Thursday, May 7, 2020

मोकळ्या वेळाचा समृद्ध पसारा...

आपण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हा काय करत असतो? सध्या करोनामुळे लॉकडाऊन अवस्थेत असलेल्या प्रत्येकासच, आपण सध्या काहीच करत नाही असेच वाटत असले पाहिजे. पण ते तसे नसते. आपण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हाही आपण काहीतरी करतच असतो. ते म्हणजे, विचार... उलट, जेव्हा आपण काहीतरी करत असतो, तेव्हा फक्त तेच काहीतरी करत असतो. पण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हा भरपूर काहीतरी करत असतो. काहीच न करण्याच्या काळात एकाच वेळी आपण असंख्य विचार करत असतो. विचारांचे जंजाळ डोक्यात असते. यामध्ये भूतकाळ असतो, वर्तमानकाळ असतो, आणि भविष्यकाळही असतो. त्यात आपण असतो, आसपासची माणसं असतात, प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, नद्या, नाले, डोंगर असतात. अशा असंख्य विचारांचा गुंता झाला, की काहीच न करण्याचा वेळ इतका व्यग्र होऊन जातो, की तो सोडवताना त्या सगळ्यातूनच काही ना काही नव्याने दिसायला लागतं. एवढ्या काळापासून हे सारं आपल्या आसपास आहे, तरी याआधी कधीच कसं दिसलं नाही, असं वाटायला लागतं. आपण अचंबित होतो, आणि काहीच न करण्याच्या काळातील विचार करण्याच्या काळामुळे आपल्याला नवं काहीतरी गवसल्याचा आनंदही मिळून जातो.
अलीकडे, बऱ्याच जणांशी फोनवर वगैरे बोलताना, एक गोष्ट समायिक असते. ती म्हणजे, जवळपास सगळ्यांनाच, पहाटे जाग येण्यासाठी पहिल्यासारखा मोबाईलचा अलार्म लावावा लागत नाही. एकच ठरावीक पक्षी, तुमच्या खिडकीच्या अगदी जवळ, अगदी ठरलेल्या वेळी अशी काही मंजुळ शीळ वाजवू लागतो, की त्या जादूई आवाजाने आपल्याला जाग येते. ती नुसती जाग नसते, तर प्रसन्न सकाळ उजाडल्याच्या अनुभवासोबत आलेली ती जाग असते. पूर्वी, जेव्हा अलार्म लावून सकाळी उठावे लागायचे, तेव्हा तो आवाज कानाशी वाडू लागला, की अर्धवट झोपेतही मूड जायचा. साखरझोपेचं खोबरं झालं, असं वाटून वैताग यायचा, आणि तशाच अवस्थेत चाचपडत अलार्म बंद करून लोळत पडावेसे वाटायचे. आता, त्या अलार्मच्या वेळेआधीच बाहेर पक्ष्यांची किलबिल सुरू होते, त्या आवाजने जाग येते, तेव्हा अलार्ममुळे वाटणाऱ्या कटकटीचा लवलेशही मनावर नसतो.
असे झाले, की दिवस नक्की प्रसन्न जातो, आणि काहीच न करण्याच्या वेळेत काहीतरी करण्यासाठी विचारांचे एक मोठ्ठे गाठोडेच आपण अगदी आनंदाने खांद्यावर घेतो.
अशाच, काहीच न करण्याच्या काळात, काही सन्मित्रांच्या फेसबुकवर फेरफटका मारण्याचा मस्त विरंगुळा मला सापडला. तेथूनच, त्यांच्या ब्लॉग्जच्या लिंक सापडल्या, आणि काहीच न करण्याच्या वेळात काहीतरी भरघोस वाचता येईल, असा खजिना सापडल्याचा आनंद झाला. मित्रवर्य प्रवीण बर्दापूरकर, समीर गायकवाड, रमेश झवंर, अशा अनेक दिग्गजांच्या ब्लॉगवर एक तरी चक्कर मारली नाही, तर काहीच न करण्यातला महत्वाचा वेळ वाया गेला असे मला वाटू लागले, आणि ब्लॉगवाचन हा जुना छंद जिवंत झाला.
त्यात मला आठवलं, आपणही एक ब्लॉग जवळपास बारातेरा वर्षाँपासून चालवतच आहोत. मग मी तो जिवंत केला. काहीच न करण्याच्या या कालात आपल्या ब्लॉगला खतपाणी घालायचं ठरवलं, आणि बघता बघता माझा, zulelal.blogspot.com हा ब्लॉग जिवंतच नव्हे, ताजातवानाही झाला.
तुम्हाला देखील, काहीच न करण्याच्या काळात काहीतरी करावेसे वाटत असेल, तर तुमचा जुना ब्लॉग जिवंत करा, नाहीतर नवा ब्लॉग सुरू करा.
त्यात नक्की मजा आहे.

1 comment:

sameer gaikwad said...

व्वा ! आता नवी मेजवानी मिळणार तर ! ... मुशाफिरीची ही टर्मही कसदार होईल ...