Thursday, December 16, 2021

विकासाचा अनुशेष

 समाजाचा मानसिक विकास असा शब्द दिसला की मनात वेगवेगळे विचार येतात. मुळात विकास म्हटले की आपल्या नजरेसमोर रस्ते, वीज, पाणी, धऱणे, उड्डाण पूल, रेल्वे, कारखाने आणि रोजगार देणाऱ्या यंत्रणांची निर्मिती असे सर्वसाधारण चित्र असताना, मानसिक विकासाच्या अंगाने विचार करणे हे मने जिवंत आणि सक्रिय असण्याचे लक्षण आहे असा विचार मनात येतो. काल काशी विश्वेश्वरधाम प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचे भाषण ऐकत मी खिडकीत बसलो होतो. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक नाला आहे. कधीकाळी ती नदी, खाडी असावी एवढे ऐसपैस पात्र आहे त्याचे. आम्ही या घरात राहायला आलो, तेव्हा ती वाहती नदीच होती. थंडीच्या दिवसांत पहाटे त्या पात्रातील पाण्यावर वाफांची वर्तुळे नृत्य करायची, आणि काठावर ध्यान करून बसलेले बगळे अचानक पाण्यात चोची बुडवून एखादा मासा गट्टम करायची. सकाळी उठून खिडकीबाहेर पाहिल्यावर दिसणाऱ्या या दृश्याला भुलून आम्ही हे घर घेतलं, तेव्हा भविष्याची जरादेखील शंका मनात डोकावली नव्हती. आता त्या नाल्यातून रसायनमिश्रित काळे पाणी वाहते. आता काठावर बगळे नाहीत, कावळे कलकलाट करत असतात. भरतीची वेळ सोडली, तर त्या नाल्यातलं ते प्रदूषित रसायन एकाच जागी संथ साचल्यागत स्वस्थ असतं. कधीतरी एखादा डंपर येतो, आणि त्या काळ्या पाण्यात ट्रकभर कचरा ओतला जातो. कुणीतरी रस्त्यावरून जाताजाता पुलावर थांबून कचरा किंवा टाकाऊ वस्तूंनी भरलेली प्लास्टिकची पिशवी फेकतं.  त्या संथ साचलेपणात थोडीशी खळबळ माजते. काही क्षण नाला ढवळला जातो, आणि पुन्हा साचलेलं काळं पाणी संथ होऊ लागतं. कचरा आणि टाकाऊ वस्तूंचे ढिगारे माजले की, ते काळं पाणी संकोचून काठाकडचा कोपऱ्यात जमा होऊ लागतं, तोवर पावसाळ्याची चाहूल सुरू होते. मग महापालिका नालेसफाई वगैरे कार्यक्रम हाती घेते आणि मोठमोठी पोकलेनसारखी यंत्रे काठावर धडधडू लागता. काळं पाणी ढवळून निघतं. आधी टाकलेला कचरा उचलण्याचा कार्यक्रम घाईघाईने पार पाडून गाड्या निघून जातात, आणि काळं पाणी उरलेला कचरा कवटाळत पुन्हा जागच्या जागी साचून स्वस्थ बसतं.

पंतप्रधानांचं भाषण ऐकताना खिडकीतून पुन्हा माझी नजर त्या नाल्यात साचलेल्या काळ्या पाण्यावर पडली. आता पाण्याचे कोणतेच गुण त्याच्या अंगी राहिलेले नाहीत. त्यामध्ये मासा शोधूनही सापडणार नाही, पण त्याच्या तेलकट तवंगावर किडे वळवळताना दिसतात. उन्हाची किरणं त्या तवंगावर पडली, की वळवळणाऱ्या किड्यांच्या हालचालींनी नाला अस्वस्थ चुळबुळताना दिसतो. कदाचित त्यातल्या रसायनालादेखील एकाच जागी साचल्याचा कंटाळा येत असावा...  

पंतप्रधाधानांच्या भाषणातील स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख कानावर पडला, तेव्हा मी किड्यांच्या वळवळण्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्या काळ्या डबक्याकडे पाहात होतो. मला अलीकडे ते पाहताना आनंद वगैरे होत नाही. आता तो नाला पुन्हा पहिल्यासारखा नदी होऊन नितळ पाण्याने वाहू लागणार नाही, याची मला पुरती खात्री असल्याने, नाल्याचे वास्तव मी मान्य केले आहे. नदीचा नाला होऊन पाण्याची जागा रसायनमिश्रित द्रवपदार्थांनी घेतली हा त्या नाल्याचा नव्हे, तर माणसाचाच दोष आहे, हे माहीत असूनही आपल्याला लाज का वाटली नाही असा विचारही मनात आला. त्याच वेळी स्वच्छ भारत मोहिमेचे काहीसे हसू देखील आले. स्वच्छता हा कोट्यवधी रुपये खर्चाचा सरकारी कार्यक्रम करावा लागतो, हा मानसिक विकासाच्या अनुशेषाचाच परिणाम आहे, हेही जाणवले, आणि विचार करत करत मन मागे गेले.

मुंबईच्या मध्यावरून मिठी नदी वाहते. तिला अजूनही नदी म्हणत असले, तरी तो आता असाच एक नाला  आहे. रसायनमिश्रित द्रवपदार्थ, कचरा आणि टाकाऊ म्हणून नकोसे झालेल्या झालेल्या असंख्य वस्तू पोटात घेणारे ते हक्काचे ठिकाण झाले आहे. मागे काही महिन्यांपूर्वी, मुंबईत वाझे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावर खंडणीवसुली प्रकरणी कारवाई सुरू झाल्यावर तर, या मिठीच्या पोटातून संगणक आणि महत्वाची माहिती असलेल्या हार्ड डिस्कस् देखील बाहेर काढल्या गेल्या होत्या. असंख्य गुन्ह्यांचे पुरावेदेखी या नाल्याच्या पोटात गडप झाले असल्याची वदंता आहे. तरीही पश्चिम उपनगरांतील अनेकजण उपनगरी गाड्यांतून येजा करताना सोबतच्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य वगैरे वस्तू गाडी पुलावर आली की भक्तिभावाने मिठी नदीत फेकतात, आणि नमस्कारही करतात. हेही मानसिकतेचेच एक रूप असते.

ते भाषण ऐकताना, स्वच्छ भारताच्या मुद्द्यापाठोपाठ मनात साचलेली ही काही दृश्ये जिवंत झाली, आणि स्वच्छता हे मानसिक विकासाचे पहिले लक्षण आहे, असा निष्कर्ष मी काढला. आजकाल मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी, रस्त्याकडेच्या भिंतींवर देवतांच्या वगैरे प्रतिमा रंगविल्या जातात. देवादिकांचे फोटोही लावले जातात. त्यांच्यासमोर कचरा वगैरे फेकण्याएवढा बेमुर्वतपणा माणसाच्या अंगी सरसकटपणे नसतो, असा त्यामागचा विचार असावा. पण स्वच्छतेचे महत्व सांगणाऱ्या एखाद्या होर्डींगच्या खालीच कचरापट्टी झालेलीही इथे पाहायला मिळते.

मानसिक विकासाचा अनुशेष भरून काढायला आपल्याला किती वर्षे लागणार, या विचाराने मनात काहूर माजते. पंतप्रधान मात्र, आपल्या प्रत्येक भाषणात स्वच्छ भारताचा मंत्र देतच असतात...


No comments: