Saturday, June 27, 2009

सेतू झाला रे सागरी...

महाराष्ट्राचे आणि समुद्राचे एक अनोखे भौगोलिक नाते आहे. मुंबईचे तर याच समुद्राशी आणखीनच जवळचे नाते आहे, कारण मुंबई फक्त समुद्राच्या किनाऱ्याचे एक महानगर नाही, तर बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या शहर जिल्ह्यालाही समुद्राने वेढले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर वळणांवरचा रात्रीचा झगमगाट प्रत्येकालाच भुरळ घालतो, म्हणूनच मरीन ड्राईव्हचा राणीचा रत्नजडित कंठहार हे देश-विदेशातील पर्यटकांचे आणि पोटापाण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचे पहिले आकर्षण असते. उत्तर भारतातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईवर आदळणाऱ्या लोंढ्यांनी कधी समुद्र पाहिलेलाच नसतो. म्हणूनच मुंबईत पाऊल ठेवणाऱ्या उत्तर भारतीयांचे कान समुद्राची गाज ऐकण्यासाठी आसुसलेले असतात आणि नोकरीधंद्यात जम बसला नाही, तर याच समुद्राच्या सुंदर चौपाट्या त्यांना चाट आणि भेलपुरी किंवा अगदीच काही नाही, तर शेंगदाणे विकून गुजराण करण्याचाही मार्ग दाखवतात. मग जुन्या मुंबईकरांबरोबरच, या नवख्यांचेही समुद्राशी नाते जडून जाते.... आद्य मुंबईकर म्हणून ओळखला जाणारा कोळी समाज याच समुद्राच्या विश्‍वासावर इथे स्थिरावला आणि मुंबईची लहान लहान गावठाणे बघता बघता इतिहासजमा होत महानगरात सामावत गेली. म्हणून समुद्र हे मुंबईचे सौंदर्य आहे आणि साधनही आहे.
.... आता या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. मरीन ड्राईव्हच्या क्वीन्स नेकलेसपेक्षाही झगमगणारा, मुंबईचा इतिहास आणि भविष्य यांना जोडणारा एक आगळा सेतू येत्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून मुंबईच्या वैभवात भर घालणार आहे. मुंबई आणि समुद्राचे नाते आता आणखी घट्ट होणार आहे. आजवर मुंबईला केवळ किनाऱ्यापलीकडून न्याहाळणारा समुद्र आता आपल्या अंगाखांद्यावरही खेळवणार आहे. अभियांत्रिकीचे एक नवे आश्‍चर्य मानले जावे, असा वरळी-वांद्रे सागरी सेतू तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे नाते जोडायला सज्ज झाला आहे आणि मुंबईच्या सर्वांत भीषण समस्येवरचा- वाहतूक कोंडीवरचा तोडगाही ठरणार आहे.


येत्या 30 जूनला या सागरी सेतूचे उद्‌घाटन होईल आणि मुंबईच्या पश्‍चिम उपनगरांना जोडणारा एकमेव माहीम कॉजवेचा रस्ता दिलासा मिळाल्याने काहीसा सुखावेल. दररोज जवळपास सव्वा लाख वाहनांची अहोरात्र ये-जा पाहणारा हा एकमेव रस्ता वांद्य्राच्या समुद्रावरून किनाऱ्यावर आदळणाऱ्या एखाद्या लाटेनं दिलेल्या सागरी सेतूच्या प्रगतीच्या बातम्यांनी दिवसागणिक सुखावत गेला असेल... आता हा सेतू साकारलाय, हे "ऑफिशियल' सत्य सगळीकडेच झालेय... म्हणून, मुंबईच्या इतिहासातून वर्तमानापर्यंतच्या बदलांचा साक्षीदार असलेल्या या स्वामी विवेकानंद मार्गालाही त्या दिवसाची ओढ लागली असेल.... येत्या दोन-चार दिवसांत या मार्गाच्या दुतर्फा बांबूंचे बॅरिकेड्‌स लागतील... पोलिसांची वर्दळ वाढेल.... रस्त्यावरून अहोरात्र धावणाऱ्या काही वाहनांच्या वर्षानुवर्षांच्या सहवासालाला आता आपण मुकणार, या जाणिवेने हा रस्ता मूकपणे व्याकूळदेखील होईल, पण दुसऱ्याच क्षणाला तो सुखावूनही जाईल. कारण त्याने मुंबईच्या प्रगतीच्या प्रत्येक पावलाच्या साक्षीदाराची भूमिका निभावलेली आहे. उपनगरातल्या वांद्य्राचं शहरातल्या वरळीशी आणखी जवळचे नाते जोडणाऱ्या या सेतूचा मग त्यालाही अभिमान वाटेल... जवळपास प्रत्येक मुंबईकराला केवळ वासाने ओळखीची असलेली माहीमची खाडीदेखील या नव्या आश्‍चर्याच्या सहवासाने आनंदून जाईल....
गेल्या काही वर्षांपासून स्वामी विवेकानंद मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाचे डोळे समुद्रात आकार घेणाऱ्या त्या अवाढव्य सेतूच्या प्रगतीकडे लागलेले होते. जवळपास 50 हजार आफ्रिकन हत्तीच्या वजनाएवढा अवाढव्य आणि केबलच्या ताणामुळे कित्येक टन वजन सहज पेलविण्याची क्षमता असलेल्या या सेतूच्या उदरात, अवघ्या पृथ्वीला विळखा घालू शकेल इतक्‍या लांबीच्या लोखंडी तारांचे जाळे सामावलेले आहे, असं सांगतात, कुतुबमिनारच्या 63 पट उंचीच्या या पुलाच्या उभारणीसाठी 90 हजार टन सिमेंटचा वापर झाला आहे.
माहीम कॉजवेवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात रहदारीची कोंडी अगदी ठरलेलीच असल्याने वरळी आणि वांद्रे हे आठ किलोमीटरचे अंतर कापायला सव्वातासाचा वेळही ठरलेलाच. पण आता, या सागरी सेतूने हे समीकरण संपवलेय. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे मुंबईला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आहे. वाहनांमधून सोडल्या जाणाऱ्या कार्बनयुक्त धुराचा विळखा मुंबईला पडला आहे आणि प्रदूषणामुळे आरोग्याच्याही समस्यांनी मुंबईला वेढले आहे. सव्वातासाची वाहतूक सात मिनिटांपर्यंत खाली आणणारा हा सेतू मुंबईच्या आरोग्यासाठीही एक वरदान ठरू शकेल. कारण एकाच गतीने समुद्रावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, या वाहतूक कोंडीमुळे होणारी मौल्यवान इंधनाची हकनाक नासाडीही संपुष्टात येणार आहे. प्रवासाचा वेळ एक दशांशाइतका खाली आणणाऱ्या या सागरी सेतूमुळे दर वर्षी 100 कोटी रुपयांची इंधनबचत होईल, असा अंदाज या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतात. खरे तर, ठरल्या वेळात या सेतूची उभारणी पूर्ण असती, तर सुमारे 350 कोटी रुपयांची बचतही झाली असती. पण वेगवेगळ्या पर्यावरणविषयात समस्या आणि त्यावर न्याय मिळवण्यासाठी पर्यावरणाचा आग्रह धरणाऱ्यांनी केलेला पाठपुरावा यांमुळे या सेतूचे कामही अपेक्षेपेक्षा सुमारे पाच वर्षांनी लांबले आणि मुळापासून कराव्या लागलेल्या रचनात्मक बदलांमुळे खर्चदेखील वाढला.... मुळात 1306 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प या बदलांमुळे 1650 कोटींवर गेला. पण या सगळ्या समस्यांवर मात करून हा सेतू आता साकारलाय...
या सागरी सेतूने मुंबापुरीला एक नवे वैभव आणि आगळे महत्त्व मिळवून दिले आहे, हे खरे असले, तरी काही समस्यादेखील उद्‌भवण्याची शंका व्यक्त केली जाते. मुळात, हा सागरी सेतू आठ पदरी आहे. म्हणजे, या सेतूवरून एका वेळी ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या स्वामी विवेकानंद मार्ग किंवा वरळीच्या रस्त्यापेक्षा कितीतरी जास्त असेल, हे स्पष्ट आहे. पण एकाच वेळी या सेतूवर प्रवेश करणारी वाहने जेव्हा कोणत्याही बाजूने बाहेर पडतील आणि पुन्हा रस्त्यावर मिळतील, तेव्हा हे रस्ते मात्र, जुनेच तीन-चार पदरी असतील. त्यातही वांद्रे आणि वरळी या दोन्ही ठिकाणी या सेतूच्या मुखाशीच असलेल्या वस्तीमुळे, अनेक जागी रस्त्यांवरच वाहने उभी केली जात असल्याने हे रस्ते आणखीनच चिंचोळे झाले आहेत. एकदम आठ पदरी रस्त्यावरून या चिंचोळ्या रस्त्यांवर थडकणाऱ्या वाहनांना सामावून घेण्याची या रस्त्यांची क्षमता तोकडी पडेल आणि सागरी सेतूच्या तोंडाशीच वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळेल, अशीही भीती काही जण व्यक्त करतात.
पण ही समस्या काही फारशी गंभीर नाही, कारण मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उत्तरे शोधण्यात गेल्या काही वर्षांपासून इथले वाहतूकतज्ज्ञ वाकबगार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फ्लायओव्हर उभारले गेले. वाहतुकीची समस्या सुटेल. प्रवासाला लागणारा वेळ वाचेल आणि इंधनातही बचत होईल, असा त्यामागचा प्रामाणिक तिहेरी हेतू होता. पण उड्डाणपूल झाले आणि मुंबईतील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. साहजिकच, रस्ते अपुरे पडू लागले आणि कोंडीची समस्या कायमच राहिली. आता सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीतल्या नॅनो गाड्या रस्त्यावर येतील, आणि पुन्हा एकदा हीच समस्या निर्माण होईल. तेव्हा वरळी-वांद्रे सागरी सेतू या समस्येवरचा तोडगा ठरू शकेल का, हाही शंकास्पद मुद्दा आहे. कारण, या सेतूच्या उभारणीसाठी झालेला कोट्यवधींचा खर्च वसूल करण्यासाठी या सेतूचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवरच टोल बसविला जाणार आहे. टोल प्रत्येकालाच परवडेल अशी स्थिती नाही. टोलचे दर निश्‍चित झालेले नाहीत. पण एका खेपेसाठी 50 ते 75 रुपये टोल आकारला जाईल, असे सांगितले जाते. साहजिकच, ज्यांच्या खिशाला हा आकार परवडेल आणि ज्यांना वरळी-वांद्रे प्रवासातील नऊ दशांश वेळ वाचवायची खरी आवश्‍यकता असेल अशा लोकांकरिताच हा सेतू वापरात राहील आणि सर्वसामान्य वाहनचालक मात्र, जुन्याच स्वामी विवेकानंद मार्गावरून ये-जा करत या सेतूचे वैभव न्याहाळत राहतील.
पण ही स्थिती काही फार काळ राहणार नाही. कारण अशा समस्यांवरही तोडगा काढणे ही वाढत्या आणि वाहत्या मुंबईची गरजच असेल. काही वर्षानंतर, याच सेतूवरून सगळी मुंबई सागराशी लगट करत धावू लागेल...
माहीमच्या खाडीवरून जाणाऱ्या स्वामी विवेकानंद मार्गाला कदाचित हा भविष्यकाळदेखील पाहावा लागेल....
(sakal, June 27, 2009)

No comments: