Friday, November 5, 2021

मन देवाचा आहेर...

माणसाच्या प्रत्येक कृतीला विवेकाचे भान असले पाहिजे असे मानतात. कारण विवेकी विचाराचे नाते मनाशी असते. मन हा माणसाचा अजोड असा अदृश्य अवयव आहे. वाढत्या वयाचा आणि शारीरिक किंवा मानसिक वयाचा काही संबंध नसतो. जन्माला आल्या दिवसापासून वय वाढतच असतं. असं वय एका टप्प्याशी येऊन पोहोचलं, की नोकरदार माणूस ‘रिटायर’ होतो. नोकरीधंद्याच्या या काळात, नोकरी लागल्यानंतरची काही वर्षे, ‘किती वर्षे नोकरी झाली’ याचा हिशेब मांडला जातो. वय वाढू लागले, की, नोकरीची ‘किती वर्षे राहिली’, रिटायर कधी होणार याची गणितं करता करता दिवस पुढे सरकू लागतात. पुढे तो दिवस उजाडतो. नोकरीतून निवृत्त झालं, की रिटायर होऊन किती दिवस, महिने, वर्षे झाली याची गणती सुरू होते. असे हिशेब सुरू झाले, की ‘म्हातारपण’ आलं, असं म्हणतात. पण शरीराच्या या अवस्थेसोबत मनानेही त्या टप्प्यांचा हिशेब करत म्हातारपण मिरवायलाच हवे असे नाही. ज्यांची मने वाढत्या वयातही टवटवीत असतात, त्यांच्या शरीरावर, चेहऱ्यावर म्हातारपणाच्या कितीही सुरकुत्या दिसल्या, तरी मनावर तशी एकही रेषा उमटत नाही. अशा टवटवीत मनांचा एक विरंगुळा असतो. ‘स्मरणरंजन’!... तसेही प्रत्येकासच, वयाच्या कोणत्याही अवस्थेत स्मरणरंजन आवडतच असते. वर्तमानकाळात दिसणारे, अनुभवास येणारे अनेक प्रसंग नकळत भूतकाळात घेऊन जातात, आणि भूतकाळातील त्या प्रसंगाच्या हरवत चाललेल्या आठवणींना उजाळा मिळतो. हा उजाळा म्हणजे, कोमेजत्या मनाला टवटवी देणारा एक सुखद शिडकावा असतोच, पण कधीकधी त्या आठवणींच्या धाग्यांची एक सुंदर गुंफण करून नव्या पिढीला अविश्वसनीय वाटतील अशा कितीतरी कहाण्याही जन्म घेतात. त्याच्या नवलाईने नवी पिढीही हरखून जाऊ लागली, की गेल्या दिवसांच्या आनंदापासून पारखे झाल्याची हुरहूर छळू लागते. गेल्या काही वर्षांत, वयामुळे ज्येष्ठत्वाकडे जाऊ लागलेल्या पिढीच्या मनावर अशा हरवलेल्या भूतकाळाच्या आठवणींची दाटी अधिकच वाढू लागली आहे. भूतकाळात जे जे काही वेगळे अनुभवले, त्याची नवी रूपे पाहताना काहीतरी हरवत असल्याची खंत उमटू लागली आहे. हे एक सार्वत्रिक दुखणे होऊ पाहात आहे. व्यापारीकरणाचा प्रचंड प्रभाव हे बहुधा त्याचे कारण असावे. म्हणूनच, नव्या दमाने दर वर्षी येणाऱ्या दिवाळीतले जुने दिवस शोधण्याची एक केविलवाणी कसरत आजही अनेकजण करताना दिसतात. ‘आमच्या वेळची दिवाळी’... हा त्यांच्या भूतकाळ शोधण्याच्या प्रयत्नांचा धागा होऊन जातो, आणि नव्या दिवाळीशी जुन्या दिवाळीची सांगड घालत, निराश उसासे टाकले जातात. सणासुदीच्या प्रत्येक दिवसाचे ‘इव्हेन्टीकरण’ करणे हा धंदा वाढला, तेव्हापासून भूतकाळातल्या सणासुदीच्या आठवणींमध्ये रमण्याची, त्या स्मरणरंजनाची सवय वाढू लागली. लोकांच्या हाती खेळणारा पैसा चलनवलनात आणण्यासाठी किंवा काहीही करून सण साजरे करण्याच्या सवयी नेमक्या हेरून बाजारपेठांनी सणांना उत्सवाचे रूप दिले, आणि प्रत्येक सण हा ‘बाजारकेंद्रीत’ होऊ लागला. जी पिढी आज स्मरणरंजनात रमते, त्या पिढीच्या पूर्वरंगाच्या काळात, नवे कपडे, घरांना रंगरंगोटी, गोडधोडाचे पदार्थ, या गोष्टींना सणापुरते निमित्त असायचे. त्यामुळे त्या सणाला वेगळेपणाची झळाळी होती. आता नवे कपडे घेण्यासाठी सणाचे निमित्त गरजेचे राहिलेले नाही, आणि घरात गोडधोड पदार्थ करण्याची गरज बाजारपेठांनीच संपवून टाकली आहे. त्यामुळे, आता सणाचा उत्साह बाजारपेठांमधील गर्दीवरून मोजला जाऊ लागला. गर्दीने फुलणाऱ्या बाजारपेठा हे सणांच्या उत्साहाचे मोजमाप झाले, आणि घरातल्या खरेदीची रेलचेल हा आनंदाचा मापदंड ठरला. सण म्हणजे इव्हेन्ट झाले, आणि बाजारांनी सणांवर कब्जा केला.

असे झाले, की मन काम करू लागते. मनाचे वेगळेपण म्हणजे, भूतकाळाशीच त्याचे नाते अधिक जवळीकीचे असते. कोणत्याही क्षणी आठवणीतली कितीही मागच्या भूतकाळात पोहोचण्यासाठी मनाला क्षणार्धाचा अवधीदेखील पुरेसा होतो. याच मनाचे एक दुबळेपणही असते. भविष्याचा तंतोतंत वेध घेण्याची शक्ती मात्र मनाला मिळालेली नाही. तसे झाले असते, तर भूतकाळात रमण्याची मजाच संपून गेली असती, आणि भविष्याच्या काळजीनेच असंख्य मने पोखरली जात राहिली असती. मन, माणूस आणि निसर्ग यांच्या या आगळ्या नात्यामुळे माणसाचा भूतकाळ वर्तमानकाळातही आपली अशी एक जागा राखून राहिला आहे. विचारांचा आवेग आणि मनाचा वेग यांची सांगड घालायची सवय लागली, की वाढत्या वयाचा वेग ही समस्या राहात नाही. म्हणून मन जपले पाहिजे. आठवणींच्या अदृश्य कप्प्यात शिरण्याची अभूतपूर्व क्षमता त्याच्याकडेच असते. मन हा देवाने माणसाला दिलेला मौल्यवान आहेर आहे. मन हे विचारांचे घर, आणि कृतीचे आगर आहे, मन हा अथांग सागर आहे, मन हा देहाचा आरसा आहे. तो स्नेहाचा वारसाही आहे. कधीकधी मन अनावर होते, कधीकधी गरीब पामर होते, कधी मुकाट बसते, तर कधी मोकाट सुटते..

No comments: