Monday, June 1, 2009

"बीपीएल' आणि "इलेक्शन'

..
भंडारा, ता. 30 मार्च 09
....
"तुला कोणता पंतप्रधान आवडेल?... मनमोहनसिंग की अडवानी?'
वजन करून तिनं कागदात बांधलेली द्राक्षाची पुडी हातात घेत मी तिला विचारलं आणि ती चमकली.
असला प्रश्न तिला अनपेक्षित असावा. कदाचित हा प्रश्न विचारणारा मीच पहिला असावा.
मिनिटभर ती काहीच बोलली नाही. ती खूप विचार करतेय, हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
"मला बीपीएल कार्ड कोण काढून द्येल?'... काही वेळानंतर तिनं मलाच उलटा प्रश्न केला.
आता मी गोंधळलो होतो. तिच्या प्रश्नाचा संदर्भ मला समजत नव्हता.
"आमाला काय करायचंय पंतप्रधान... आमचं कार्ड अजून मिळालेलं नाही. किती खेपा घातल्या, किती अर्ज केले. अजून काय बी नाही.'
"तुमचे त्ये मनमोहनसिंग काय आणि अडवानी काय... मला बीपीएलचं कार्ड आणून देनार हाय?' तिनं ठामपणानं तोच प्रश्žन पुन्हा विचारला.
...भंडारा जिल्ह्यात पवनी नावाचं एक गाव आहे. तिथल्या रस्त्यावरच्या एका एसटीच्या शेडजवळ नूतन अंबाडे नावाची ही महिला दिवसभर द्राक्ष विकते. त्यातून होणारी कमाई, हे तिचं त्या दिवसाचं चरितार्थाचं साधन.
मी बस थांब्याच्या आसपास रेंगाळत होतो. द्राक्षाच्या टोपलीवर घोंघावणाऱ्या माश्या एका छोट्याशा फांदीनं हाकलत ती रस्त्याच्या कडेला बसली होती.

निवडणुकीविषयी तिला काय वाटतं ते विचारावं म्हणून मी तिथं गेलो. काही तरी बोलायच्या अगोदर थोडीशी द्राक्षं घेतली आणि पैसे देतादेता तिच्याशी बोलू लागलो.
विदर्भात अजून गावोगावी निवडणुकांचा माहोल सुरू झालेला नाही. लहान गावांमध्ये मात्र अजूनही निवडणुकीचे वारे पोचलेलेच नाहीत.
पवनीच्या रस्त्यावर मला हाच अनुभव आला. सकाळी दहाला ही महिला पाच-दहा किलो द्राक्षांची टोपली घेऊन विकायला बसते. सायंकाळपर्यंत एक-दोन किलो द्राक्ष उरतातच. दुसऱ्या दिवशी ती मातीमोलानं विकायची.
निवडणुकीचा विषय काढला तेव्हा क्षणभर तिच्या कपाळावर आठी पडली.
असल्या विषयावर बोलण्यात तिला रस दिसत नव्हता. समोरच्या द्राक्षाच्या टोपलीकडे टक लावून पाहात ती नाईलाजानं माझ्याशी बोलत होती.
"साहेब, बीपीएलचं कार्ड मला अजून मिळालं नाहीये. म्हणून निराधारीचे पैसेबी मिळत न्हाईत...'
तिनं आणखी एक समस्या मांडली.
"पण तू कुठे निराधार आहेस..? तू तर व्यापार करतेस, पैसे मिळवतेयस... तुला कशाला हवेत निराधारीचे पैसे?' मी विचारलं.
"निराधारी'चे पैसे म्हणजे सरकारच्या "निराधार योजने'तून मिळणारी मदत. निराधार लोकांना उदरनिर्वाह करता यावा म्हणून.
सरकारची मदत योजना आहे. त्यासाठीही तिला अर्ज करायचा होता; पण त्याआधी आपण दारिद्य्ररेषेखालील उत्पन्न गटातले आहोत, हे तिला सिद्ध करावं लागणार. त्यासाठी तिचं नाव त्या यादीत यायला हवं होतं. मग तिला तसं रेशनकार्ड काढता येणार होतं.
"निराधारी'चा मुद्दा त्यानंतरचा... त्याकडे डोळे लावून ती किती तरी महिने ही व्यथा उगाळत असावी, हे तिच्या शब्दाशब्दांतून जाणवत होतं.
"साहेब, माझी आई लहानपणीच वारली. बाप आधीच कवातरी गेला. तवापास्न मी एकटीच हाये... मला कुणाचाच आधार नव्हता. माझी मीच लहानीची मोठी झाले... आता आपल्या हिमतीवर धंदा करतेय; पण काय कमाई न्हाई... कसंतरी चालवतेय... मग मला नको निराधारीचे पैसे...?' तिनं मला प्रश्न केला.
"नाव काय तुझं?' मी विचारलं.
"आमी अंबाडे'... तिच्या सुरात क्षणात अभिमान उमटला.
"नाव... तुझं पहिलं नाव काय?' मी विचारलं.
"नूतन...' खाली मान घालत ती उत्तरली.
"पण तुला बीपीएलचं कार्ड मिळालं नाही, म्हणून तू मतदान करणार नाहीस?' मी तिला आणखी डिवचलं.
"करणार कुणाला तरी' ती म्हणाली आणि मान वळवून दुसरीकडे पाहू लागली.
तिला या विषयावर बहुधा बोलायचंच नव्हतं.
बाजूलाच बसस्टॉपच्या शेडमध्ये पंधरा-वीस शाळकरी मुली बसल्या होत्या. दोन-चार जणी पुढं येऊन आमच्यातला संवाद ऐकत होत्या.
मी त्यांच्याशी बोलू लागलो.
पवनीपासून सहा-सात किलोमीटरवरच्या या मुली, रोज बसने शाळेत येतात. आता त्या परतीच्या बसची वाट बघत थांबल्या होत्या.
"इलेक्शन कधी आहे?' मी एकीला विचारलं. तिचा चेहरा कोराच.
"अगं, इलेक्शन म्हणजे मतदान...' तेवढ्यात नूतन तिच्या मदतीला धावून आली.
त्या शाळकरी मुलीला "इलेक्शन' माहीतच नव्हतं.
नूतननं तिला समजावून सांगितल्यावर तिनं मान हलवली.
"हां हां, मतदान होनार हाय...' ती म्हणाली.
"कोण उमेदवार आहेत तुमच्याकडे? मी विचारलं आणि पुन्हा तिचा चेहरा कोरा झाला. मी बाजूच्या सगळ्या मुलींकडे बघितलं. सगळ्यांचेच चेहरे कोरे होते.
"माहीत नाही. आसन कोनतरी...' एकीनं उत्तर दिलं.
मी तिथून निघालो.
भंडाऱ्यात भेटलेल्या प्रत्येकाला निवडणुकीच्या राजकारणाचे सगळे रंग पक्के माहीत होते. पवनीत इलेक्शनचा कुठलाच रंग पोचला नव्हता; पण दोन-चार दिवसांतच सगळे रंग तिथंही पसरणार आहेत.
मी वळलो आणि स्टॅंडच्या दिशेने चालू लागलो.
बाजूलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचं निवडणूक कार्यालय दिसत होतं.

No comments: