Thursday, August 27, 2009

गाव जन्मला...

"महाराष्ट्रदिन' साजरा झाला आणि गावाला "वाढदिवसा'चे वेध लागले. अशीच तयारी शेजारच्या गावातही सुरू होती. ही दोन्ही गावे एकाच दिवशी जन्माला आलेली... गाव जन्माला आला आणि लगेचच, "निर्मलग्राम' स्पर्धेचा लाखाचा पुरस्कारदेखील मिळाला. याच आनंदात गावाने गेल्या 5 मे रोजी दुसरा वाढदिवस साजरा केला. "आमचा गाव' या विषयावर गावात मुलांच्या वक्‍तृत्व स्पर्धा झडल्या. घरोघरी रांगोळ्या सजल्या...
...कोल्हापूर जिल्ह्यातल्या "खोताची वाडी'चे सरपंच नामदेव खोत यांच्या शब्दाशब्दांतून आपल्या नव्यानव्या गावाचे कौतुक ओसंडून वाहात होते. शाहूवाडी तालुक्‍यातल्या "पिशवी' गावाचे विभाजन झाले. "खोताची वाडी' आणि "पिशवी' अशी नवी गावे "जन्माला' आली. खोताच्या वाडीला "निर्मलग्राम' स्पर्धेत एक लाखाचा पुरस्कार मिळाला. आता गावाचे डोळे "तंटामुक्त गाव' स्पर्धेकडे लागले आहेत. गावात "आमदार फंडा'तून डांबरी सडक झाली, पिशवी आणि खोताची वाडीला जोडणारा डांबरी रस्ता मंजूर झाला, फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी 60 हजारांची लोकवर्गणी गोळा झाली. पण, तंटामुक्तीची स्वप्ने पाहणाऱ्या या गावाचे पाण्यावरून "पिशवी'शी बिनसले आहे. "पिशवी'ने "खोताच्या वाडी'वर कोर्टात केस टाकलीय. शाहूवाडी कोर्टाच्या निकालाकडे पिशवी आणि खोताच्या वाडीचे डोळे लागलेत...
गेल्या सात वर्षांत जवळपास 45 गावे महाराष्ट्रात जन्माला आली. काही गावे "कारभार' करू लागली आहेत, तर काहींना अजून दिशाच सापडत नाहीये... श्रीरामपूर तालुक्‍यात भैरवनाथनगर आणि दत्तनगर ही जुळी गावे 2007 च्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जन्माला आली. पण ती ‘त्रिशंकू’च आहेत. पुणे जिल्ह्यातील संतोषनगर गेल्या 8 मेस वर्षाचे झाले. हरंगूळ (जि. लातूर), डोल्हारी (जि. यवतमाळ), आर्वी (जि. चंद्रपूर), नांदगाव (ता. नाशिक) या गावांतल्याच वाड्यांना गावाचा दर्जा मिळाला. शिंदी (जि. यवतमाळ), रामपूर (जि. चंद्रपूर), श्‍यामनगर (जि. लातूर) ही नवी गावे जन्माला आली. नाशिक जिल्ह्यात नांदगावचे विभाजन होऊन एका बाजूला "कृष्णनगर' तर दुसरीकडे "लक्ष्मीनगर' वसले...
जवळपास 28 हजार गावे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कारभार करतात. एखाद्या वाडीची, गटग्रामपंचायतीतील एखाद्या गावाची लोकसंख्या हजाराचा आकडा ओलांडते आणि ग्रामपंचायत मिळावी, म्हणून पुढाऱ्यांचे प्रयत्न सुरू होतात... काही गावे मात्र, "नाइलाजा'ने जन्माला येतात. सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्‍यातले उळूंब गाव, डोंबलवाडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आल्यामुळे उठवले गेले आणि फलटणजवळ वसले. अजूनही जुने ग्रामस्थ आपल्या जुन्या गावाच्या आठवणींनी व्याकूळ होतात. पण, आता नव्या उळूंबचा "गावगाडा' रुळावर येतोय. दोन महिन्यांपूर्वी, 4 जूनला हे गाव जन्माला आले आणि कालच ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली.
नवी मुंबई महापालिकेतून वगळल्या गेलेल्या 14 गावांपैकी वाकवण, नारिवली, दहीसर, नांगाव आणि पिंपरी या गावांची अवस्था सध्या तरी फारशी चांगली नाही. आजच्या घडीला, "ना घर का ना घाट का' अशा स्थितीत, "त्रिशंकू'पणे ही गावे कुठल्या तरी तालुक्‍यातील समावेशाची वाट पाहातायत. मूळची नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील "वॉर्डा'चा दर्जा असलेली ही गावे प्रत्यक्षात ठाणे तालुक्‍याच्या हद्दीत येतात. पण, "चुकून' त्यांचा समावेश कल्याण तालुक्‍यात झाला. आता तिथे निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने ठरविले, तेव्हा ही गावे कुठल्या तालुक्‍यात असावीत, यावर खल सुरू झाला. शासनाने अशा गावांना "त्रिशंकू' गावे म्हटले आहे. या गावांच्या लोकसंख्येची मोजणी झालेली नाही, अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या माहीत नाही. त्यामुळे गावांची निवडणूकदेखील टांगणीवर पडणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. नवी मुंबईतून "बाहेर' पडलेली ही गावे, आता कल्याण की ठाणे या निर्णयाकडे डोळे लावून आपल्या व्यथा कुरवाळताहेत..

No comments: