Sunday, August 18, 2019

... ती सोज्ज्वळ स्मितरेषा!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपच्या 'मनोगत' पाक्षिकाच्या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख-

अफाट गर्दीतून उमटणारा घोषणांचा उत्फुल्ल गजर आणि क्षणाक्षणाला उसळणारा आनंद अनुभवण्याचे भाग्य मिळालेल्या जागा फारच थोड्या असतात. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानास वर्षानुवर्षे असे भाग्य लाभले. या मैदानावर खऱ्या अर्थाने, असंख्य मुलुखमैदान तोफा गरजल्या आणि अफाट गर्दीने त्या असंख्य वेळा अनुभवल्या. राजकीय सभांच्या अनुभवाने शिवतीर्थ जसे समृद्ध झाले, तसा थरारता अनुभव मुंबईच्या वानखेडे स्टेडियमनेही असंख्य वेळा घेतला. पण शिवतीर्थावरची गर्दी आणि वानखेडेवरची गर्दी यांमध्ये मोठा फरक होता. वानखेडेवरच्या उत्फुल्लतेचा अनुभव शिवतीर्थास नव्हता, आणि शिवतीर्थावरच्या गर्दीचा मोहोर वानखेडेने कधी अनुभवला नव्हता... 
या इतिहासाला, ३१ ऑक्टोबर २०१४ या दिवसाने कलाटणी दिली. शिवतीर्थावर उसळणाऱ्या अफाट जनसागरातून उचंबळणाऱ्या भावना त्या दिवशी वानखेडे स्टेडियमवरही उमटल्या, आणि एका आगळ्या, ऐतिहासिक दिवसाच्या अनुभवाने वानखेडे स्टेडियम समृद्ध झाले. याआधी या जागेने असंख्य वेळा गर्दी अनुभवली, उत्साह अनुभवला, जोष अनुभवला... पण त्या दिवशीचा उत्साह, जोष, जल्लोष काही वेगळाच होता. निमित्त होते, महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या शपथविधीचे... महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी ईश्वरास स्मरून शपथ घेतली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विशुद्धपणे आणि निस्पृहपणे काम करण्याची ग्वाही तमाम जनतेला दिली, आणि खचाखच गर्दीतील जल्लोषाच्या अनुभवाने वानखेडे स्टेडियम नखशिखान्त मोहरून गेले. तब्बल १५ वर्षे विरोधकाच्या भूमिकेत वावरताना राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर आवाज उठविणाऱ्या, रस्त्यावर आणि विधिमंडळातही सरकारला धारेवर धरणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याच्या नेतृत्वाची, सरकार चालविण्याची जबाबदारी पक्षाने सोपविली.
राजकारणाच्या रंगमंचावर वावरणाऱ्या व्यक्तीस वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पण नाटकाचा रंगमंच आणि राजकारणाचा रंगमंच यांमध्ये एक फरक असतो. नाटकाच्या रंगमंचावर भूमिका बदलली की वेष बदलतो, राजकारणाच्या रंगमंचावर आवेश बदलतो. प्रश्न विचारणाऱ्याच्या भूमिकेतून उत्तर देण्याच्या भूमिकेत जावे लागते. ही बदललेली भूमिका सहजपणे निभावणे सोपे नसते. प्रश्न विचारणे कदाचित सोपेही असते. उत्तर शोधणे किंवा उत्तर देणे फारच अवघड असते. विरोधकाच्या भूमिकेतून राज्यकर्त्याच्या भूमिकेत गेल्यावर होणारा हा बदल सहजपणे पेलू शकेल अशा योग्य नायकाच्या गळ्यात या भूमिकेची माळ घालणे ही पक्षाची मोठी कसोटी असते. महाराष्ट्रात तर, भाजपला सरकार चालविण्याची संधी याआधी अल्पकाळच मिळाली असल्याने, अशा भूमिकेसाठी योग्य नायक निवडणे हे आव्हान होतेच, पण या जबाबदारीसाठी पक्षाने केलेली निवड सार्थ ठरविणे हे नायकासमोरील त्याहूनही खडतर आव्हान होते. सलग पाच वर्षांच्या कारकिर्दीवर आपल्या सक्षम नेतृत्वाची मोहोर उमटवून देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान पेलले, आणि नेतृत्वासाठी केलेली आपली निवड योग्य होती, हे सिद्ध करून नव्या पर्वास सामोरे जाण्याच्या नव्या आत्मविश्वासाचा मार्गही पक्षास दाखविला. आणखी काही दिवसांतच विधानसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागतील. कधीकाळी काही मोजक्या नेत्यांच्या प्रतिमेवर महाराष्ट्रात जेमतेम राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला झेंडा रोवला आहे. जेथेजेथे ज्या ज्या निवडणुका झाल्या, तेथे तेथे, पक्षाचा झेंडा फडकू लागला आहे, आणि आगामी निवडणुकीत राज्यातील निम्म्याहून अधिक मतदार भाजपच्या पाठीशी असतील, असा दुर्दम्य विश्वास पक्षात मूळ धरू लागला आहे. या विश्वासाची बीजे पेरणाऱ्या नेत्याचे नाव, देवेंद्र फडणवीस!
... अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, नागपूर शहर भाजपचा नेता, नागपूरचा महापौर, आमदार, महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशा, नेतृत्वाच्या प्रत्येक पायरीवर आपल्या पावलाची खूण उमटवून राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या या नेत्यास मी गेल्या काही वर्षांपासून काहीसात लांबूनच न्याहाळतोय. प्रत्यक्ष सहवासाचे संवादाचे क्षण फारच मोजके होते. तरीही, एक गोष्ट नेहमी, सातत्याने जाणवत गेली. ती म्हणजे, देवेंद्र फडणवीस नावाच्या या तरुणाच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा! विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेताना उमटलेल्या संतापाचे क्षण संपताच त्याची जागा घेणारी, व्यक्तिमत्वावर सौजन्यशीलतेची झालर पुन्हा पांघरणारी ही स्मितरेषा हे देवेंद्र पडणवीस यांच्या नेतृत्वगुणाची मोठी शक्ती आहे, असे मला नेहमीच जाणवत राहिले. राजकारणात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मुखवटे चढवावेच लागतात. ती तर या क्षेत्रातील यशस्वितेची अपरिहार्य गरज असते. फडणवीस त्याला अपवाद असण्याचे कारणच नाही. गरजेनुसार ज्या ज्या वेळी जो जो मुखवटा चढवून जी जी भूमिका त्यांनी वठविली, त्या भूमिकेला योग्य तो न्याय देऊन झाल्यावर, त्या स्मितरेषेसह समोर येणारा मूळ चेहरा ही त्यांची खरी कमाई आहे, असे मला नेहमीच वाटत आले. काही मुलाखतींच्या निमित्ताने या व्यक्तिमत्वाच्या आतला माणूस जाणवून गेला. मातृसंस्था संघ आपल्या स्वयंसेवकास घडवितो म्हणजे नेमके काय करतो, याचे फडणवीस हे स्पष्ट उदाहरण आहे, याची खात्रीही पटली. 
काही वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहिलेली देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मला अजूनही आठवते. कारण, आत्मविश्वासाचे अदम्य दर्शन त्या मुलाखतीतून त्यांनी घडविले होते. मित्रपक्षाचे नेते, विरोधकांमधील दिग्गजांनी सातत्याने शरसंधान सुरू ठेवल्यामुळे, चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी फडणवीस यांची अवस्था झाली आहे, असे मुलाखतकारास वाटत होते. या नेत्याची पहिल्याच चेंडूत दांडी उडवावी अशा आविर्भावात मुलाखतकाराने तसा प्रश्न विचारला. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरची ती स्मितरेषा अधिकच ठळक झाली. क्षणभर त्यांनी मुलाखतकाराकडे पाहिले, आणि ते म्हणाले, त्या अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे ज्ञान नव्हते. माझ्याकडे ते ज्ञान आहे. चक्रव्यूहात मला घेरणाऱ्यांना तेथेच गुरफटवून कसे ठेवायचे, आणि आपण बाहेर कसे पडायचे ते मला माहीत आहे, आणि मी तसे करून दाखवेन... फडणवीस यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषेसोबत आत्मविश्वासाचीही एक रेषा उमटली आहे, असा भास त्या क्षणी मला झाला होता. त्यानंतर पुढे सरकणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत मुख्यमंत्री म्हणून वावरणारे फडणवीस मी दुरूनच न्याहाळत गेलो. राजकारणी फडणवीस, पक्षाचे नेतृत्व करणारे फडणवीस, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणारे, प्रचार सभांमध्ये तडाखेबंद भाषण करणारे फडणवीस, जबाबदार मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतील फडणवीस, विधिमंडळातील फडणवीस आणि कुटुंबप्रमुख, पिता, पती अशा कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे पदर हळुवारपणे उलगडून प्रत्येक आघाडीवर यशस्वी असल्याची आत्मविश्वासपूर्ण ग्वाही देणारे फडणवीस अशी वेगवेगळी रूपे उलगडत गेली. प्रत्येक भूमिकेस त्यांनी कसलेल्या नायकाप्रमाणे न्याय दिला, हे तर आता विरोधकांनाही मान्य झाले असावे...
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाच वर्षांचा पहिला कार्यकाळ आता संपत आला आहे. नव्या पर्वात अधिक जोमाने काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांना विरोधकांसोबतच असंख्य वेळा ‘घरचे आहेर’देखील मिळत गेले. राजकारणात, मित्रपक्षाशी ‘जुळवून घेणे’ म्हणजे, मित्रपक्षांसमोर ‘गुडघे टेकणे’ असाच बऱ्याचदा अर्थ असतो. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच्या सुमारे तीन दशकांच्या युतीच्या काळात भाजपला अनेकदा हेच करावे लागले. मोठ्या भावाच्या ताठ्यात वर्षानुवर्षे वावरणाऱ्या या मित्राचे रुसवेफुगवे घालवून त्यांची मनधरणी करण्यासाठी अनेक केंद्रीय नेत्यांना मुंबईत धाव घ्यावी लागत असे. त्या इतिहासास गेल्या पाच वर्षांत अशी काही अलगद कलाटणी मिळाली, की हे घडले कसे ते त्या इतिहासासही कळलेच नाही. 
‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र... याचा धनुष्यासारखा वापर करून शिवसेनेने फडणवीस यांच्यावर टीकेचे असंख्य बाण सोडले. पुराणकाळात अशी अस्त्रे निष्प्रभ करण्याचे मंत्र काहींना अवगत होते, असे दाखले पुराणकथांमध्ये मिळतात. त्या कथांना पुरावे नसल्याने, ते किती खरे हा वादाचा विषय असला, तरी फडणवीस यांच्याकडे पाहिल्यावर, असे काही मंत्र त्यांना अवगत असावेत, असेच वाटू लागते... २७ जून २०१५ या दिवशी सामना या मुखपत्रात मुख्यमंत्र्यांवर चक्क स्तुतिसुमने उधळली गेली होती. कुणी कितीही आरोप करा, टीका करा, पण विदर्भाचा हा बहादुर नेता अथकपणे आपले काम पार पाडतोच. कोणत्याही स्थितीत तो आपली पाठ जमिनीला लागू देत नाही, अशी तारीफ सामनाने केली होती... भाजपमध्ये समाधानाचे वातावरण होते. आता मने जुळली, असेही वाटू लागले होते. मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीस जेमतेम वर्ष पूर्ण झाले होते. यानंतर काही दिवसांतच, पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेस फडणवीस यांनी कठोर लगाम घातला, तेव्हा अनेकांची बोटे तोंडात गेली होती. राजकीय मैत्र आणि प्रशासन याची गल्लत न करण्याचे धाडस त्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी दाखविले, समोरून येणारा संभाव्य बाण निष्प्रभ करण्याचा मंत्र उच्चारूनच त्यांनी सेनेचे सारे बाण असे काही निष्प्रभ केले, की आता फडणवीस यांच्या हातात हात घालून विरोधकांवर शरसंधान करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे...
अगदी अलीकडेच, मुंबईतील बोरीवलीत स्थानिक आमदार व मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी उभारलेल्या ‘अटल स्मृति उद्यान’ या अनोख्या ‘थीम पार्क’चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी केले. तेव्हा ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून मनोमीलनाचा असा उत्कट आविष्कार उपस्थितांना अनुभवास आला, की सातत्याने शरसंधान करणारी शिवसेना ती हीच का, असा प्रश्न पडावा... स्थानिक शिवसैनिकांनी भेटीदाखल उभयतांना दिलेल्या गदा एकमेकांविरुद्ध न वापरता प्रतिस्पर्ध्याविरुद्ध वापरून त्यांना गदागदा हलविण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात वावरताना असंख्य मुखवटे असंख्य वेळा चढविले असतील... असंख्य भूमिका वठविल्या असतील. पण असे काही ‘करून दाखविण्या’ची ही जादू, त्यांच्या खऱ्या चेहऱ्यावरील त्या सोज्ज्वळ स्मितरेषेमुळेच साधली असणार, यात शंकाच नाही... ही स्मितरेषा अशीच, अखंडपणे उजळलेली राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. कारण ही स्मितरेषा म्हणजेच महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे… 

'च म चा'गिरी!

आपण पुनर्जन्म वगैरे मानत असू किंवा नसू. पण एक प्रश्न मात्र आपल्याला खूप आवडतो. तो म्हणजे, ‘पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल?’… कारण, या प्रश्नाचं उत्तर एका मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं असतं. बऱ्याचदा, या जन्मात न जमलेली किंवा राहून गेलेली एखादी गोष्ट जमविणे किंवा पूर्ण होणे हे आपल्या पुढच्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे, असंच अनेकांना वाटतं. ‘पुनर्जन्म असलाच, तर पुढच्या जन्मी मला अमुक व्हायला आवडेल’, असं या प्रश्नावरचं उत्तर मिळतं, ते त्यामुळेच...
... सुट्टी असेल तेव्हा सकाळच्या नाश्त्यासोबत वर्तमानपत्र वाचायची मजा काही औरच असते. ती मी आज अनुभवत होतो. हातात गरमागरम चमचमीत कांदापोह्याची प्लेट आणि समोर मांडीवर वर्तमानपत्र ही त्या क्षणाच्या सर्वात चांगल्या सुखाची व्याख्या असते अशी माझी खात्री असल्याने, ते सुख अनुभवत असतानाच वर्तमानपत्रात कुठेतरी कांशीराम यांच्या ‘चमचा युगा’चा उल्लेख वाचला, आणि माझी वाचनमुद्रा क्षणभर खंडित झाली. हातातल्या कांदापोह्याच्या प्लेटमधला चमचा क्षणभर थरथरून गेल्याचा मला भास झाला, आणि माझी नजर वर्तमानपत्रावरून हातातल्या पोहेभरल्या चमच्यावर स्थिरावली. त्या क्षणी त्या चमच्याने माझ्याकडे पाहून डोळा मिचकावल्याचा भास मला झाला, आणि झटक्यात त्यातील खळग्यातले चमचाभर पोहे घशाखाली घालून मी चमच्याकडे पाहू लागलो.
पुढे जणू चमचा माझ्याशी बोलू लागला...
लहानपणी शाळेत असताना, वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहायला गुरुजी सांगत असत. त्यात, ‘मी पंतप्रधान असतो तर…’ वगैरे विषयाचाही समावेश असायचा आणि आपण त्यावर आवेशाने निबंध लिहित असू ते मला आजही चांगले आठवते. चमच्याकडे पाहाताना मला ते दिवस आठवले, आणि एक खंत मनाच्या कोपऱ्यातून उगवून मनभर पसरत आहे असा भास मला होऊ लागला. हातातला चमचा काहीसा उदास होत आहे, असे मला वाटू लागले. मी निरखून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या खोलगट खड्ड्यावर एक काळसर ठिपका आहे, हे मला जाणवले, आणि मी विचार करू लागलो... हा काळा डाग चमच्यावर का बरे पडला असेल?... खरं म्हणजे, हा काही मनाला त्रास वगैरे करून घेण्याइतका गहनबिहन प्रश्न नव्हता. एका झटक्यासरशी तो झटकूनही टाकता आला असता. पण सुट्टीचा दिवस, समोर पसरलेलं वर्तमानपत्र, हातातील पोहेभरल्या प्लेटमधून आपल्याकडे पाहणारा चमचा आणि मोकळं मन एवढं सगळं जुळून आलेलं असताना असा प्रश्न झटकून टाकला तर नंतर करायचं काय, असा विचार करून मी तो प्रश्न मनात तसाच राहू दिला. मग वर्तमानपत्र बाजूला केलं. पोह्याची प्लेटही खाली ठेवली. आता माझ्या हातात फक्त चमचा होता. मी त्याच्याकडे निरखून पाहिले, आणि त्या काळ्या डागाविषयी विचार करू लागलो... माझी विचारतंद्री ऐन भरात आलेली असताना, बायकोने एका भांड्यातून आणखी पोहे आणले आणि हातातल्या चमच्यापेक्षा थोड्या मोठ्याशा चमच्याने तिने चमचाभर पोहे माझ्या प्लेटमध्ये टाकले... मी हाताने ‘पुरे’ म्हणत असताना, माझ्या हातातला चमचा आणि तो थोडा मोठा चमचा एकमेकांवर आपटले, आणि ‘किण्ण’ असा एक मंजुळ ध्वनी कानाशेजारी घुमला. त्याला एक गोड नाद आहे हे माझ्या लक्षात आले. मग मी त्यावर विचार करीत असताना, ‘कदाचित दोन चमचे बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे त्यांनी प्रेमाने एकमेकांची विचारपूस केली असावी’ असा विचार मनात येऊन चमच्यांना भाषादेखील असते, या निष्कर्षाचा मला शोध लागला.
... आता माझ्या मौनाचा अर्थ शोधण्यात माझी बायको गर्क झाली असावी. मोठा चमचा काहीशा जोरातच भांड्यात ठेवून तिने माझ्यासमोर तळवा हलविला, आणि भांड्यात चमचा आपटतानाच्या आवाजाने माझी तंद्री पुन्हा एकदा भंग झाली. या वेळी मोठ्या चमच्याच्या आपटण्याच्या ध्वनीतून त्याची नाराजी स्पष्टपणे उमटली आहे, असा मला भास झाला, आणि मी हातातल्या चमच्याकडे नजर वळविली. आता त्याच्यावरचा काळा डाग अधिकच ठळक झाला असावा, असे मला वाटू लागले होते. या क्षणी आपण मौन सोडले नाही, तर मनातल्या विचारास वाचा फुटणे कठीणच, असा विचार करून मी माझ्या प्लेटमधला तो छोटा चमचा बायकोसमेर उंचावला, आणि, ‘हा काळा डाग कसला’ असा प्रश्न नम्रपणे तिला विचारला. तिनेही काही क्षण चमच्यावरच्या त्या काळ्या डागाकडे पाहिले. विचार करतच ती चमच्याकडे निरखून पाहात होती, आणि मी तिच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या भावरेषा निरखत होतो. माझ्या हातातला तो काळा डाग असलेला चमचा आता तिच्याशी बोलत असावा असे मला तिच्या डोळ्यात पाहताना वाटू लागले. असेच काही क्षण गेले, आणि अचानक, तिला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले. ‘बरेच दिवस तो चमचा लोणच्याच्या बरणीत पडून होता... म्हणून काळा पडला असावा’... तिने मला सांगितले. मग मी चमच्याकडे पाहिले. काळवंडलेल्या चेहऱ्याने उदासपणे तो माझ्याकडेच पाहात होता. लोणचं संपल्यावर तो चमचा खूप वेळ घासला, तरी थोडासा डाग त्याच्यावर राहिलाच... त्या आठवणीची बायको उजळणी करत असताना काळवंडलेला तो चमचा समाधानाने उजळतोय, असे मला वाटले. अंगावरच्या छोट्याशा डागाचे आता आपल्याला काही वाटत नाही, असाच त्याचा भाव असावा असाही मला भास झाला. तरीही, थोड्या दिवसांच्या लोणच्याच्या सहवासामुळे याने आयुष्यभरासाठी स्वतःस डाग लावून घेतला, असा खेदजनक विचार माझ्या मनात आलाच! मग मी तो चमचा हलकेच प्लेटवर आपटला. रिकाम्या चमच्याचा नाद मधुर असतो, हे मला तेव्हा जाणवले. ज्या जागी आपण असू तेथे प्रामाणिक रहायचे, आणि आपले काम बजावायचे हा चमच्यांचा गुणधर्मच असतो. म्हणूनच तो अनेक दिवस बरणीतल्या लोणच्यासोबत बिनबोभाटपणे राहिला, नंतर पोह्याच्या प्लेटमध्ये आनंदाने आला, आणि दुसरा चमचा भेटताच त्याच्याशी संवादही साधता झाला... चमच्याचे हे वेगळेपण मला त्या क्षणी साक्षात्कारासारखे वाटू लागले, आणि पुढचा जन्म असलाच, तर आपणही चमचा व्हावे असे मला प्रकर्षाने वाटू लागले.
मग मी चमच्यांची कूळकथा शोधू लागलो. चमच्यांचे अनंत प्रकार असतात, आणि आकारानुसार त्यांचा वापर केला जातो, असे मला त्या संशोधनातून आढळून आले. मग मी उत्सुकतेपोटी चमच्यांची चित्रे शोधू लागलो, आणि हे सारे चमचे आपल्यादेखील आसपास आहेत, हे माझ्या लक्षात आले. कधीच शक्य नसलेल्या किंवा न पाहिलेल्या, न हाताळलेल्या किंवा आवाक्यापलीकडच्या गोष्टींचा विचार करत, आपण अमुक असतो तर, तमुक असतो तर अशा कल्पना लढवत आपण आपले बालपण वाया घालविले, त्याऐवजी, ‘आपण चमचा असतो तर…’ या विषयावर एखादा तरी निबंध लिहावयास हवा होता, असे मला वाटू लागले. मग, आपणास असे का वाटू लागले यावर मी विचार करू लागलो. असे विचार मनात येऊ लागले, की त्याचे उत्तर सापडेपर्यंत मनाला चैन पडत नाही. समजा, आपण चमचा असतो तर या विषयावर लहानपणीच आपण विचार केला असता, तर त्याने काय फरक पडणार होता, असाही प्रश्न मला पडला, आणि हातातला काळा डागवाला चमचा पोह्याच्या प्लेटमध्ये खुपसून चमचाभर पोहे पुन्हा तोंडात कोंबून मी त्याचेही उत्तर शोधू लागलो. पण त्यासाठी फार वेळ घालवावा लागला नाही. काही क्षणांतच मला पहिले त्तर सापडले. ते म्हणजे, आपण लहानपणीच यावर विचार केला असता, तर मोठेपणा, आता यावर विचार करण्यात वेळ घालवायची वेळच आली नसती, आणि आसपासच्या चमच्यांची वैशिष्ट्ये, त्यांची भाषा, त्यांचे परस्परांशी वागणे यांचा अर्थ कधीच आपल्याला उमगूनही गेला असता. चमचे ज्याच्यासोबत असतात, त्याच्याशी सेवाभावानेच नव्हे, तर एकनिष्ठेने राहतात, आणि जागा बदलल्यानंतर नव्या जागेत ज्याच्यासोबत राहतात, त्याच्याशीही त्यांची तेवढीच निष्ठा असते, हे सत्य आपल्याला लहानपणीच उमगले असते, असेही वाटून गेले. शिवाय, आकारानुसार त्यांची उपयुक्तता असते, हेही वास्तव जे आज उमगले, त्याची थोडीशी तरी ओळख लहानपणीच करून घेता येणेही शक्य झाले असते, असेही मला वाटू लागले.
चमचे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही चहासाखरेच्या डब्यातल्या चमच्यांना सहसा जागा बदलायची वेळच येत नाही. साखरेच्या डब्यातल्या चमच्यावर तर, कायम साखरेसोबत राहून साखरेचा थरच जमा झालेला असतो, हेही माझ्या लक्षात आले. आमच्या मिठाच्या डब्यात आईस्क्रीमच्या कपात असलेला प्लास्टिकचा चमचा पर्मनंटली ठेवलेला असतो. स्टीलचे चमचे मिठात टिकत नाहीत, असे बायकोने सांगितले. मग ओट्याखालचे कपाट उघडून मी वेगवेगळ्या चमच्यांची त्यांच्या आकारानुसार उपयुक्तता काय, यावर बायकोशी चर्चा केली. चपटा चमचा भाताच्या भांड्यातच चालतो, तर मोठा चमचा- आम्ही त्याला डाव असेही म्हणतो- आमटीच्या पातेलीतच वावरतो. ढवळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो, हाही मला माहीत असलेलाच उपयोग बायकोकडून पुन्हा ऐकावयास मिळाला. एक पूर्ण चपटा असाही चमचा मला पहायला मिळाला. त्याला खोलगटपणा अजिबातच नव्हता. फक्त पसरटपणा असलेला हा चमचा, तव्यावरच्या पोळ्या, डोसा वगैरे पदार्थ परतण्यासाठी उपयोगी पडतो, असे बायकोने सांगितले.
टीस्पून आणि टेबलस्पून असे शब्द आपण नेहमी वापरतो. ते त्यांच्या आकारावरून आणि उपयुक्ततेवरूनच पडलेले असतात. कोणत्याही पदार्थात, चवीपुरता मीठमसाला घालण्यासाठी टीस्पून वापरतात, तर तयार पदार्थ पानात वाढून घेण्यासाठी टेबलस्पून वापरतात...
या नाना गुणांनी युक्त असलेल्या चमचा या वस्तूचे महात्म्य मला पोह्यांच्या प्लेटीतल्या एका छोट्याशा चमच्याने समजावून सांगितले, आणि ‘चमचायुग’ या शब्दाचा व्यापक अर्थ मला समजून आला. चमच्याशिवाय सारे व्यर्थ आहे, हे मला पटले, आणि चमचा ही या जगातील अत्यावश्यक चीज आहे, याची खात्री पटली.
पुढच्या जन्मी कोण व्हावे असे तुला वाटते, असा प्रश्न मला जर कुणी आता विचारला, तर क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तर देईन, ‘च म चा’!

निष्ठा आणि जिद्द!

अगदी अलीकडे, बऱ्याच वर्षांनंतर रामभाऊ नाईक यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदावरून पायउतार झाल्यानंतर, वयाच्या ८५ व्या वर्षी, पुन्हा मातृपक्षाच्या सेवेत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रुजू होण्याची रामभाऊंची भावना म्हणजे पक्षाच्या असंख्य नव्याजुन्या कार्यकर्त्यांचा एक वेगळा प्रेरणास्रोत ठरणार आहे. कालच्या रामभाऊंच्या पत्रकार परिषदेस त्यासोबत असलेली कार्यकर्त्यांची गर्दी आणि पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे मन:पूर्वक प्रास्ताविक यांतून हेच चिन्ह स्पष्ट डोकावत होते...
कालच्या पत्रकार परिषदेत, आपल्या प्रारंभीच्या तब्बल एक तासाच्या निवेदनात रामभाऊंनी आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीचा सम्यक आढावा घेतला. पत्रकारांच्या नजरेतून पाहिले, तर यात ‘बातमीयोग्य मसाला’ फारसा नव्हताच. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमुळे राज भवनाच्या संस्कृतीमध्ये घडून गेलेले दोन महत्वाचे बदल माध्यमांच्या पानांवर फारसे दखलपात्र असणारही नाहीत, सहाजिकच, ते समाजापर्यंत पोहोचण्याचा वेग फारच मंद असेल. तरीही ते बदल पोहोचायला हवेत. आजकाल, देशासमोरील अनेक महत्वाच्या प्रश्नांची सामान्य माणसांना गंभीर चिंता वाटत असते, आणि आपल्यालादेखील ज्या प्रश्नाचे गांभीर्य वाटते ते प्रश्न सरकारच्या ध्यानातही आलेले नसावेत अशीच बहुतेकांची धारणा असते. अशा गंभीर प्रश्नांच्या गर्तेत तर, रामभाऊंच्या कारकिर्दीतील हे बदल बेदखल राहण्याची व त्याला महत्व नसण्याचीच शक्यता अधिक! तरीही त्याची नोंद घेतली पाहिजे. कारण या बदलांतून एका अप्रिय परंपरेचे अस्तित्व पुसण्याचा पराक्रमही घडला आहे. अनेकांना ही बाब ‘चिल्लर’ वाटू शकते, पण तो त्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा मुद्दा आहे.
राज्यपालास जे स्थान असते, त्यावरून त्याचा परमआदरार्थी म्हणून ‘हिज एक्सलेन्सी’ किंवा ‘महामहीम’ असा उल्लेख करण्याची ब्रिटिश परंपरा आजही देशात सुरू आहे. उत्तर प्रदेशात या पदाची सूत्रे हाती घेताच रामभाऊंनी ही परंपरा पुसून टाकली. यापुढे ‘माननीय’ हा आदरार्थी उल्लेख पुरेसा राहील असा निर्णय रामभाऊंनी घेतला.
वरवर पाहता, हे काही फार क्रांतिकारक वगैरे दिसत नाही. पण थोडा अधिक विचार केला, तर, या निर्णयामुळे राज्यपाल आणि समाज यांच्यातील अंतर पुसले जात असल्याचे लक्षात येते. राज भवनाचे दरवाजे या एका निर्णयामुळे सामान्यांसाठी उघडले जातात. रामभाऊंनी ते केले. गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशच्या राज भवनात ४० हजार लोकांना थेट राज्यपालांची भेट घेता आली होती...
राज्यपालपदावरील व्यक्तीची निवृत्ती आणि नव्या व्यक्तीची नियुक्ती या परंपरेला काहीशी विचित्र झालर असते. नव्या राज्यपालाच्या पदग्रहणाआधी मावळत्या राज्यपालाने गाशा गुंडाळून घर गाठावे व राजभवन नव्यासाठी रिकामे करावे अशी प्रथा असते. नवा राज्यपाल येईल तेव्हा जुन्या राज्यपालाने आसपासही असू नये या विचित्र परंपरेस मोडीत काढून रामभाऊंनी नव्या राज्यपालांचे राजभवनात स्वागत केले.
अशाच काही जुन्या परंपरा मोडीत काढून रामभाऊंनी काही नव्या परंपरांचा पाया घातला आहे. नगरसेवक, आमदार, खासदार, पक्षाच्या शिस्तपालन व अनुशासन समितीचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, अशी सारी मानाची पदे भूषविल्यानंतचा निवृत्तीचा काळ एका सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेतून पुन्हा पक्षास अर्पण करणे हे सोपे काम नाही.
आता पुन्हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रामभाऊ राजकारणात, भाजपमधे आणि समाजाच्या सेवेत दाखल झाले आहेत.
वयाच्या, ८५ व्या वर्षी!
आता ते मुंबईच्या माध्यमांना भेटत राहतील.
भाजपच्या नेते -कार्यकर्त्यांना त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा लाभ मिळत राहील...
विशेष म्हणजे, आता निवडणुकीच्या राजकारणापासून आपण लांब राहणार, हे रामभाऊंनी पाच वर्षांपूर्वीच जाहीर केलेले असल्याने, जिद्दीकार्यकर्त्याचे वेगळे रूप रामभाऊंच्या रूपाने नव्याने पाहावयास मिळणार आहे.
याला म्हणावे जिद्द... याला म्हणावे निष्ठा!!

विचार करा...

मोठी धरणे बांधण्याच्या धोरणाचा आता पुनर्विचार व्हायला हवा. मोठ्या धरणांचा फायदा नेमका काय याचाही अभ्यास व्हायला हवा. यासाठी करावा लागणारा प्रचंड खर्च, प्रचंड भूसंपादन, प्रचंड विस्थापन आणि पुनर्वसनाच्या नावाने शंख हीच परिस्थिती पहायला मिळते. अर्थात, प्रचंड प्रकल्पांचा मलिदाही प्रचंड असतो.
अशा प्रचंड प्रकल्पांचे फायदे नसतात असे नाही, पण एखाद्याच वेळी या प्रकल्पांमुळे बसणारा फटका हा त्याचे सर्व फायदे धुवून टाकणारा ठरतो. माणसे, जनावरे, घरे, गोठे, गावे, शहरे उद्ध्वस्त होतात. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी वा पश्चिम महाराष्ट्रात आज पुराच्या विळख्यात सापडलेली शहरे हा या मोठ्या धरणांच्या फटक्याचाच परिणाम आहे.
जगातील अनेक राष्ट्रे आज महाकाय धरणांचे धोरण गुंडाळून लहान धरणांची कास धरू लागली आहेत. एखाद्या नदीवर एकच महाकाय धरण बांधण्यापेक्षा, नदीच्या प्रवाहात ठरावीक टप्प्यांवर लहानलहान धरणे बांधल्यास खर्च कमी होईल, भूसंपादन मर्यादित होऊन विस्थापनाची व सहाजिकच पुनर्वसनाची परवडही कमी होईल व नदीच्या प्रवाहक्षेत्रात एकाच टप्प्यावर नव्हे तर टप्प्याटप्प्यावर सिंचनक्षमता निर्माण करता येईल.
शिवाय, पूरस्थितीच्या संकटाची टांगती तलवार काहीशी सौम्य करता येईल.
जीवन आश्वस्त होईल आणि संकटांची भयाणताही कमी होईल.
ती वेळ कधी येईल? कुणास ठाऊक !!

... तरी कोल्हापुरी खंबीर!

...’लहानपणी आम्ही गाणं म्हणायचो. “शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?”... कोल्हापूर परिसरातील अनेक गावांमधील शाळांना पुराने वेढले आहे. शाळेभावती पाणीच पाणी साचले आहे. मुलांना सुट्टी आहे. पण शाळेभोवती साचलेल्या पाण्यामुळे मिळालेल्या सुट्टीला वेदनेची, आक्रोशाची किनार आहे... मुलांच्या शाळेभोवतीच नव्हे, घराभोवतीही पाणी साचलंय, आणि या सक्तीच्या सुट्टीत, जीव मुठीत धरून आपल्या केविलवाण्या, हतबल आईबापांच्या कुशीत लपवेली शेकडो मुलं भयभीत नजरेनं आयुष्यातला हा भयाण अनुभव झेलण्याची शिकस्त करताहेत...
उद्ध्वस्त घरे, रिकामे गोठे आणि भुईसपाट शेती, पाण्याचे विक्राळ लोट सभोवती... अशी अवस्था आजही कोल्हापूर-सांगलीच्या परिसरात आहे. एक खिन्न, उदास सावट इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दाटलंय... उद्ध्वस्त आयुष्याला पुन्हा उभारी मिळेल असे आशेचे किरण आज तरी अनेकांच्या उरल्यासुरल्या घरांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत...
#झी२४_तास च्या दीपक भातुसेने आज एका सहकाऱ्यासोबत राजापूरवाडी, अर्जुनवाडीच्या दैनावस्थेची कहाणी लोकांसमोर मांडली...
‘आता पुढे काय?’ हा प्रश्न त्याने विचारला, आणि संकटग्रस्तांच्या मनात रुतलेले तेच प्रश्नचिन्ह स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरही उमटले...
दिलाशाची बाब एवढीच, की, या प्रश्नाचं उत्तर अनेकजण शोधतायत... हातपाय गळाले नाहीयेत. उत्तर शोधण्याची उमेदही संपलेली नाहीये. म्हणूनच, या प्रश्नावर जवळपास प्रत्येकाचे उत्तर एकच आहे.
ते म्हणजे, “आता पहिल्यापासून सुरुवात!”...
कोल्हापूरवासींयांनी संकटाला धैर्याने तोंड दिले. त्यांच्या ‘पहिल्यापासून सुरुवात’ करण्याच्या प्रयत्नांसोबत प्रत्येक हाताची साथ असायला हवी. म्हणजे त्यांची उमेद आणखी ताकदवान होईल... मग, ‘प्रसंग गंभीर, तरी कोल्हापुरी खंबीर’ हा विश्वासही दृढ होईल!