Friday, November 26, 2021

भविष्याचे अस्वस्थ वर्तमान!

 

मध्यंतरी माझ्या वाचनात एक बातमी आली. खरे म्हणजे, जवळपास दररोजच अशा बातम्या येतच असतात. पण या बातमीमुळे दररोजच्या अस्वस्थतेचा उद्रेक झाला, आणि आपल्या जगण्यापुढील हे मोठे आव्हान असूनही आपण रोजच्या चर्चांमध्ये त्यावर कधी फारसे बोलत नाही याचे मलाच आश्चर्य वाटले.

उत्तर प्रदेशातल्या कुठल्याशा गावात, एका सकाळी एक महिला फिरावयास गेली असताना रस्त्याकडेच्या एका कचरा कुंडीतून तिला एका बालकाच्या रडण्याचा केविलवाणा आवाज ऐकू आला, आणि ती कचरा कुंडीजवळ गेली. आता तो आवाज स्पष्ट झाला होता. या महिलेने कुंडीत डोकावून पाहिले. अगोदर तिला प्रचंड धक्का बसला. तिचे डोळे विस्फारले, आणि भीतीने तिने दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले. कुणाची तरी चाहूल लागल्यामुळे असेल, कचरा कुंडीतल्या त्या बाळाचं रडणं आणखीनच वाढलं होतं. मग ही महिला भानावर आली. कदाचित, तिच्यातली आई जागी झाली, आणि कचरा कुंडीत हात घालून त्या बाळाला अलगद उचलले. कुशीत घेतले. दुपट्यात व्यवस्थित गुंडाळलेल्या त्या बाळाने एकदा किलकिल्या नजरेनं त्या आईकडे पाहिले, आणि त्या क्षणी त्याचे रडणेही थांबले. एक गोंडस, गुटगुटीत पण दुर्दैवी जीव त्या क्षणी एका अनामिक मातेच्या कुशीत विसावला होता...

या बाळाचे करायचे काय, हा प्रश्न आता त्या मातेला पडू लागला होता. तरीही तिला ते बाळ पुन्हा कचरा कुंडीत फेकायचे नव्हते. तिने त्याला घरी आणून पोटभर दूध पाजले. भूक भागताच ते काही वेळातच शांत झोपले. पण ते बाळ बेवारस असल्याने त्याची खबर पोलिसांना द्यायला हवी, असे घरातील सर्वांनी सांगितल्याने तिने जड मनाने ते बाळ उचलले, आणि पोलीस ठाण्यात नेऊन दाखल केले. पुढच्या काही तासांतच ही बातमी गावात पसरली. कचरा कुंडीत फेकलेले एक बाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे हे कळताच अनेकजण ते बाळ पाहण्यासाठी गर्दी करू लागले. कचरा कुंडीत फेकले असले, तरी ते बाळ गोंडस होते. गुटगुटीत होते, आणि आसपासच्या जगाची ओळख नसल्याने, आपल्या नवख्या आणि अनोळखी आईच्या मायेचा स्पर्श झाल्याने सुखावून शांतपणे पहुडलेले होते. अनेकांना त्या बाळाला दत्तक घेण्याची इच्छा झाली. पण एखादे बेवारस मूल कुणाकडेही संगोपनासाठी सोपविण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात... ज्या महिलेला ते बाळ सापडले होते, तिने ते पोलिसांच्या हवाली केले, आणि ती जड मनाने घरी परतली...

ही बातमी इथे संपली. आता ती बातमी हा एक भौतिक भूतकाळ झाला आहे. पण खरे तर, ती एका भविष्याची सुरुवात आहे. भारताच्या भावी पिढीच्या एका धाग्याच्या भविष्याची सुरुवात.... अत्याचार, आईबापाविना जगताना जगण्याचा संघर्ष करणारी बालके, समाज ज्या कृत्याला गुन्हा समजतो, जे कृत्य करणे समाजाच्या दृष्टीने बेकायदा असते ती कृत्ये हेच ज्यांचे जगण्याचे साधन असते, अशी रस्त्यावर जन्मलेली, आणि रस्त्यावरच वाढणारी बेवारशी मुले, समाजातील विकृतींची शिक्षा भोगणारी मुले, कोणाच्या तरी चुकीची फळे भोगणारी, कुणा गुन्हेगारी टोळ्यांच्या संघटित धंद्यापायी अपंगत्वाचे ओझे वाहणारी मुले, अशी अनेक रूपे वेगवेगळ्या वेळी वाचलेल्या, ऐकलेल्या बातम्यांमधून समोर येऊ लागली, आणि ही बेचैनी आणखीनच वाढली...

देशाची भावी पिढी म्हणून ज्या पिढीकडे आपण पाहतो, त्या पिढीच्या वर्तमानाचा हा सुन्न करणारा कोपरा मला दिसू लागला. त्याला अनेक कंगोरे आहेत. सामाजिक समजुती, प्रथा, आर्थिक समस्या, चिंता, अशा अनेक बाजूंनी या समस्येला वेढले आहे, हे लक्षात आले. आपल्याच आसपासची स्थिती काय आहे हे पाहावयाचे मी ठरविले... मनाशीच थोडा आढावा घेत असताना, आणखी एक बातमी मला आठवली. ती वाचल्यावर काही प्रश्नही मनात उभे राहिले होते. म्हणून, बातमीची दुसरी बाजूही पाहायला हवी असा विचार मनात घोळू लागला. दत्तक विधानांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर अशी काहीशी ती बातमी होती. देश विदेशातील असंख्य दाम्पत्ये, स्वतःचे मूल नसल्याने अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्यासाठी आसुसलेले असतात.  अशा अनेक अभागी अनाथांना अशी मायेची सावली सापडली आहे, आणि त्यांचे भरकटलेले भविष्य स्थिरावलेदेखील आहे. पण, महाराष्ट्राला एक मोठी समस्या भीषणपणे भेडसावत आहे. दत्तक प्रकरणांत महाराष्ट्र आघाडीवर आहे, आणि महाराष्ट्रातील मुलींना दत्तक घेण्यासाठी पालक पुढे सरसावत आहेत, हे बदलत्या जाणीवांचे चांगले लक्षण असले, तरी महाराष्ट्रात बेवारस, अनाथ मुली आजही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, ही या चांगल्या बातमीची अस्वस्थ करणारी किनार आहे, असे मला वाटू लागले.

गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्रातील अनाथ, सोडून दिलेल्या किंवा बेवारस मुलांची संख्या देशातील अन्य राज्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे, असे काही अधिकृत आकडेवारीवरून दिसते. हे चित्र राज्यातील कौटुंबिक किंवा सामाजिक व्यवस्थेतील मुलींच्या आजच्या स्थितीचे – आणि मानसिकतेचेही- दर्शन घडविते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अनाथालयांची संख्याही मोठी असून तेथे मोठ्या प्रमाणावर मुले-मुली दत्तक घेण्यासाठी उपलब्ध असतात, असे या आकडेवारीवरून दिसते. या राज्यातून सर्वाधिक मुले दत्तक घेतली जातात, म्हणजे, या राज्यात दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनाथ, बेवारस, टाकून दिलेल्या मुलामुलींची संख्यादेखील सर्वाधिक आहे, असा याचा दुसरा, अस्वस्थ करणारा अर्थ!


देशाच्या कोणत्याही अनाथालयांतून दत्तक दिल्या गेलेल्या मुलामुलींपेक्षा महाराष्ट्रातून दत्तक दिल्या जाणाऱ्या बालकांची संख्या सातत्याने सर्वाधिक राहिली आहे, आणि त्यामध्येही मुलींची संख्या सर्वाधिक आहे. मुलांना दत्तक देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहेच, पण त्यातही, महाराष्ट्रातून सर्वाधिक मुली दत्तक घेतल्या जातात, असे या आकडेवारीवरून स्पष्ट होत असेल, तर ती महाराष्ट्राने अभिमानाने पाठ थोपटून घ्यावी अशी बाब नक्कीच नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक मुली बेवारशी होत आहेत, अनाथ होत आहेत, आणि आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी प्रेमळ पालकांच्या शोधात आहेत, हे चित्र विषण्ण करणारे आहे.

देशात मुलींना दत्तक घेण्याची मानसिकता वाढत असून मुलींचा सांभाळ करण्याची संस्कृती समाजात समाधानकारकपणे रुजत आहे, हे एक दिलासादायक वास्तव असले, तरी आजही मोठ्या प्रमाणात मुलींना पालकांच्या शोधात बेवारसपणे दिवस काढावे लागतात, ही या वास्तवाची दुखरी बाजू आहे. म्हणूनच, मुलांना दत्तक देण्यात महाराष्ट्राची आघाडी ही बातमी समाधानाची की चिंतेची याचा गांभीर्याने विचार करावयास हवा...

अंधारमय भविष्यात चाचपडणाऱ्या नवजात मुलींना मायेची पाखर शोधत अनाथालयात दिवस काढण्याची वेळ येणे दुर्दैवी तर आहेच, पण महाराष्ट्र त्यामध्ये आघाडीवर असणे हे त्याहूनही दुर्दैवी आहे.

No comments: