Tuesday, May 5, 2020

करोनोत्तर काळ!

सुमारे पस्तीस वर्षांच्या ॲान फील्ड पत्रकारितेनंतर महिनाभरापूर्वी, मार्चमध्ये मी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर ‘किमान गरजे’पुरते हातपाय हलवून थोडी कमाई करावी व विचाराची सवय लागलेल्या मेंदूला गंज येऊ नये यासाठी मुक्त पत्रकारिता, लेखन, संपादन, व प्रकाशन क्षेत्रास पूरक असे काही करावे अशी ठोस आखणीही केली. नोकरीतून मुक्त होऊन काही दिवस मोकळा श्वास घ्यावा, बरेच दिवस रखडलेला प्रवास करावा, नव्या नियोजनाच्या दृष्टीने भेटीगाठी घ्याव्यात वगैरे विचार सुरू असतानाच लाॅकडाऊनमुळे घरात जखडून घ्यावे लागले, आणि सारी मनोरथे मनातच राहिली.
वर्किंग फ्राॅम होम ही संकल्पना करोनोत्तर काळात जगभर राबविली जाईल असे स्पष्ट दिसू लागले आहे. याचे फायदे आहेत असेही बोलले जातेय. ते नक्कीच आहेत. मुख्य म्हणजे, काम करणाऱ्या- विशेषत: बौद्धिक काम करणाऱ्यालाच हे फायदे मिळणार आहेत. प्रवासाकरिता वाया जाणारा वेळ व एनर्जी वाचवून अधिक क्षमतेने काम करण्यासाठी वापरता येईल, घराबाहेर वावरण्यामुळे होणारे, विशेषत: कपडे, हाॅटेलिंग, रिक्षा-टॅक्सी वगैरेचे खर्च वाचून गरजा कमी होणार असल्याने बचत वाढेल वगैरे महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा होत आहे. डिस्टन्सिंग हे जगण्याचे सूत्र राहणार असल्याने माणसामाणसांत थेट-प्रत्यक्ष संपर्क न राहताही व्हर्चुअल भेटीगाठीतून कामांची आखणी, विभागणी करता येईल असाही एक फायदा सांगितला जातो. थोडक्यात, आजवरची जगरहाटी किमान वेळात पूर्णपणे उलटी फिरवावी लागेल. ते संपूर्ण साध्य होईल तेव्हा हे फायदे थोडेफार पदरात पडण्यास सुरुवात होईल.
हा झाला बुद्धिजीवी वर्गाच्या भविष्यातील कार्यसंस्कृतीचा ढोबळ विचार. हे चित्र अगदीच निराशादायी नाही असे वाटून या वर्गाची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी काहीशी सकारात्मक राहील यात शंका नाही. याचे दुसरे कारण असे असेल, की, याच नवकार्यसंस्कृतीमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांचा विचार करण्याची सध्याच्या नकारात्मक काळात कोणाचीच तयारी नाही. ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’ हे आजपर्यंतच्या हजारो वर्षांचे वास्तव एका फटकाऱ्यात पुसून टाकावे लागेल अशी ही भविष्यातील स्थिती पचविणे मानसिकदृष्ट्या माणसाला किती सोपे राहील याचा विचार सध्या करणे योग्य नाही, त्यामुळे सध्या फायद्यांची चर्चा सहाजिक आहे. पण, बुद्धिजीवी वर्गापलीकडच्या, श्रमजीवी वर्गास नवसंस्कृतीच्या दडपणापोटी किंवा अपरिहार्यतेपोटी घरातच बंद करून घेणे परवडणारेही नाही, आणि ते शक्यही नाही. ‘हातावरचे पोट’ हीदेखील समाजाचीच कार्यसंस्कृती आहे. करोनोत्तर काळात, संचार आणि परस्परांतील थेट संपर्क व संवादावर कमालीचे निर्बंध येतील, तर श्रमजीवी वर्गाचे भविष्य काय असेल याचा विचार करून आखणीपूर्वक या वर्गाचे जगणे आश्वस्त करणे हे भीषण आव्हान असेल. बुद्धीजीवी वर्गाकडील संपत्तीचे व्यवहारात चलनवलन होते, त्यावर अर्थव्यवस्थेची गती बऱ्याचशा प्रमाणात स्थिर राहते. घरात बसून काम करणाऱ्या या वर्गाच्या गरजा मर्यादित झाल्या, तर मुख्यत्वे त्यांच्यासाठी निर्माण कराव्या सुविधांच्या गरजाही कमी होतील, आणि विकास म्हणून आज ज्या गोष्टींचे नियोजन केले जाते त्यांना प्रचंड प्रमाणात खीळ बसेल. उदाहरणार्थ, कोणत्याही कार्यालयांकरिता विशिष्ट परिसरांतील ऐसपैस जागांची गरज मर्यादित होईल. त्यांचे इंटिरीयर, कामाच्या सुविधांवर होणारा खर्च, आदी बाबी ‘गरजा’ राहणार नाहीत, आणि ‘मोक्याच्या जागा’ची किंमत कवडीमोल होऊन जाईल. कोट्यवधींची गुंतवणूक करोनोत्तर काळात केवळ निरुपयोगी होऊ शकेल. सहाजिकच, या गुंतवणुकीच्या अनुषंगाने हातावर पोट असणाऱ्या ज्या वर्गास रोजगार मिळत असतो, त्यालाच फटका बसेल. असंघटित श्रमिकासाठी तो वाईट काळ असेल.
पायाभूत सुविधांमध्ये दिवसागणिक भर टाकूनही त्या अपुऱ्या पडाव्यात अशी कालपर्यंतची स्थिती होती. मनोरंजन, प्रवास, पर्यटन, अशा क्षेत्रांशी संबंधित सुविधांचे व त्यावर थेट किंवा अप्रत्यक्ष  अवलंबून असणाऱ्यांचे भविष्य काय असेल याचाही विचार करावा लागेलच!
केवळ सेवाक्षेत्रे तग धरतील तर तेवढे पुरेसे नाही, असा याचा अर्थ आहे. करोनोत्तर काळातील मन:स्थिती हाही एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे माणसाचे जगणे आनंदी व समाधानी होत असते. भविष्यातील नवी जीवनशैली तो आनंद वा ते समाधान देण्यास व पर्यायाने जगण्यातील रस कायम ठेवण्यास पुरेशी पडणार नसेल, तर त्यासाठीच्या नव्या पर्यायांचाही व त्यातून निर्माण करावयाच्या उपजीविकेच्या संधींचाही विचार व्हायला हवा.
माझे भविष्यातील नियोजन आणि अचानक बदललेला वर्तमानकाळ यांवर विचार करत असताना भविष्यातील कार्यसंस्कृतीशी जुळवून घेण्याच्या शक्यता खडतर आहेत असे वाटू लागले. कारण, आज, आत्ताच बुद्धीजीवी वर्गात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांवरच अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे, आणि पर्यायी मार्ग देखील आक्रसत चालले आहेत.
पत्रकारितेच्या क्षेत्राचे भविष्यचक्र तर पुरते उलटे होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. अनेकांच्या हाती नारळ दिले गेले आहेत, तर अनेकजण, केव्हाही नारळ मिळेल या भीतीने धास्तावले आहेत. कदाचित या क्षेत्राचीही भविष्यातील सामाजिक मागणी कमी होईल, व इथल्या रोजगाराला त्याचा फटका बसेल. लिहित्या हातांची मागणी मर्यादित होईलच, पण या क्षेत्रातील श्रमिकांचीही गरज मर्यादित होईल.
अशा स्थितीत, ‘एकाच नावेतून प्रवास करणाऱ्या’ सर्वांनी, सुरक्षिततेचे नियम पाळून, एकमेकांना मदतीचा हात आणि साथ देत तरंगत राहण्याची माणुसकी जिवंत ठेवणे हाच एकमेव मार्ग राहील. तो अवलंबिणे हा ‘परमार्थ’!
भविष्यातील जीवनशैलीत, ‘परमार्थ’ हा परवलीचा शब्द व्हायला हवा!
ही अगदी ढोबळ मांडणी आहे, पण तसे होईल काय, या प्रश्नाचे ठामपणे होकारार्थी उत्तरच मिळेल असे वाटण्याजोगी परिस्थिती मात्र, अजूनही उगवलेली दिसत नाही!

No comments: