Saturday, August 1, 2009

‘गरजवंतां’ची यशोगाथा...

'परंपरा' आणि 'प्रगती' हातात हात घालून वाटचाल करतात, तिथे विकासाचं वेगळं चित्र दिसतं. देशाच्या कानाकोपऱ्याचे प्रतिबिंब जपणाऱ्या मुंबईला बहुभाषकता आणि वेगवेगळ्या संस्कृतींच्या संगमामुळे एक वेगळी परंपरा प्राप्त झाली आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे असेल कदाचित; पण मुंबईचा सांस्कृतिक वारसा, परंपरा जपण्यापेक्षा मुंबईच्या विकासाला प्राधान्य देण्याची मानसिकता शासन आणि प्रशासनकर्त्यांमध्ये मूळ धरू लागली आहे. 'मुंबईला परंपरा जपण्याची नव्हे, तर विकासाची गरज आहे', अशी स्पष्टोक्ती करून मुंबईचे महापालिका आयुक्त जयराज फाटक यांनी याच मानसिकतेला एकदा मोकळी वाटदेखील करून दिली. यामुळेच, मुंबईच्या परंपरा आणि 'सांस्कृतिक भविष्या'समोर एक नवे प्रश्‍नचिन्ह उभे राहणार आहे. 'ऑस्कर'ची मोहोर उमटलेल्या 'स्लमडॉग'च्या निमित्ताने या 'प्रश्‍नचिन्हा'ची चाहूल लागली आहे आणि मुंबईकडे जगाचे लक्ष जाण्याच्या आधीपासूनच 'आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी' म्हणून कुख्यात असलेल्या 'धारावी'मुळे हे प्रश्‍नचिन्ह अधोरेखित होणार आहे. 'प्रगती' आणि 'परंपरा' यांच्यातील संघर्ष निर्माण होणार असून, परंपरांचा बळी देऊन प्रगती साधण्याच्या मानसिकतेपुढे गुडघे टेकावेत का, यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.
'स्लमडॉग मिल्यनेअर' चित्रपटाने धारावीचे चित्रण करून मुंबई आणि देशाच्या दारिद्य्राचा गलिच्छ चेहरा जगासमोर आणला, असे एक वादग्रस्त काहूर माजले असले, तरी या चित्रपटाच्या निमित्ताने धारावीच्या घाणेरड्या चेहऱ्यामागचे 'खरे रूप' "शोधण्या'ची एक नवी धडपडही सुरू झाली आहे. धारावीचा फेरफटका मारल्यानंतर 'उघड्या डोळ्यां'ना फक्त सर्वत्र पसरलेला गलिच्छपणा, दारिद्य्र आणि गरिबीच्या गर्तेत अडकलेले केविलवाणेपण दिसते. धारावीचे हे रूप आजवर अनेकांनी कॅमेऱ्यात टिपून जगाला दाखविले, अनेक कथा-कादंबऱ्या आणि चित्रपटांनीही जन्म घेतला; पण धारावीच्या साडेपाचशे एकरांच्या पसाऱ्यात आतवर जात डोळसपणे शोध घेतला, तर धारावी एक विकासाचे प्रारूप आहे, याची प्रचिती येते. आता जगालाही या वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. म्हणूनच, 'स्लमडॉग'ला मानाचे स्थान मिळाले, तेव्हा भारतात काहूर माजले, तरी अनेकांनी धारावीच्या 'आतल्या चेहऱ्या'चा धांडोळा घेण्याचाही प्रयत्न केला. 'स्लमडॉग'वर 'ऑस्कर'ची मोहोर उमटताच, 'न्यूयॉर्क टाइम्स'ने धारावीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
मुंबईत वर्षानुवर्षे वास्तव्य करणाऱ्यांपैकी असंख्य लोकांनादेखील, केवळ प्रसारमाध्यमांमध्ये दिसणारी आणि 'वाचता येणारी' धारावी माहीत असते. झपाट्याने पसरलेल्या मुंबईच्या नकाशावर आता धारावी नेमक्‍या 'हृदयस्थानी' आहे. धारावी नेहमीच सर्वसामान्य मुंबईकराच्या कुतूहलाचा विषय राहिली आहे. तेथील समाजजीवन, अर्थकारण, धारावीतील घरे आणि उद्योगधंदे, व्यापार यांविषयी असंख्य 'आख्यायिका' सर्वसामान्यांच्या जगात कुतूहलाने चघळल्या जातात. मध्यमवर्गीय मुंबईकर तर आजही धारावीच्या वाटेला फारसा वळत नाही. एकीकडे आलिशान इमारतींचा विळखा वाढत असताना, मुंबईच्या या मध्यभागातील दलदलीच्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लपलेले 'वेगळेपण' शोधण्यासाठी जगाची पावले मात्र धारावीकडे वळणार आहेत. 'स्लम टुरिझम'च्या नावाखाली परदेशी पर्यटकांना धारावीची 'सफर' घडवून आणण्याचा 'धंदा' सुरू झाल्याची ओरड अलीकडे सुरू झाली होती; पण केवळ धारावीतले दारिद्य्र आणि गलिच्छपणा टिपण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळली, असे मानणे 'स्लमडॉग'नंतरच्या परिस्थितीमुळे आता योग्य ठरणार नाही. धारावीतल्या 'स्लम टुरिझम'मागे फक्त
तेथील दारिद्य्राची 'कुचेष्टा' नव्हे, तर तिथल्या 'स्वयंभू व्यवस्थे'विषयीचे 'कुतूहल'देखील असावे. जे वास्तव आसपास राहणाऱ्यांनीही ओळखले नाही, ते शोधण्यासाठी जगाची धडपड सुरू आहे. परदेशांतील कित्येक अभ्यासक आता धारावीच्या समाजजीवनावर, तेथील औद्योगिक व्यवस्थेवर संशोधन करत आहेत. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्थिक केंद्राच्या गाभ्यातदेखील, 'धारावी' नावाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा ढाचा जपणारे, सामूहिक विकासाचे प्रारूप ठरू शकेल असे 'विशेष आर्थिक क्षेत्र' कितीतरी पूर्वीपासून 'स्वयंभूपणे' निर्माण झाले आहे, हे या संशोधनातून समोर येत आहे.
'धारावी' मुंबईचा सर्वांत दाट लोकवस्तीचा भाग आहे. तेथील अस्ताव्यस्त गल्लीबोळांमधील प्रत्येक घर हे एक 'उद्योग केंद्र' आहे. म्हणूनच, धारावी हा उद्यमशील मुंबईचा सर्वाधिक कृतिशील आणि 'जिवंत कोपरा' आहे. नुसत्या डोळ्यांना इथे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसतात; पण या कचऱ्यातूनच ‘सोने’ वेचण्याचे उद्योग इथल्या कानाकोपऱ्यात सुरू असतात. शहरी संस्कृतीच्या प्रभावामुळे ग्रामीण भारतातील बलुतेदार पद्धती हळूहळू लोप पावत चालली आहे; परंतु शेकडो वर्षांपूर्वी, जगण्यासाठी मुंबईच्या आश्रयाला आलेल्या बलुतेदारांच्या वारसांनी आपल्यासोबत आणलेल्या ग्रामीण परंपरांचा आणि हस्तकलांचा वारसा धारावीतील आपापल्या पत्र्याच्या, कुडाच्या नाहीतर पुठ्ठ्याच्या झोपडीतच जपला आणि जोपासला. म्हणूनच, धारावीतला कुंभारवाडा गुजरातेतल्या मातीकामाची परंपरा जपतो, तर चामडे कमाविण्याचा ग्रामीण भागातूनही नामशेष होत चाललेला उद्योग धारावीच्या आश्रयाने फोफावतो. या उद्योगातून निर्माण होणारी उत्पादने देशातीलच नव्हे, तर परदेशातील दिवाणखानेदेखील सजवतात. धारावीच्याच एखाद्या कोपऱ्यात कचऱ्यातून गोळा केलेल्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू असतात, मुंबईच्या खाद्य संस्कृतीला खतपाणी घालणारी लहान-मोठी उत्पादने तयार होत असतात, तर कुठे शेकडो हात कापडावर जरीकामाची कलाकुसर करत असतात. थोडक्‍यात, धारावी "क्‍लस्टर' पद्धतीच्या एसईझेडचे स्वयंभू मॉडेल आहे. धारावीच्या या उद्यमशीलतेमुळेच, कचऱ्याने वेढलेली, गलिच्छपणाचा मुखवटा घेतलेली आणि 'कळकटलेली' धारावी खरे तर केव्हापासूनच 'मिल्यनेअर' झाली आहे. धारावीच्या घराघरांत चालणाऱ्या असंख्य उद्योगांनी मुंबईत रोजीरोटीसाठी येणाऱ्या लोंढ्यांना 'चारा' दिला आहे आणि त्यांच्या ग्रामीण हातांनी बनविलेल्या असंख्य वस्तूंना निर्यातीची गुणवत्ता प्राप्त झालेली आहे.
विशेष म्हणजे, या 'स्वयंभू एसईझेड'साठी कोणतेही सरकारी नियोजन नाही, कोणताही कृती आराखडा नाही. पारंपरिक ज्ञानाच्या जोरावर उद्यमशीलता राबविणाऱ्या या नगरासाठी सरकारने कोणतेही झोन आखून दिलेले नाहीत. इथल्या पसाऱ्यासाठी वास्तुरचना शास्त्राचा कोणताही संकेत नाही. त्यामुळे धारावीची ही यशोगाथा सरकारी किंवा प्रशासकीय कौशल्याची यशोगाथा ठरू शकत नाही, तर ती केवळ परंपरांच्या आधाराने पोटाची खळगी भरणाऱ्या गरजवंतांच्या सामूहिक प्रयत्नांची आगळी यशोगाथा आहे. आपल्या गावाकडच्या परंपरांचा वारसा घेऊन मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येकाचा या यशोगाथेमध्ये वाटा आहे. त्यामुळेच देशी-परदेशी अभ्यासकांना धारावीला काही शिकवण्याऐवजी, धारावीकडूनच काहीतरी शिकता येईल, याची जाणीव होऊ लागली आहे. माहितीच्या महाजालावर फेरफटका मारला, तर धारावीविषयीच्या जागतिक कुतूहलाचे हे मायाजाल सहज कुणालाही अनुभवता येईल. या पार्श्‍वभूमीवर, धारावीच्या विकासाचा आराखडा नव्याने विचारात घेण्याची गरज कदाचित निर्माण होणार आहे. नव्या विकासात धारावीच्या एकत्रित भूखंडावर टोलेजंग इमारती निर्माण होतील. अनेक नवे उद्योग उभे राहतील. स्थानिक रहिवाशांना त्यातून रोजगारही मिळतील आणि गलिच्छ घरांऐवजी पक्की मोठी घरेही मिळतील; पण एका बाजूला 'सॅटेलाइट' विकासाची वाटचाल करणाऱ्या मुंबईच्या या परिसरात कधीपासून उमटलेल्या गांधीवादी विकासाच्या खाणाखुणा मात्र नव्या विकासात पुसल्या जातील. 'मुंबईला परंपरांची नव्हे, तर विकासाची गरज आहे' हे महापालिका आयुक्तांचे विधान कदाचित वेगळ्या संदर्भात असू शकेल; पण विकास आणि परंपरा यांची सांगड घालून, 'अस्सल देशी मॉडेल' म्हणून धारावीला नवा चेहरा दिला, तर कदाचित या "कोळशा'च्या खाणीतच 'हिरे'देखील सापडू शकतील...

No comments: