेव्हा उन्हाळ्यात रस्त्यावरचं डांबर वितळून वर यायचं.
आता डांबर तरी दिसतं?
कारण काय? `भाऊसंस्कृती'!
रेशन दुकानाचं वाटप का रखडलं? समित्या का रखडल्या? योजनेचे लाभार्थी का बदलले?
सगळ्याचं उत्तर एकच `भाऊसंस्कृती'!
ही संस्कृती आता आणखीनच फोफावली आहे. नवे नेते जन्म घेताहेत.
... भाऊसंस्कृतीचा विजय असो...!

No comments: