Sunday, August 18, 2019

निष्ठा आणि जिद्द!

अगदी अलीकडे, बऱ्याच वर्षांनंतर रामभाऊ नाईक यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदावरून पायउतार झाल्यानंतर, वयाच्या ८५ व्या वर्षी, पुन्हा मातृपक्षाच्या सेवेत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रुजू होण्याची रामभाऊंची भावना म्हणजे पक्षाच्या असंख्य नव्याजुन्या कार्यकर्त्यांचा एक वेगळा प्रेरणास्रोत ठरणार आहे. कालच्या रामभाऊंच्या पत्रकार परिषदेस त्यासोबत असलेली कार्यकर्त्यांची गर्दी आणि पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे मन:पूर्वक प्रास्ताविक यांतून हेच चिन्ह स्पष्ट डोकावत होते...
कालच्या पत्रकार परिषदेत, आपल्या प्रारंभीच्या तब्बल एक तासाच्या निवेदनात रामभाऊंनी आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीचा सम्यक आढावा घेतला. पत्रकारांच्या नजरेतून पाहिले, तर यात ‘बातमीयोग्य मसाला’ फारसा नव्हताच. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमुळे राज भवनाच्या संस्कृतीमध्ये घडून गेलेले दोन महत्वाचे बदल माध्यमांच्या पानांवर फारसे दखलपात्र असणारही नाहीत, सहाजिकच, ते समाजापर्यंत पोहोचण्याचा वेग फारच मंद असेल. तरीही ते बदल पोहोचायला हवेत. आजकाल, देशासमोरील अनेक महत्वाच्या प्रश्नांची सामान्य माणसांना गंभीर चिंता वाटत असते, आणि आपल्यालादेखील ज्या प्रश्नाचे गांभीर्य वाटते ते प्रश्न सरकारच्या ध्यानातही आलेले नसावेत अशीच बहुतेकांची धारणा असते. अशा गंभीर प्रश्नांच्या गर्तेत तर, रामभाऊंच्या कारकिर्दीतील हे बदल बेदखल राहण्याची व त्याला महत्व नसण्याचीच शक्यता अधिक! तरीही त्याची नोंद घेतली पाहिजे. कारण या बदलांतून एका अप्रिय परंपरेचे अस्तित्व पुसण्याचा पराक्रमही घडला आहे. अनेकांना ही बाब ‘चिल्लर’ वाटू शकते, पण तो त्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा मुद्दा आहे.
राज्यपालास जे स्थान असते, त्यावरून त्याचा परमआदरार्थी म्हणून ‘हिज एक्सलेन्सी’ किंवा ‘महामहीम’ असा उल्लेख करण्याची ब्रिटिश परंपरा आजही देशात सुरू आहे. उत्तर प्रदेशात या पदाची सूत्रे हाती घेताच रामभाऊंनी ही परंपरा पुसून टाकली. यापुढे ‘माननीय’ हा आदरार्थी उल्लेख पुरेसा राहील असा निर्णय रामभाऊंनी घेतला.
वरवर पाहता, हे काही फार क्रांतिकारक वगैरे दिसत नाही. पण थोडा अधिक विचार केला, तर, या निर्णयामुळे राज्यपाल आणि समाज यांच्यातील अंतर पुसले जात असल्याचे लक्षात येते. राज भवनाचे दरवाजे या एका निर्णयामुळे सामान्यांसाठी उघडले जातात. रामभाऊंनी ते केले. गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशच्या राज भवनात ४० हजार लोकांना थेट राज्यपालांची भेट घेता आली होती...
राज्यपालपदावरील व्यक्तीची निवृत्ती आणि नव्या व्यक्तीची नियुक्ती या परंपरेला काहीशी विचित्र झालर असते. नव्या राज्यपालाच्या पदग्रहणाआधी मावळत्या राज्यपालाने गाशा गुंडाळून घर गाठावे व राजभवन नव्यासाठी रिकामे करावे अशी प्रथा असते. नवा राज्यपाल येईल तेव्हा जुन्या राज्यपालाने आसपासही असू नये या विचित्र परंपरेस मोडीत काढून रामभाऊंनी नव्या राज्यपालांचे राजभवनात स्वागत केले.
अशाच काही जुन्या परंपरा मोडीत काढून रामभाऊंनी काही नव्या परंपरांचा पाया घातला आहे. नगरसेवक, आमदार, खासदार, पक्षाच्या शिस्तपालन व अनुशासन समितीचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, अशी सारी मानाची पदे भूषविल्यानंतचा निवृत्तीचा काळ एका सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेतून पुन्हा पक्षास अर्पण करणे हे सोपे काम नाही.
आता पुन्हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रामभाऊ राजकारणात, भाजपमधे आणि समाजाच्या सेवेत दाखल झाले आहेत.
वयाच्या, ८५ व्या वर्षी!
आता ते मुंबईच्या माध्यमांना भेटत राहतील.
भाजपच्या नेते -कार्यकर्त्यांना त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा लाभ मिळत राहील...
विशेष म्हणजे, आता निवडणुकीच्या राजकारणापासून आपण लांब राहणार, हे रामभाऊंनी पाच वर्षांपूर्वीच जाहीर केलेले असल्याने, जिद्दीकार्यकर्त्याचे वेगळे रूप रामभाऊंच्या रूपाने नव्याने पाहावयास मिळणार आहे.
याला म्हणावे जिद्द... याला म्हणावे निष्ठा!!

No comments: