Sunday, August 18, 2019

... ती सोज्ज्वळ स्मितरेषा!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपच्या 'मनोगत' पाक्षिकाच्या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख-

अफाट गर्दीतून उमटणारा घोषणांचा उत्फुल्ल गजर आणि क्षणाक्षणाला उसळणारा आनंद अनुभवण्याचे भाग्य मिळालेल्या जागा फारच थोड्या असतात. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानास वर्षानुवर्षे असे भाग्य लाभले. या मैदानावर खऱ्या अर्थाने, असंख्य मुलुखमैदान तोफा गरजल्या आणि अफाट गर्दीने त्या असंख्य वेळा अनुभवल्या. राजकीय सभांच्या अनुभवाने शिवतीर्थ जसे समृद्ध झाले, तसा थरारता अनुभव मुंबईच्या वानखेडे स्टेडियमनेही असंख्य वेळा घेतला. पण शिवतीर्थावरची गर्दी आणि वानखेडेवरची गर्दी यांमध्ये मोठा फरक होता. वानखेडेवरच्या उत्फुल्लतेचा अनुभव शिवतीर्थास नव्हता, आणि शिवतीर्थावरच्या गर्दीचा मोहोर वानखेडेने कधी अनुभवला नव्हता... 
या इतिहासाला, ३१ ऑक्टोबर २०१४ या दिवसाने कलाटणी दिली. शिवतीर्थावर उसळणाऱ्या अफाट जनसागरातून उचंबळणाऱ्या भावना त्या दिवशी वानखेडे स्टेडियमवरही उमटल्या, आणि एका आगळ्या, ऐतिहासिक दिवसाच्या अनुभवाने वानखेडे स्टेडियम समृद्ध झाले. याआधी या जागेने असंख्य वेळा गर्दी अनुभवली, उत्साह अनुभवला, जोष अनुभवला... पण त्या दिवशीचा उत्साह, जोष, जल्लोष काही वेगळाच होता. निमित्त होते, महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या शपथविधीचे... महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी ईश्वरास स्मरून शपथ घेतली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विशुद्धपणे आणि निस्पृहपणे काम करण्याची ग्वाही तमाम जनतेला दिली, आणि खचाखच गर्दीतील जल्लोषाच्या अनुभवाने वानखेडे स्टेडियम नखशिखान्त मोहरून गेले. तब्बल १५ वर्षे विरोधकाच्या भूमिकेत वावरताना राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर आवाज उठविणाऱ्या, रस्त्यावर आणि विधिमंडळातही सरकारला धारेवर धरणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याच्या नेतृत्वाची, सरकार चालविण्याची जबाबदारी पक्षाने सोपविली.
राजकारणाच्या रंगमंचावर वावरणाऱ्या व्यक्तीस वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पण नाटकाचा रंगमंच आणि राजकारणाचा रंगमंच यांमध्ये एक फरक असतो. नाटकाच्या रंगमंचावर भूमिका बदलली की वेष बदलतो, राजकारणाच्या रंगमंचावर आवेश बदलतो. प्रश्न विचारणाऱ्याच्या भूमिकेतून उत्तर देण्याच्या भूमिकेत जावे लागते. ही बदललेली भूमिका सहजपणे निभावणे सोपे नसते. प्रश्न विचारणे कदाचित सोपेही असते. उत्तर शोधणे किंवा उत्तर देणे फारच अवघड असते. विरोधकाच्या भूमिकेतून राज्यकर्त्याच्या भूमिकेत गेल्यावर होणारा हा बदल सहजपणे पेलू शकेल अशा योग्य नायकाच्या गळ्यात या भूमिकेची माळ घालणे ही पक्षाची मोठी कसोटी असते. महाराष्ट्रात तर, भाजपला सरकार चालविण्याची संधी याआधी अल्पकाळच मिळाली असल्याने, अशा भूमिकेसाठी योग्य नायक निवडणे हे आव्हान होतेच, पण या जबाबदारीसाठी पक्षाने केलेली निवड सार्थ ठरविणे हे नायकासमोरील त्याहूनही खडतर आव्हान होते. सलग पाच वर्षांच्या कारकिर्दीवर आपल्या सक्षम नेतृत्वाची मोहोर उमटवून देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान पेलले, आणि नेतृत्वासाठी केलेली आपली निवड योग्य होती, हे सिद्ध करून नव्या पर्वास सामोरे जाण्याच्या नव्या आत्मविश्वासाचा मार्गही पक्षास दाखविला. आणखी काही दिवसांतच विधानसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागतील. कधीकाळी काही मोजक्या नेत्यांच्या प्रतिमेवर महाराष्ट्रात जेमतेम राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला झेंडा रोवला आहे. जेथेजेथे ज्या ज्या निवडणुका झाल्या, तेथे तेथे, पक्षाचा झेंडा फडकू लागला आहे, आणि आगामी निवडणुकीत राज्यातील निम्म्याहून अधिक मतदार भाजपच्या पाठीशी असतील, असा दुर्दम्य विश्वास पक्षात मूळ धरू लागला आहे. या विश्वासाची बीजे पेरणाऱ्या नेत्याचे नाव, देवेंद्र फडणवीस!
... अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, नागपूर शहर भाजपचा नेता, नागपूरचा महापौर, आमदार, महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशा, नेतृत्वाच्या प्रत्येक पायरीवर आपल्या पावलाची खूण उमटवून राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या या नेत्यास मी गेल्या काही वर्षांपासून काहीसात लांबूनच न्याहाळतोय. प्रत्यक्ष सहवासाचे संवादाचे क्षण फारच मोजके होते. तरीही, एक गोष्ट नेहमी, सातत्याने जाणवत गेली. ती म्हणजे, देवेंद्र फडणवीस नावाच्या या तरुणाच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा! विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेताना उमटलेल्या संतापाचे क्षण संपताच त्याची जागा घेणारी, व्यक्तिमत्वावर सौजन्यशीलतेची झालर पुन्हा पांघरणारी ही स्मितरेषा हे देवेंद्र पडणवीस यांच्या नेतृत्वगुणाची मोठी शक्ती आहे, असे मला नेहमीच जाणवत राहिले. राजकारणात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मुखवटे चढवावेच लागतात. ती तर या क्षेत्रातील यशस्वितेची अपरिहार्य गरज असते. फडणवीस त्याला अपवाद असण्याचे कारणच नाही. गरजेनुसार ज्या ज्या वेळी जो जो मुखवटा चढवून जी जी भूमिका त्यांनी वठविली, त्या भूमिकेला योग्य तो न्याय देऊन झाल्यावर, त्या स्मितरेषेसह समोर येणारा मूळ चेहरा ही त्यांची खरी कमाई आहे, असे मला नेहमीच वाटत आले. काही मुलाखतींच्या निमित्ताने या व्यक्तिमत्वाच्या आतला माणूस जाणवून गेला. मातृसंस्था संघ आपल्या स्वयंसेवकास घडवितो म्हणजे नेमके काय करतो, याचे फडणवीस हे स्पष्ट उदाहरण आहे, याची खात्रीही पटली. 
काही वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहिलेली देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मला अजूनही आठवते. कारण, आत्मविश्वासाचे अदम्य दर्शन त्या मुलाखतीतून त्यांनी घडविले होते. मित्रपक्षाचे नेते, विरोधकांमधील दिग्गजांनी सातत्याने शरसंधान सुरू ठेवल्यामुळे, चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी फडणवीस यांची अवस्था झाली आहे, असे मुलाखतकारास वाटत होते. या नेत्याची पहिल्याच चेंडूत दांडी उडवावी अशा आविर्भावात मुलाखतकाराने तसा प्रश्न विचारला. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरची ती स्मितरेषा अधिकच ठळक झाली. क्षणभर त्यांनी मुलाखतकाराकडे पाहिले, आणि ते म्हणाले, त्या अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे ज्ञान नव्हते. माझ्याकडे ते ज्ञान आहे. चक्रव्यूहात मला घेरणाऱ्यांना तेथेच गुरफटवून कसे ठेवायचे, आणि आपण बाहेर कसे पडायचे ते मला माहीत आहे, आणि मी तसे करून दाखवेन... फडणवीस यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषेसोबत आत्मविश्वासाचीही एक रेषा उमटली आहे, असा भास त्या क्षणी मला झाला होता. त्यानंतर पुढे सरकणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत मुख्यमंत्री म्हणून वावरणारे फडणवीस मी दुरूनच न्याहाळत गेलो. राजकारणी फडणवीस, पक्षाचे नेतृत्व करणारे फडणवीस, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणारे, प्रचार सभांमध्ये तडाखेबंद भाषण करणारे फडणवीस, जबाबदार मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतील फडणवीस, विधिमंडळातील फडणवीस आणि कुटुंबप्रमुख, पिता, पती अशा कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे पदर हळुवारपणे उलगडून प्रत्येक आघाडीवर यशस्वी असल्याची आत्मविश्वासपूर्ण ग्वाही देणारे फडणवीस अशी वेगवेगळी रूपे उलगडत गेली. प्रत्येक भूमिकेस त्यांनी कसलेल्या नायकाप्रमाणे न्याय दिला, हे तर आता विरोधकांनाही मान्य झाले असावे...
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाच वर्षांचा पहिला कार्यकाळ आता संपत आला आहे. नव्या पर्वात अधिक जोमाने काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांना विरोधकांसोबतच असंख्य वेळा ‘घरचे आहेर’देखील मिळत गेले. राजकारणात, मित्रपक्षाशी ‘जुळवून घेणे’ म्हणजे, मित्रपक्षांसमोर ‘गुडघे टेकणे’ असाच बऱ्याचदा अर्थ असतो. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच्या सुमारे तीन दशकांच्या युतीच्या काळात भाजपला अनेकदा हेच करावे लागले. मोठ्या भावाच्या ताठ्यात वर्षानुवर्षे वावरणाऱ्या या मित्राचे रुसवेफुगवे घालवून त्यांची मनधरणी करण्यासाठी अनेक केंद्रीय नेत्यांना मुंबईत धाव घ्यावी लागत असे. त्या इतिहासास गेल्या पाच वर्षांत अशी काही अलगद कलाटणी मिळाली, की हे घडले कसे ते त्या इतिहासासही कळलेच नाही. 
‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र... याचा धनुष्यासारखा वापर करून शिवसेनेने फडणवीस यांच्यावर टीकेचे असंख्य बाण सोडले. पुराणकाळात अशी अस्त्रे निष्प्रभ करण्याचे मंत्र काहींना अवगत होते, असे दाखले पुराणकथांमध्ये मिळतात. त्या कथांना पुरावे नसल्याने, ते किती खरे हा वादाचा विषय असला, तरी फडणवीस यांच्याकडे पाहिल्यावर, असे काही मंत्र त्यांना अवगत असावेत, असेच वाटू लागते... २७ जून २०१५ या दिवशी सामना या मुखपत्रात मुख्यमंत्र्यांवर चक्क स्तुतिसुमने उधळली गेली होती. कुणी कितीही आरोप करा, टीका करा, पण विदर्भाचा हा बहादुर नेता अथकपणे आपले काम पार पाडतोच. कोणत्याही स्थितीत तो आपली पाठ जमिनीला लागू देत नाही, अशी तारीफ सामनाने केली होती... भाजपमध्ये समाधानाचे वातावरण होते. आता मने जुळली, असेही वाटू लागले होते. मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीस जेमतेम वर्ष पूर्ण झाले होते. यानंतर काही दिवसांतच, पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेस फडणवीस यांनी कठोर लगाम घातला, तेव्हा अनेकांची बोटे तोंडात गेली होती. राजकीय मैत्र आणि प्रशासन याची गल्लत न करण्याचे धाडस त्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी दाखविले, समोरून येणारा संभाव्य बाण निष्प्रभ करण्याचा मंत्र उच्चारूनच त्यांनी सेनेचे सारे बाण असे काही निष्प्रभ केले, की आता फडणवीस यांच्या हातात हात घालून विरोधकांवर शरसंधान करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे...
अगदी अलीकडेच, मुंबईतील बोरीवलीत स्थानिक आमदार व मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी उभारलेल्या ‘अटल स्मृति उद्यान’ या अनोख्या ‘थीम पार्क’चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी केले. तेव्हा ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून मनोमीलनाचा असा उत्कट आविष्कार उपस्थितांना अनुभवास आला, की सातत्याने शरसंधान करणारी शिवसेना ती हीच का, असा प्रश्न पडावा... स्थानिक शिवसैनिकांनी भेटीदाखल उभयतांना दिलेल्या गदा एकमेकांविरुद्ध न वापरता प्रतिस्पर्ध्याविरुद्ध वापरून त्यांना गदागदा हलविण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात वावरताना असंख्य मुखवटे असंख्य वेळा चढविले असतील... असंख्य भूमिका वठविल्या असतील. पण असे काही ‘करून दाखविण्या’ची ही जादू, त्यांच्या खऱ्या चेहऱ्यावरील त्या सोज्ज्वळ स्मितरेषेमुळेच साधली असणार, यात शंकाच नाही... ही स्मितरेषा अशीच, अखंडपणे उजळलेली राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. कारण ही स्मितरेषा म्हणजेच महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे… 

No comments: