Sunday, December 19, 2021

'उंच' आणि 'मोठा'!

 मला डोंगर, पर्वत आवडतात. लहानपणी, तरुणपणी आमच्या गावाच्या आसपासच्या कित्येक डोंगरांवर मी पायपीट केली आहे. ते नुसते डोंगर नाहीत. पर्वत आहेत. एका बाजूला निळाशार, अथांग पसरलेल्या समुद्राच्या लाटा छाताडावर झेलणारा पर्वत. कोकणातल्या सह्याद्रीच्या कडेकपारी आणि दऱ्याखोरी पायाखालून घालत पार शिखर गाठलं, की खाली चारही बाजूंना दिसणाऱ्या घनदाट जंगलातून जमिनीचा तांबडा तुकडा शोधावा लागायचा तेव्हा! ज्या जमिनीवरून चालताना डोक्यावरचं जे झाड महावृक्ष वाटायचं, ते झाड पर्वताच्या शिखरावरून न्याहाळताना हिरवळीतल्या गवताच्या पात्याएवढं दिसलं की उगीचच, शिखरावर उभे राहिलेले आपण खूप ग्रेट, भारी वगैरे आहोत असं वाटायला लागायचं, आणि पर्वत उतरून पाय रोजच्या जमिनीवर आले की मन भानावर यायचं. म्हणून, मला पर्वताच्या शिखरांवर चढायचा कंटाळा यायला लागला. मग मी पर्वताचे पायथे शोधू लागलो. आख्ख्या पर्वतावरून रोरावत उतरत, दगडाधोंड्यांवर वेड्यागत आदळत, धसमुसळेपणा करत पायथ्याकडे झेपावण्याचं वेड प्रपातांना का असतं ते उमगू लागलं.

कारण, पर्वताचा भव्यपणा पायथ्यावरूनच जाणवतो. शिखरावर उभं राहून खालच कस्पटासमान दिसणारं दृश्य न्याहाळताना, आपणास आपलं वाटणारं आभासी मोठेपण पायथ्यावर उभे राहून मान वर करताच गळून पडतं, आणि भव्यतेच्या पायाशी उभे राहिल्याने, आपण किती ‘कस्पट’ आहोत हे लक्षात येतं.आमच्या देवरुखजवळ बामणोली, मार्लेश्वर, अशा जागी गेलं, की भिंतीसारखे सरळसोट, आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे काळे पहाडी कडे आपल्याला आपली ओळख करून देतात, आणि या व्यापक विश्वातल्या किड्यामुंगीएवढीच आपली उंची आहे याची जाणीव जिवंत होऊन त्या पर्वतापुढे विनम्रपणे मान झुकते.

… म्हणून मला पर्वत आवडतात!!
Vijayk

No comments: