Thursday, December 2, 2021

आठवण

वळच चक्कर मारून येण्यासाठी बाहेर पडलो, पायात चप्पल अडकवली. जिन्याच्या दोनतीन पायऱ्या उतरल्यावर थबकलो.

मास्क लावायला विसरलो होतो.

पुन्हा मागे आलो.
कपाटातला स्वच्छ धुतलेला मास्क काढला…
… आणि त्या क्षणी थबकलो.
मास्क हातातच होता.
मिनिटभर मास्क पाहात राहिलो, आणि मन सुन्न झालं.
मग बाहेर जायचा बेत रहित केला.
कपाटात जेवढे मास्क होते ते सगळे एकत्र केले.
ते पांढरेस्वच्छ, कापडाचे मास्कही मला उगीचच विमनस्क वाटले.
गेल्या वर्षी, मे महिन्यात या मास्कस् चं एक पार्सल टपालाने घरी आलं होतं. तेव्हा ती वरोऱ्याच्या सरकारी रुग्णालयात करोनायोद्धा म्हणून दाखल झाली होती. एकएक जीव संकटातून बाहेर काढण्यासाठी, वाचवण्यासाठी जिवावर उदार होऊन करोनाला थोपविण्यासाठी आघाडी सांभाळत होती.
तेव्हा मी बाजारातले मास्क वापरायचं बंद केलं, आणि तेव्हापासून बाहेर पडताना एक मास्क खिशात आणि एक मुखावर घेऊन वावरत राहिलो.
प्रत्येक वेळीच, मास्क तोंडावर बांधताना तिची आठवण यायची. पुढे पाचसहा महिन्यांनी त्या आठवणींचे कढ येऊ लागले.
आनंदवनातील रुग्णांना त्या केरोनाकाळात तिने स्वावलंबनाचे आणि स्वयंपूर्णतेचे अनेक धडे दिले होते.
प्रचंड प्रमाणावर मास्कनिर्मिती हा त्यातलाच एक उपक्रम होता. तिथे तयार झालेले हजारो मास्क गावोगावी रवाना झाले होते.

असंख्य स्त्रीपुरुषांना, मुलांना या मास्कमुळे करोनापासून संरक्षक कवच मिळाले होते.
असंच एकदा व्हॉटसअपवर तिचा मेसेज आला, ‘पत्ता पाठवा!’
मी पाठवला.
पुढच्या आठवडाभरात माझ्या पत्त्यावरही ते मास्क दाखल झाले.
रोज ते वापरताना ती आठवायची.
आज तेच झालं, आणि नकळत एक विषण्ण सुस्कारा बाहेर पडला.
मुंबईत आली की ती खूपदा गप्पा मारायला, भेटायला लोकसत्ताच्या ऑफिसमधे यायची.
एकदा तर वेळ होता म्हणून तिने आमच्या मुंबईच्या टीमबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या, आणि मोकळं बोलायला मिळालं म्हणून मनापासून खुश झाली…
कितीतरी गप्पांमध्ये तिने आनंदवनात फुलवलेलं आनंदवन, तिचे ते वैशिष्ट्यपूर्ण जंगल, तिथले प्रकल्प, नव्या योजना… सांगताना तिचा उत्साह ओसंडून जायचा!
नंतर कधीतरी, काहीतरी निशब्द असा एक उद्विग्न मेसेज आला. एका बातमीमुळे ती खूप दुखावली होती.
रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला, वर्तमानपत्रे टाकून शिक्षण केले, वार लावून जेवत परिस्थितीवर मात केली, गरीबीशी झगडत मोठा झाला... असे काही प्रकार एखाद्याच्या मोठेपणाला झालर लावतात. असे करत मोठी झालेल्यांना समाज अधिक आदर देतो, ही जुनीच प्रथा आहे. कुणीच मोठी व्यक्तिमत्वे यातून बचावलेली नाहीत.
उलट, महान माणसांच्या पूर्वायुष्याकडून समाजाच्या याच जणू अपेक्षा असाव्यात इतका हा प्रकार मानसिकतेत भिनलेला आहे, ते योग्य नसले तरी पुसून टाकणे सोपे नाही असे वाटते.
पुढे काही दिवसांनी, ती गेल्याचीच बातमी झाली!
आज सकाळी कुणा मित्राच्या वॉलवर तिची आठवण जिवंत झाली.
आत्ता मास्क हाती घेतला, आणि तिचा बोलका, हसरा चेहरा डोळ्यांसमोर आला.
मग डोळे भरत गेले, आणि तो चेहरा धूसर धूसर होत, गडप झाला.
एक वर्ष उलटलंय.
शीतल करजगी-आमटे आता आपल्यात नाही.

No comments: