Friday, June 19, 2009

एक धागा...

लाल सिग्नल पडल्यानंतरही त्या गाडीने सुसाट वेगात रस्ता ओलांडला आणि पाठोपाठ एक जोरदार शिट्टी घुमली. करकचून ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या कडेला आली, आणि एका क्षणात थांबली. मुंबईत अजूनही ट्रॅफिक पोलिसाच्या शिट्टीचा दबदबा आहे. पोलिसानं अडवल्यानंतर काय केलं म्हणजे रहदारीच्या नियमांतून "सुटका' होते, याचा अनुभव मुंबईतल्या जवळपास प्रत्येक वाहनधारकाला कधी ना कधी आलेला असतो. म्हणूनच, शिट्टी वाजली, की थांबायचं, ही "शिस्त' मुंबईच्या वाहनधारकांनी स्वतःहून अंगी बाणवली आहे.

म्हणूनच, या गाडीचा वेगही शिट्टीच्या आवाजानं रोखला गेला. गाडी थांबली आणि लपल्यासारखा रस्त्याकडेच्या आडोशाला उभा राहिलेला एक ट्रॅफिक हवालदार झपाट्यानं पुढे आला. कुठल्यातरी "एअरलाईन्स'च्या केटरिंग सर्व्हिसची ती व्हॅन होती. वेळेत विमानतळ गाठायचा म्हणून बहुधा भरधाव चालली होती. हवालदार जवळ येताच गाडीच्या डाव्या खिडकीतून एक हात पुढे आला आणि हवालदाराचे दोन्ही हात पुढे झाले...
असं काही दिसलं, की सामान्य माणसांचं कुतूहल नेहमीच जागं होतं. त्या गाडीच्या पाठोपाठ मी त्याच दिशेनं जात होतो. माझंही कुतूहल जागं झालं आणि वेगही मंदावला. माझे डोळे आता गाडीच्या डाव्या खिडकीला खेटून उभ्या असलेल्या हवालदाराकडे लागले होते. खिडकीतून थंडगार पाण्याच्या तीनचार बाटल्या बाहेर आल्या होत्या. हवालदारानं त्या बाटल्या हातात घेतल्या आणि तो मागे वळला. गाडी पुढे सरकली आणि आधीच्याच वेगानं विमानतळाच्या दिशेने निघाली.
हवालदार पुन्हा त्याच्या नेहमीच्या आडोशाला जाऊन बसला होता. शातंपणे त्यानं हातातल्या बाटल्यांपैकी एक बाटली उघडली, आणि बाटलीवरच्याच प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पाणी भरून घटाघटा पिऊन संपवले.
भर दुपारचे उन्ह रस्त्यावर रणरणत होते.
हवालदारानं खिशातून रुमाल काढला. बाटलीतलं पाणी रुमालावर शिंपडलं, आणि सगळ्या बाटल्यांभोवती तो ओला रुमाल गुंडाळला. बाजूच्याच सिग्नल बॉक्‍समध्ये सगळ्या बाटल्या काळजीपूर्वक ठेवल्या, आणि शिट्टी तोंडातच ठेवून तो पुन्हा ड्यूटीवर दाखल झाला...
... दुपारचा हा अनुभव खरं म्हणजे नोंदवून ठेवावा असा नव्हता. नंतर रेल्वे स्टेशनवर पोहोचून गाडीत बसल्यावर तो प्रसंग मी विसरूनदेखील गेलो होतो. चर्चगेटला उतरून थेट विधानसभेत पोहोचलो, तेव्हा राजकारण, गुन्हेगारीकरण आणि कायदा सुव्यवस्था असे शब्द विधानसभेच्या परिसरात "दुमदुमत' होते.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री आणि उस्मानाबादचे नवनिर्वाचित खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना त्याच दिवशी "सीबीआय'ने अटक केली आणि राजकारण ढवळून निघालं. विधिमंडळात डॉ. पाटील यांची अटक गाजणार, हे अपेक्षितच होते.
विधानसभेत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेतून डॉ. पाटील यांच्या अटकेचे पडसाद सभागृहात उमटलेच. अपेक्षेप्रमाणे गदारोळही झाला, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या, आणि कायदा सुव्यवस्थेवरील सगळी चर्चा डॉ. पाटील यांच्या अटकेभोवतीच घुटमळणार असे चित्र निर्माण झाले. "राजकारणाचे गुन्हेगारीकरण' नावाचा गुळगुळीत (!) झालेला शब्द पुन्हा घासूनपुसून बाहेर आला, आणि विधिमंडळापासून प्रसार माध्यमांच्या पडद्यांवर सर्वत्र दुमदुमू लागला...
...याच गदारोळात पोलिसांच्या परिस्थितीवर एक हलकासा प्रकाशझोत विधानसभेच्या सभागृहात पडला, म्हणून मला त्याच दिवशी सिग्नलजवळ पाहिलेला तो प्रसंग सहज आठवला.
कायदा सुव्यवस्थेवरील चर्चेत गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेच्या सभागृहातून पोलिसांच्या परिस्थितीवर आश्‍वासक शब्दांचा शिडकावा केला, आणि दुपारच्या रणरणत्या उन्हात, सिग्नल तोडणाऱ्या एका गाडीला थांबवून दोनतीन पाण्याच्या बाटल्या "उकळणाऱ्या' त्या हवालदाराचा, थंड पाणी पिऊन संपल्यानंतरचा शांत चेहरा मला लख्ख आठवला...
जयंत पाटील यांनी विधिमंडळात दिलेला शब्द कृतीत उतरला, तर अशा असंख्य पोलीस हवालदारांना रणरणत्या उन्हातून घरी गेल्यानंतर सावली देणारं एक हक्काचं घर तरी मिळेल, असं वाटून मी उगीचच सुखावून गेलो. घरदार विसरून, उन्हातान्हात, रात्रंदिवस "ड्यूटी' बजावणाऱ्या सामान्य पोलीस हवालदारांच्या परिस्थितीवर स्वतः गृहमंत्र्यांनीच विदारक प्रकाशझोत टाकला होता.
... गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी बजावलेल्या कर्तृत्वाला मुंबईकरांनी सलाम केला. त्यामुळेच, सामान्य हवालदाराविषयीदेखील सामान्य माणसाच्या मनात आपुलकीची भावना दिसते. म्हणूनच, रस्त्याकडेला सिग्नलजवळ आडोशाला उभं राहून "सावज' पकडल्यासारखं एकाद्या वाहनचालकाला थांबवणाऱ्या हवालदाराच्या हातात "चिरिमिरी' कोंबताना, "लाच देणे हा गुन्हा आहे', हे विसरायला होतं. तुटपुंज्या, अनियमितपणानं मिळणाऱ्या पगारात हा "कायद्याचा रक्षक' घरादाराचा गाडा हाकताना मेटाकुटीला आलाय, हे एव्हाना तमाम जनतेला माहीत झालंय. मुंबईच्या हवालदाराला चांगलं घरही नाही, पोलीस वसाहतींची परिस्थिती दयनीय आहे आणि माणसांनी राहण्यायोग्य आरोग्यपूर्ण वातावरण तिथे नाही, हेही सगळ्यांना माहीत आहे. 26 नोव्हेंबरनंतर झालेल्या खांदेपालटात जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद आले, आणि लगोलग त्यांनी मुंबईतील पोलीस वसाहतींना भेटी दिल्या. पोलिसांशी संवाद साधला. आणि त्यांच्या कुटुंबाला सोसावे लागणारे हाल डोळ्यांनी पाहिले. गलिच्छ, मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतींमध्ये आणि चिखलाच्या पायवाटा तुडवत झोपडपट्ट्यांमधल्या आपल्या घरी रात्री अपरात्री पोहोचणाऱ्या हवालदारांच्या व्यथा जाणून घेतल्या...
त्या सभागृहात विरोधकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढल्यानंतर चर्चेच्या उत्तरात जयंत पाटील यांनी स्वतःच पोलिसांच्या या अवस्थेची कबुलीच दिली. पद्मसिंह पाटील यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, सरकार त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि तपासावर प्रभाव पडेल अशी कोणतीही भूमिका घेणार नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा खरा रक्षक असलेल्या पोलीस यंत्रणेच्या भल्याचा पाढा वाचला, आणि 26 नोव्हेंबरनंतर पोलिस खात्यातील त्रुटी आणि उणीवा प्रकर्षाने सामोऱ्या येऊ लागल्याचे उघड झाले. गुप्तवार्ता यंत्रणेपासून पोलिसांची बुलेटप्रुफ जॅकेटस, "फोर्स वन' कार्यान्वित होण्याची गरज आणि अगदी पोलिसांच्या मानसिक आरोग्यापर्यंतची प्रत्येक बाब आता ऐरणीवर आली आहे. पोलिसांचे कौटुंबिक स्वास्थ्य, त्यांचे प्रशिक्षण आणि कमरेला लटकावलेल्या शस्त्राची निगराणी यावरही कटाक्ष देण्याची गरज सरकारला भासू लागली आहे, हे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.
... आता पोलिसांना शस्त्रे चालविण्याचा सराव करता येईल. आता पोलिसांचे "फोर्स वन' पथक कार्यरत होईल आणि गुप्तवार्ता पथकात प्रशिक्षित अधिकाऱ्यांचा ताफाही दाखल होईल. दहशतवादविरोधी पथक आणखी सक्षम होईल. त्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्याचे अर्थमंत्र्यांनी मान्य केलंय, असा शब्द जयंत पाटील यांनी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिला आहे.
पद्मसिंह पाटील यांच्या अटकेचे वादळ राज्यात घोंघावत असल्याने, पोलिसांना दिलाशाचा शिडकावा देणारे जयंत पाटील यांचे ते शब्द अजून सभागृहाबाहेर फारसे पोहोचलेच नाहीत...
पण, त्याच दुपारच्या रणरणत्या उन्हात, रस्त्यावरच्या त्या हवालदाराला थंडगार पाण्यामुळे मिळालेले समाधान आणि सभागृहात जयंत पाटील यांनी केलेला आश्‍वासक शब्दांचा शिडकावा यांचा एक अदृश्‍य धागा मला जाणवून गेला. केवळ योगायोगाने!...

(Sakal, Saptarang, 14 June 2009)

1 comment:

bhaanasa said...

जीवाची काहिली झाल्यावर मिळालेले थंडगार पाण्याचे समाधान केवळ शब्दातीत. मात्र जयंत पाटलांनी केलेला शब्द शिडकावा निव्वळ भ्रमातीत.असो.
पोस्ट आवडली.