Tuesday, August 27, 2019

योगक्षेमं वहाम्यहं...

नरीमन पाॅईंटला भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर, ‘योगक्षेम’च्या फुटपाथवर काही कुटुंबे राहातात. या कुटुंबातील महिला बहुधा फुलांचे गजरे वगैरे करून विकतात. लहान मुले, एअर इंडियासमोरच्या फुटपाथवरील खाऊ गल्लीत भेळ, वडापावच्या टपऱ्यांसमोरील गिऱ्हाईकांसमोर हात पसरून पोटभर कमावतात. बसस्टॉपवर बांधलेल्या साड्यांच्या पाळण्यात किंवा फूटपाथवरच झाडाच्या सावलीत लहान मुलांना झोपवून त्यांच्या आया दिवसा मोबाईलवरचे पिक्चर वगैरे बघत पडलेल्या दिसतात.
पुरुष काय करतात कळू शकत नाही. अंधार पडला की ही कुटुंबे आपापल्या फुटपाथवरच्या अदृश्य चौकटीतील घरात गोळा होतात. मग गप्पा, वादावादी, भांडणं आणि मारामाऱ्या अशा चढत्या क्रमाने त्यांची रात्र चढत जाते... काही कुटुंबाच्या घरात मात्र, एका पत्र्याच्या डब्यावर आडव्या ठेवलेल्या मोबाईलच्या पडद्यावर ‘पिक्चर’ सुरू असतो, आणि या ‘मिनी थियेटर’मधील महिला एकाग्रपणे तो पाहण्यात मग्न असतात.
या कुटुंबांच्या जीवनशैलीविषयी माझ्या मनात, का कोण जाणे, नेहमीच एक कुतूहल भरून राहिलंय.
त्याचं कारणही तसंच आहे.
एवढी कुटुंबे येथे कायमचे बस्तान मांडून बसलेली असली, तरी त्यांनी ठाण मांडलेल्या एकाही ‘घरा’त चूल पेटत नाही. किंबहुना, तेथे चूलच दिसत नाही. समोरच्या, जनता दलाच्या प्रदेश कार्यालयाच्या आवारात चालणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवरून जेवण विकत आणून त्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम चालतो. त्या स्टाॅलच्या चुलींवर शिजणाऱ्या अन्नाच्या दाण्या दाण्यावर या कुटुंबांचीच नावे लिहिलेली असावीत. कारण ही कुटुंबे म्हणजे या स्टाॅलची परमनंट मेंबर असावीत... समोरच कोपऱ्यावर एक सार्वजनिक शौचालयही आहे. लहान मुले बऱ्याचदा, फुटपाथवर कडेला रस्त्याकडे पाठ करून ‘बसलेली’ दिसतात. पाऊसबिऊस आला की सगळेजण बाडबिस्तरा गुंडाळून ‘योगक्षेम’च्या मुख्य दरवाजांना जोडणाऱ्या पुलाखाली गोळा होतात. पाऊस थांबला की आपापल्या अदृश्य भिंतींआडच्या घरातला संसार पुन्हा सुरू होतो.
राजकारण, श्रीमंती, करोडोंची उलाढाल करणाऱ्या उद्योगधंद्यांची काॅर्पोरेट कार्यालये आणि यांच्या विळख्यात राहूनही आपलं अस्तित्व अलिप्तपणे जपणारी ही कुटुंबे...
एकंदरीत बरे चाललेले असावे...
... ‘आकाश मंडप, पृथिवी आसन’ अशा आध्यात्मिक प्रवृत्तीने जगणाऱ्या या कुटुंबातील एक आई काल आपल्या तान्हुल्याला चहात बुडवून बिस्किट भरवताना मी पाहिलं.
पाच रुपयेवाला, निळ्या पॅकमधला, पार्ले जीसारखा कुठलासा पुडा समोर उघडून ठेवला होता...
आजही सामान्य आणि गरीब कुटुंबांतील लहान मुलांना चहासोबत बिस्किटच्या नाश्त्याचेच बाळकडू दिले जाते, हा याचा अर्थ!

No comments: