Tuesday, November 23, 2021

मौनाची भाषा!

 


भावना व्यक्त करण्यासाठी भाषा महत्त्वाची नसते असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा आमच्या गप्पांच्या टोळक्यातला एकजण काहीच न बोलता अंतर्मुख झाल्यासारखा वाटला. तो काहीच का बोलत नाही हे पाहून मी त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव दिसत होते. माझा मुद्दा त्याला पटला असावा असे ते भाव पाहून मला वाटले, तेव्हा बाकीच्या सर्वांना गप्पांचा नवा मुद्दा मिळाला होता. आता भाषा आणि भावना यांवर गप्पा रंगणार हे मला माहीत होते. भाषा हे भावना व्यक्त करण्याचे केवळ एक साधन आहे, तिच्यासोबत भाव असतील, तर भाषेच्या माध्यमातून भावना व्यक्त करणे अधिक प्रभावी असते, असे कुणीतरी म्हणाले, आणि गप्प राहिलेल्या त्या मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताना त्याच्या मनातल्या भावना मला स्पष्टपणे वाचता आल्या. त्याला जे म्हणावयाचे होते, ते त्याने कोणतीही भाषा न वापरता, केवळ भावमुद्रेतून मांडले होते. मग मला आणखी एक मुद्दा सुचला. भाव व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज असतेच असे नाहीच, पण बोलता येण्याचीही फारशी गरज नसते. या जगात, माणूस हा बोलता येणारा बहुधा एकमेव प्राणी असावा. जसे दोन पायांवर चालता येणे हे माणसाचे एकमेव वैशिष्ट्य असते, तसे बोलता येणे हेही फक्त माणसाचेच वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. अन्य प्राण्यांना बोलता येत असले, तरी त्यांच्या बोलण्याची एक जागतिक भाषा असते. जगाच्या कोणत्याही प्रांतात गेलं, तरी गायीचे हंबरणे, कुत्र्याचे ओरडणे, सिंहाची डरकाळी किंवा सूर एकाच भाषेत आपल्या भावना व्यक्त करतात, आणि त्या प्राण्याच्या जमातीतील जगातील कोणत्याही भागातील प्राण्यास ती भाषा सहज समजते. माणसाच्या भावना मात्र, दर दहा मैलाच्या अंतरावर बदलणाऱ्या भाषेतून व्यक्त होतात. अशा वेळी, बदललेल्या भाषेतून व्यक्त होणाऱ्या भावना समजून घेण्यासाठी, आपल्याला भावमुद्रा वाचावी लागते, असे लक्षात आले, आणि जगात बोलल्या जाणाऱ्या असंख्य भाषांमध्ये आणखी एका भाषेची भर आपण घातली आहे की नाही हे शोधायचे मी ठरवले. ती भाषा म्हणजे, मौनाची भाषा’!...

या, मौनाच्या भाषेएवढी प्रभावी भाषा कोणतीच नाही, असे माझे मत आहे. मौनातून भावना व्यक्त करण्यासाठी प्रगाढ साधना करावी लागते. कारण भावना व्यक्त करण्याच्या या साधनास भाषा नसते. शिवाय, मौनातून भावना व्यक्त करण्यासाठी जेवढे कौशल्य लागते, तेवढेच कौशल्य मौनातून व्यक्त होणाऱ्या भावना वाचण्यासाठीही आवश्यक असते. ते सगळ्यांनाच साधत नसल्यामुळेच कदाचित मौनाच्या भाषेचा प्रसार मर्यादित राहिला असावा. ही भाषा फारशी कुणी वापरत नाहीत. ते बरेच आहे. उलट त्यामुळे या भाषेला वेगळे महत्त्वही आहे. म्हणूनच, काही विशिष्ट वेळी या भाषेचा वापर केला जातो. या भाषेतून बरेच काही बोलता येते, आणि  समोरच्यास ते थेट भिडते असा अनुभव जगाने घेतला आहे. त्यामुळेच विनोबाजींपासून अण्णा हजारेंपर्यंत अनेकांनी वेळोवेळी मौनाच्या भाषेतून आपले म्हणणे आग्रहीपणे मांडले, आणि ती भाषा उमगल्याने त्यांना जे म्हणावयाचे होते ते करणे संबंधितांना भाग पडले. मौनाच्या भाषेचा हा प्रभाव सिद्ध झाल्याने, विशेषतः राजकारण्यांच्या जगात ही भाषा अधिक लोकप्रिय होत गेली. कारण प्रसंग पाहून या भाषेचा वापर केल्यास तिचे तिहेरी फायदे होतात, हे या लोकांना अधिक चांगले कळले. अशा अनेक प्रसंगांत मौन पाळून महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देणे सोपे होते, हेही कळले, आणि, या मुद्द्यावर त्यांनी मौन पाळले, ही बातमीदेखील होऊ लागली. मग या पाळलेल्या मौनाचे अर्थ शोधण्याचा जो तो त्याच्या कुवतीनुसार प्रयत्न करू लागतो, आणि त्यातून आणखी नवे अर्थ निर्माण झाल्यास मौन पाळणारा गप्प राहिला, तरी समोरचे अनेकजण अनेक अर्थांनी त्या मौनावर भाष्य करणारी बडबड करू लागतात. सोयीस्कर मौन, सूचक मौन, असे मौनाचे काही प्रकार असतात. एखाद्या वादग्रस्त मुद्द्यावर भावना व्यक्त करण्यासाठी जेव्हा भाषा अडचणीची ठरते, तेव्हा सोयीस्कर मौन पाळले जाते, आणि एखाद्या महत्वाच्या परंतू न बोलणेच बरे असलेल्या मुद्द्यावर भाष्य करण्याएवजी जेव्हा शब्द अडचणीचे ठरतात, तेव्हा सूचक मौन पाले जाते. काही वेळा, राजकीय नेते पश्चात्तापाची भावना व्यक्त करण्यासाठी मौन धारण करतात, तर बऱ्याचदा मौनाला निषेधाचीही झालर लावली जाते. मौन हे अलीकडे आंदोलनाचेही साधन होऊ लागले आहे. आपल्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करूनही त्याची साधी दखलही घेतली जात नाही असे लक्षात आले, की मागण्यांसाठी संघर्ष करणारे समूह मौनव्रत आंदोलन करू लागतात. मग संबंधित यंत्रणेची तारांबळ उडते, आणि मौनातून व्यक्त होणाऱ्या भावना सर्वदूर पसरून एक दबावगटही तयार होतो. शोकभावना व्यक्त करण्यासाठी मौन पाळण्याची प्रथा तर सर्वत्रच असते.

भाषा आणि भावना या मुद्द्यावर तिकडे चर्चा रंगलेली असताना, माझ्या मनात मात्र मौनाचे रंग आकार घेऊ लागले होते. मी घरी आलो, तेव्हा वर्तमानपत्र येऊन पडले होते. मी ते उघडले, आणि पहिलीच बातमी वाचून मूक झालो. क्षणभर डोळे मिटले. हातातील वर्तमानपत्र तसेच उघडे राहिले आणि माझी नजर शून्यात कुठेतरी खिळली. ते पाहून माझ्या मुलीला शंका आली. आजही काहीतरी भयंकर घडले असणारअसे ती म्हणाली. माझ्या मौनाची भाषा व्यक्त झाली होती. नगरच्या रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने घेतलेल्या निष्पाप बळींची बातमी वाचताना माझ्या मुक्या मनात, गेल्या वर्षभरात आगीने घेतलेल्या बळींच्या आक्रोशाने रणकंदन माजविले होते. मौनाच्या भाषेला आवाज नसतो. ती शांतता असते. पण त्या शांततेचाही आवाज डोक्यात आणि मनात कल्लोळ माजवितो, हा नवा अनुभवही त्या वेळी मला आला...

No comments: