Friday, November 26, 2021

उबविलेल्या अंड्याची गोष्ट...

काटक्या गोळा करून बांधलेलं घरटं पूर्ण झालं, आणि पलीकडच्या झाडावरून कावळ्याची धावपळ न्याहाळत बसलेल्या कावळिणीने तोंडातून कर्कश्श आवाजही काढला. कावळ्याच्या तीक्ष्ण कानांनी तो टिपला. पिल्लांसाठी बनविलेल्या बेडवर कबुतरांच्या पिसांचा गालिचा अंथरून कावळ्याने फांदीवरच स्वतःभोवती एक गिरकी घेतली, आणि तो कावळिणीसमोर जाऊन बसला. कावळिणीने ते पाहिले, पण तोऱ्यात मान फिरवून ती उगीचच फुरंगटून बसली. मग कावळ्याने तिची मनधरणी केली. बऱ्याचदा काहीच कारण नसताना कावळिणीला राग यायचा, मग कावळा धावत येऊन तिची मनधरणी करायचा. हा संसार आपला दोघांचा आहे, दोघांनी मिळूनच तो चालवायला हवा, सारखा हट्टीपणा करून चालणार नाही असेही तिला समजावून सांगायचा. मग मोठ्या उपकाराच्या तोऱ्यात कावळीण संसारात पुन्हा सामील व्हायची. आता काही दिवसांनी नवीन पिल्ले जन्माला येतील, तोवर तिला कसलीही तोशीश लागू नये, असेही कावळ्याने ठरविले होते. तिचे हट्ट पूर्ण करायची त्याची तयारी असली, तरी अंडी उबविण्याचे काम तिलाच करावे लागणार आहे, हे कावळ्याला माहीत होते. कावळिणीला त्याचेच दुःख होते. याने तोऱ्यात मिरवायचे आणि आपण मात्र अंडी उबवत घरट्यात बसून राहायचे, या कल्पनेनेच कावळीण फणफणत असे. त्यामुळे घरी आल्यावर कावळिणीची समजूत काढायची, हाडकाचा तुकडा प्रेमाने तिला भरवायचा, आणि कावळीण खुश झाली की पुन्हा बाहेर पडायचे, असा कावळ्याचा दिनक्रम होता. आपला बराचसा वेळ कावळिणीची मनधरणी करण्यातच जातो, पण संसार करायचा तर आपणच थोडे सहन करायला हवे, हे त्याने ओळखले होते. म्हणूनच, आज घरटे बांधून पूर्ण झाल्यावर कावळ्याने तिच्या पंखात हलकेच चोच खुपसून तिला घरट्याच्या झाडाकडे येण्याची विनवणी केली. कावळिणीला तेच हवे होते. कावळ्याने आपल्यापुढे शेपटी टाकली, की तिला आनंद व्हायचा. आजही तिला बरे वाटले, आणि तिने त्या झाडावर झेप घेतली. फांदीवरच्या घरट्याकडे आधी दुरूनच पाहिले. बाहेरून ते ओबडधोबड दिसत असल्याने कावळिणीस ते आवडणार नाही, पण आतील सुखसोयी पाहून ती नक्कीच खुश होईल अशी कावळ्याची खात्री होती. एकदा घऱट्याभोवती गिरकी घेतली, आणि तिने आत डोकावून पाहिले. घरटे आतून सुंदर सजले होते. तिने मनातल्या मनात अंड्यांचा हिशेब केला. आपल्याला होणाऱ्या पिल्लांकरिता एवढे घरटे पुरेल ना, तेही मनात विचार करून नक्की केले, आणि कावळ्याकडे तिरक्या मानेने पाहात तिने टुणकन घरट्यात उडी मारली. कावळा सुखावला. त्याने एकदा तिच्या चोचीत चोच खुपसून आनंद व्यक्त केला, आणि तो उडाला. पण आता तिला राग आला नाही. अंडी घालण्याची वेळ जवळ आली होती. कावळिणीने घरट्यात बस्तान बसविले, आणि काही वेळातच घरट्याच्या मऊशार गादीवर चार अंडी घातली. आता पुढचे दिवस अंडी उबविण्यातच जाणार होते. पिल्ले बाहेर येईपर्यंत आता इथून हलायचे नाही, असे कावळ्यानेही तिला बजावले होते. बाहेर खूप शत्रू टपून बसलेले असतात, ते घऱट्यात घुसू शकतात, हे कावळ्याला माहीत होते. कावळिणीने मानेनेच होकार दिला, आणि अंडी उबविणे सुरू झाले. कावळीण कायम अंड्यांवर बसूनच होती. एकदा मात्र, पलीकडच्या झाडावर कावळ्यांचा कलकलाट वाढला, म्हणून तिने जागेवरूनच पाहिले. तिचा कावळोबाही कलकलाटात सामील होता. कावळिणीला काळजी वाटू लागली, आणि कावळ्यांच्या गर्दीत सामील होऊन तीही कलकलाट करू लागली. बऱ्याच दिवसांनी कलकलाट केल्याने, किती वेळ गेला ते तिला कळलेच नाही. ती भानावर आली तेव्हा तिला अंड्यांची आठवण झाली, आणि तिने झाडाकडे झेप घेतली. घरट्यात अंडी जिथल्या तिथे होती. पुन्हा अंडी उबविणे सुरू झाले. यथावकाश अंड्यातून पिल्ले बाहेर आली, आणि कावळिणीची लगबग वाढली. बाहेरून खाऊ आणून पिल्लांना भरविण्यात दिवस कधी संपतो तेच तिला कळेना झाले. पिल्ले दिवसागणिक वाढत होती. आता त्यांना पंख फुटले. आवाजही येऊ लागला. पिल्लांना उडायला शिकवायचे, असे ठरवून तिने रात्री पंखांच्या कुशीत पिल्लाना घेतले, आणि सारे कुटुंब झोपी गेले. मध्यरात्री अचानक कलकलाट सुरू झाला. पिल्लेही ओरडू लागली, आणि कावळीण चपापली. एका पिल्लाचा आवाज वेगळाच होता. आपण भलतेच अंडे उबविले हे तिच्या लक्षात आले. त्या दिवशी झाडावरच्या कलकलाटात सामील होण्यासाठी घरटे सोडले, तेवढ्यात कोकिळेने डाव साधला होता. पण आपलीच चूक होती, हे ओळखून कावळीण गप्प राहिली. आपल्या घरट्यात आपण उबविलेल्या अंड्यातली कोकिळा आता लोकांच्या कौतुकाचा विषय होणार आणि आपली पोरं मात्र कलकलत भटकत राहणार, या विचाराने कावळीण हैराण झाली. संध्याकाळी कावळा घरी आला, तेव्हा तिने कोकिळेच्या पिल्लाची गोष्ट कावळ्याला सांगितली. कावळा वरमला, आणि म्हणाला, काय करणार, आपलीच चूक होती ना... कोकिळेच्या पिल्लाने बाहेर झेप घेतली होती. पलीकडच्या झाडावरून गरट्याकडे पाहात कोकिळेने मंजुळ आवाजात कावळिणीला प्रेमाने साद घातली. कावळिणीने तिच्यावर झडप घालण्यासाठी पंख पसरले. मग कोकिळा दूर उडून गेली.

No comments: