नव्या पर्वात अधिक जोमाने काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत फडणवीस यांना मित्र म्हणविणाऱ्या ठाकरे परिवाराच्या पक्षाकडून असंख्य वेळा ‘घरचे आहेर’देखील मिळत गेले. राजकारणात, मित्रपक्षाशी ‘जुळवून घेणे’ म्हणजे, मित्रपक्षांसमोर ‘गुडघे टेकणे’ असाच बऱ्याचदा अर्थ असतो. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच्या सुमारे तीन दशकांच्या युतीच्या काळात भाजपला अनेकदा हेच करावे लागले. मोठ्या भावाच्या ताठ्यात वर्षानुवर्षे वावरणाऱ्या या मित्राचे रुसवेफुगवे घालवून त्यांची मनधरणी करण्यासाठी अनेक केंद्रीय नेत्यांना मुंबईत धाव घ्यावी लागत असे. त्या इतिहासास आता अशी काही अलगद कलाटणी मिळाली आहे, की हे घडले कसे ते त्या इतिहासासही कळलेच नसावे. देवाच्या काठीचाच हा प्रताप आहे याविषय़ी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मात्र खात्री आहे. विरोधकांनाही ते कळले असेल, पण सहन होत नसले तरी सांगता येणार नाही ही त्यांचीही अडचण आहे.
Friday, January 3, 2025
‘देवा’ची काठी!
Sunday, May 14, 2023
माझी आई....
चौदा वर्षांपूर्वी, ६ डिसेंबर २००८ या दिवशी आमच्या आईने निरोप घेतला, आणि वडिलांच्या- दादांच्या- पाठोपाठ चार वर्षांनी तिनेही अज्ञाताचा प्रवास सुरू केला...
Friday, July 1, 2022
अप्रकाशित महाभारत...
सत्ता-संघटनेच्या अस्तित्वाचा संघर्ष
Friday, June 17, 2022
हिमालय आणि समुद्र
Friday, May 6, 2022
वेताळ आणि वेताळ...
दरबारात तातडीची बैठक बोलावल्यामुळे विक्रमादित्यास स्मशानात जाण्यास वेळच नव्हता. तिकडे झाडावर लोंबकळणाऱ्या प्रेताच्या मानगुटीवर बसून विक्रमादित्याची वाट पाहाणारा वेताळ वैतागून गेला. काय करावे याचा विचार करत असतानाच शेजारच्या झाडावरच्या वेताळाने त्याला हाक मारली. “कसला विचार करतो आहेस वेताळा?” असे विचारत पलीकडच्या झाडावरचा वेताळ उगीचच हसला, आणि हा वेताळ ओशाळला. “काही नाही रे, विक्रमादित्य आला तर त्याच्या खांद्यावरून निसटण्याकरिता कोणती नवी गोष्ट सांगावी याचा विचार करतोय...” वेताळ म्हणाला, आणि दोघेही नव्या गोष्टीवर विचार करू लागले. पलीकडच्या झाडावरच्या वेताळाने लगेचच गुगलवर गोष्टीचा शोध सुरू केला. पण विक्रमादित्यास सांगण्याजोगी व अडचणीचा प्रश्न विचारता येण्याजोगी गोष्ट त्याला सापडलीच नाही. अखेर वैतागून मोबाईल बंद करत असतानाच त्याच्या नजरेस एक बातमी पडली. ताबडतोब त्याने ती या वेताळासमोर धरली, आणि वेताळ खुश झाला. “ठरलं... हीच गोष्ट विक्रमादित्याला सांगायची. म्हणजे त्याला उत्तर देता येणारच नाही, आणि माहीत असूनही त्याने त्तर दिले नाही, तर आता तरी त्याच्या डोक्याची शंभर शकले होऊन त्याच्या पायाशी लोंबकळतील...” खदाखदा हसत वेताळ म्हणाला, आणि झाडावरच्या प्रेताच्या मानगुटीस विळखा घालून तो निवांत पहुडला...
Friday, April 29, 2022
भ्रमयुगाचे भविष्य...
चि. मोरूस
अनेक आशीर्वाद
अलीकडे आपला पत्रव्यवहार सुरू झाल्यापासून माझ्या
मनातील विचारांना भलतीच चालना मिळू लागली असली तरी परवा उदगीरला जे काही घडले
तेव्हापासून मनाची काहीशी चलबिचलही सुरू झाली आहे. त्या साहित्य संमेलनात
अध्यक्षांनी सांगितले की काळ मोठा कठीण आला आहे. खरे म्हणजे, लेखकाने
प्रत्येक काळात तसे सांगायचे असते अशी प्रथा असल्याचे वाचल्यावर थोडे बरेही वाटले.
पण काळ जर कठीण आला असेल तर त्यावर काही औषध शोधले पाहिजे असे मला वाटू लागले,
आणि मी विचार करू लागलो. आता सल्ले देणे बंद करायचे मी ठरविले असून,
कोणाचे सल्लेही न स्वीकारता आपले निर्णय आपणच घ्यावेत असा माझा मानस
आहे. ते काहीसे कठीण आहे याची कल्पना असल्याने, त्यावर काय
उपाय करावा असा विचार करताना मला जे काही सुचले ते तुला सांगावे असे वाटते.
मोरू, आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे
ते आधीच जाणून घेऊन त्यानुसार पुढच्या दिवसाची घडी बसविण्याची सवय ठेवावी असे
शेजारच्या अण्णांनी सांगितल्यावर, ते कसे करावे असा प्रश्न
मी त्यांना विचारला. त्यावर हसून त्यांनी वर्तमानपत्राची घडी उलगडून एका कोपऱ्यावर
बोट ठेवल्यानंतर मी बारकाईने तेथे पाहिले असता, राशीभविष्य
असा मथळा दिसल्यावर मी उत्सुकतेने वाचून काढले. अर्थात मी कोणत्या राशीचा ते मला
अजूनही नक्की ठाऊक नसल्याने मी काहीसा भ्रमितही झालो, आणि
सध्या आपण सारे भ्रमयुगात वावरत आहोत, याची आठवण झाली.
भ्रमयुगातून सावरण्यासाठी भविष्याची घडी अगोदरच नीट बसवावी असे मी ठरविले असून,
त्याआधी भविष्याची पडताळणी करण्याचा प्रयोगही करून पाहिला. तो नेमका
जमल्याने आता मी दररोज तसेच करावयाचे ठरविले आहे.
तर मोरू, पहिल्या दिवशी मला, ‘कमी पडू नका, आपले
काम साधून घ्या, त्यासाठी लेकी बोले सुने लागे करावे लागेल’ असा
सल्ला मिळाला. पण त्या दिवशी उशीर झालेला असल्याने उरलेल्या दिवसाचा वेळच कमी
पडला. त्यामुळे ते भविष्य फुकट गेले. दुसऱ्या दिवशी मात्र, सकाळीच
भविष्य पाहिले, आणि ‘वाद टाळा, कौटुंबिक
कटकटींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा’ असा सल्ला मिळाला असता, दिवसभर
मी घराबाहेर राहिलो. त्यामुळे वाद टाळता येतील असे वाटल्याने संध्याकाळी उशिरा घरी
परतल्यावर ‘दिवसभर बाहेर काय करत होता’, म्हणून घरात आगपाखड झालीच, आणि वादही
झाला. त्यामुळे भविष्य खरे ठरते असे लक्षात आले. मग भविष्य सकाळी न पाहता, रात्री निजायच्या वेळी वाचून दिवसभरात
त्यानुसार काय काय घडले त्याची मी पडताळणी घेतली. बऱ्याचदा ते खरेच निघते असे
लक्षात येऊ लागल्यावर पुन्हा सकाळी भविष्य पाहण्याचे ठरविले. भ्रमयुगातून स्वतःस
सुरक्षित ठेवायचे असेल, तर भविष्याची नेमकी दिशा आपल्याला
ठाऊक असली पाहिजे, असा निष्कर्ष मी काढला आहे. त्यामुळे,
रोजचे राशिभविष्य सकाळीच वाचून घ्यावे असे आता माझे ठाम मत आहे.
त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजे, भविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली
तर आपले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्यविद्येवर आपला विश्वास बसतो, आणि दुसरे म्हणजे, आपले त्या दिवसाचे
वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने त्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतात, त्याचे वाईट वाटत
नाही. उलट, तसे घडणार हे भविष्यातच लिहिलेले असल्याने जे घडले ते तसे घडणारच असल्याने
आपण त्या टाळूच शकलो नसतो ही भावना दृढ असल्याने परिणाम स्वीकारण्याचे धाडस
प्राप्त होते, व जे घडले त्याविषयी संभ्रम रहात नाही.
मोरू, तरीही, सावधगिरी
बाळगण्याचे मी ठरविले आहे. वैद्यकीय उपचाराबाबत आपण सेकंड ओपीनियन घेतो, त्याप्रमाणे
अन्य वर्तमानपत्रातील आपल्या राशीचे भविष्यही समोर ठेवून दिवसाच्या वागण्याची त्या भविष्यानुसार आखणी करणे आणखी चांगले असे माझे
स्वत:चे मत आहे. पण माझ्या मते भ्रमयुगातून बाहेर पडावयाचे असेल, तर एकमेकांच्या हातात हात घालूनच भविष्याची वाटचाल करणे चांगले. या पत्रात
तुला कोणताच सल्ला दिला नसल्याबद्दल तुला बरे वाटले असेल याची खात्री वाटते. पण
तुझे ‘सेकंड ओपीनियन’ विचारात घ्यावे असा विचार आहे, हे
लक्षात घे.
सल्ला न देता तुझे मत कळवशील याची खात्री आहे. कळावे,
तुझा
दादू
Wednesday, April 27, 2022
प्रभू आले मंदिरी...
डिस्क्लेमर!
Sunday, December 19, 2021
'उंच' आणि 'मोठा'!
मला डोंगर, पर्वत आवडतात. लहानपणी, तरुणपणी आमच्या गावाच्या आसपासच्या कित्येक डोंगरांवर मी पायपीट केली आहे. ते नुसते डोंगर नाहीत. पर्वत आहेत. एका बाजूला निळाशार, अथांग पसरलेल्या समुद्राच्या लाटा छाताडावर झेलणारा पर्वत. कोकणातल्या सह्याद्रीच्या कडेकपारी आणि दऱ्याखोरी पायाखालून घालत पार शिखर गाठलं, की खाली चारही बाजूंना दिसणाऱ्या घनदाट जंगलातून जमिनीचा तांबडा तुकडा शोधावा लागायचा तेव्हा! ज्या जमिनीवरून चालताना डोक्यावरचं जे झाड महावृक्ष वाटायचं, ते झाड पर्वताच्या शिखरावरून न्याहाळताना हिरवळीतल्या गवताच्या पात्याएवढं दिसलं की उगीचच, शिखरावर उभे राहिलेले आपण खूप ग्रेट, भारी वगैरे आहोत असं वाटायला लागायचं, आणि पर्वत उतरून पाय रोजच्या जमिनीवर आले की मन भानावर यायचं. म्हणून, मला पर्वताच्या शिखरांवर चढायचा कंटाळा यायला लागला. मग मी पर्वताचे पायथे शोधू लागलो. आख्ख्या पर्वतावरून रोरावत उतरत, दगडाधोंड्यांवर वेड्यागत आदळत, धसमुसळेपणा करत पायथ्याकडे झेपावण्याचं वेड प्रपातांना का असतं ते उमगू लागलं.
कारण, पर्वताचा भव्यपणा पायथ्यावरूनच जाणवतो. शिखरावर उभं राहून खालच कस्पटासमान दिसणारं दृश्य न्याहाळताना, आपणास आपलं वाटणारं आभासी मोठेपण पायथ्यावर उभे राहून मान वर करताच गळून पडतं, आणि भव्यतेच्या पायाशी उभे राहिल्याने, आपण किती ‘कस्पट’ आहोत हे लक्षात येतं.आमच्या देवरुखजवळ बामणोली, मार्लेश्वर, अशा जागी गेलं, की भिंतीसारखे सरळसोट, आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे काळे पहाडी कडे आपल्याला आपली ओळख करून देतात, आणि या व्यापक विश्वातल्या किड्यामुंगीएवढीच आपली उंची आहे याची जाणीव जिवंत होऊन त्या पर्वतापुढे विनम्रपणे मान झुकते.
Saturday, December 18, 2021
वाईन स्टेट...
कोणत्याही नव्या गोष्टींची लोकांना सवय किंवा चटक लावायची असेल, तर अगोदर त्याचे इतर सर्व पर्याय नष्ट केले पाहिजेत. काही वेळा ही नवी गोष्ट कॉम्प्लिमेंटरी म्हणून घरोघरी मोफत वाटली पाहिजे, ती वापरण्याचे किंवा अनुभवण्याचे फायदे लोकांना सांगितले पाहिजेत. (आजच आमच्याकडे बिग बास्केट किंवा अशाच काहीतरी मार्केटिंगवालांचा प्रतिनिधी सर्वे करून गेला. जाताना त्यानेही मसाला छासचे ५० मिलिचे टेट्रापॅक फुकट दिले!) तर, असे करावे लागते. वर्तमानपत्रेही खप वगैरे वाढविण्यासाठी स्कीमबीम राबवतात. पूर्वी, म्हणजे कदाचित शंभरएक वरिषांपूर्वी, आपल्या आधीच्या पिढ्याही दूध वगैरे प्यायच्या. उन्हाबिन्हातून पायपीट करून घरी आलेल्याचे स्वागत माठातल्या थंड, लोणीदार ताकाने व्हायचे. चहा आला आणि त्याने या प्रथा व्यवस्थित मोडीत काढायला सुरुवात केली. चारपाच दशकांपूर्वी आमचे एक परिचित ब्रुक बॉंडचे एजंट होते, ते घरोघरी चहाची नवी सॅम्पल म्हणून जुन्याच चहाच्या नव्या पुड्या मोफत वाटायचे. वर्तमानपत्राच्या स्कीमचा एक उद्देश असतो. स्कीममधून दहा जणांनी पेपर सुरू केला तर स्कीम संपताना त्यापैकी चारपाच जण पेपर रिटेन करतात. त्या चहाच्या मोफत सॅम्पलचाही तसाच उद्देश असायचा. दहा घरांत सॅम्पल वाटली तर दोनतीन घरांतून पाव किलो, अर्धा किलो वगैरेची ऑर्डर मिळायची. अशा तऱ्हेने त्या एजंटाने चहाच्या विक्री व्यवसायात जम बसविला होता.
Thursday, December 16, 2021
विकासाचा अनुशेष
समाजाचा मानसिक विकास असा शब्द दिसला की मनात वेगवेगळे विचार येतात. मुळात विकास म्हटले की आपल्या नजरेसमोर रस्ते, वीज, पाणी, धऱणे, उड्डाण पूल, रेल्वे, कारखाने आणि रोजगार देणाऱ्या यंत्रणांची निर्मिती असे सर्वसाधारण चित्र असताना, मानसिक विकासाच्या अंगाने विचार करणे हे मने जिवंत आणि सक्रिय असण्याचे लक्षण आहे असा विचार मनात येतो. काल काशी विश्वेश्वरधाम प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचे भाषण ऐकत मी खिडकीत बसलो होतो. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक नाला आहे. कधीकाळी ती नदी, खाडी असावी एवढे ऐसपैस पात्र आहे त्याचे. आम्ही या घरात राहायला आलो, तेव्हा ती वाहती नदीच होती. थंडीच्या दिवसांत पहाटे त्या पात्रातील पाण्यावर वाफांची वर्तुळे नृत्य करायची, आणि काठावर ध्यान करून बसलेले बगळे अचानक पाण्यात चोची बुडवून एखादा मासा गट्टम करायची. सकाळी उठून खिडकीबाहेर पाहिल्यावर दिसणाऱ्या या दृश्याला भुलून आम्ही हे घर घेतलं, तेव्हा भविष्याची जरादेखील शंका मनात डोकावली नव्हती. आता त्या नाल्यातून रसायनमिश्रित काळे पाणी वाहते. आता काठावर बगळे नाहीत, कावळे कलकलाट करत असतात. भरतीची वेळ सोडली, तर त्या नाल्यातलं ते प्रदूषित रसायन एकाच जागी संथ साचल्यागत स्वस्थ असतं. कधीतरी एखादा डंपर येतो, आणि त्या काळ्या पाण्यात ट्रकभर कचरा ओतला जातो. कुणीतरी रस्त्यावरून जाताजाता पुलावर थांबून कचरा किंवा टाकाऊ वस्तूंनी भरलेली प्लास्टिकची पिशवी फेकतं. त्या संथ साचलेपणात थोडीशी खळबळ माजते. काही क्षण नाला ढवळला जातो, आणि पुन्हा साचलेलं काळं पाणी संथ होऊ लागतं. कचरा आणि टाकाऊ वस्तूंचे ढिगारे माजले की, ते काळं पाणी संकोचून काठाकडचा कोपऱ्यात जमा होऊ लागतं, तोवर पावसाळ्याची चाहूल सुरू होते. मग महापालिका नालेसफाई वगैरे कार्यक्रम हाती घेते आणि मोठमोठी पोकलेनसारखी यंत्रे काठावर धडधडू लागता. काळं पाणी ढवळून निघतं. आधी टाकलेला कचरा उचलण्याचा कार्यक्रम घाईघाईने पार पाडून गाड्या निघून जातात, आणि काळं पाणी उरलेला कचरा कवटाळत पुन्हा जागच्या जागी साचून स्वस्थ बसतं.
पंतप्रधानांचं भाषण ऐकताना खिडकीतून पुन्हा माझी नजर त्या नाल्यात साचलेल्या काळ्या पाण्यावर पडली. आता पाण्याचे कोणतेच गुण त्याच्या अंगी राहिलेले नाहीत. त्यामध्ये मासा शोधूनही सापडणार नाही, पण त्याच्या तेलकट तवंगावर किडे वळवळताना दिसतात. उन्हाची किरणं त्या तवंगावर पडली, की वळवळणाऱ्या किड्यांच्या हालचालींनी नाला अस्वस्थ चुळबुळताना दिसतो. कदाचित त्यातल्या रसायनालादेखील एकाच जागी साचल्याचा कंटाळा येत असावा...
पंतप्रधाधानांच्या भाषणातील स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख कानावर पडला, तेव्हा मी किड्यांच्या वळवळण्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्या काळ्या डबक्याकडे पाहात होतो. मला अलीकडे ते पाहताना आनंद वगैरे होत नाही. आता तो नाला पुन्हा पहिल्यासारखा नदी होऊन नितळ पाण्याने वाहू लागणार नाही, याची मला पुरती खात्री असल्याने, नाल्याचे वास्तव मी मान्य केले आहे. नदीचा नाला होऊन पाण्याची जागा रसायनमिश्रित द्रवपदार्थांनी घेतली हा त्या नाल्याचा नव्हे, तर माणसाचाच दोष आहे, हे माहीत असूनही आपल्याला लाज का वाटली नाही असा विचारही मनात आला. त्याच वेळी स्वच्छ भारत मोहिमेचे काहीसे हसू देखील आले. स्वच्छता हा कोट्यवधी रुपये खर्चाचा सरकारी कार्यक्रम करावा लागतो, हा मानसिक विकासाच्या अनुशेषाचाच परिणाम आहे, हेही जाणवले, आणि विचार करत करत मन मागे गेले.
मुंबईच्या मध्यावरून मिठी नदी वाहते. तिला अजूनही नदी म्हणत असले, तरी तो आता असाच एक नाला आहे. रसायनमिश्रित द्रवपदार्थ, कचरा आणि टाकाऊ म्हणून नकोसे झालेल्या झालेल्या असंख्य वस्तू पोटात घेणारे ते हक्काचे ठिकाण झाले आहे. मागे काही महिन्यांपूर्वी, मुंबईत वाझे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावर खंडणीवसुली प्रकरणी कारवाई सुरू झाल्यावर तर, या मिठीच्या पोटातून संगणक आणि महत्वाची माहिती असलेल्या हार्ड डिस्कस् देखील बाहेर काढल्या गेल्या होत्या. असंख्य गुन्ह्यांचे पुरावेदेखी या नाल्याच्या पोटात गडप झाले असल्याची वदंता आहे. तरीही पश्चिम उपनगरांतील अनेकजण उपनगरी गाड्यांतून येजा करताना सोबतच्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य वगैरे वस्तू गाडी पुलावर आली की भक्तिभावाने मिठी नदीत फेकतात, आणि नमस्कारही करतात. हेही मानसिकतेचेच एक रूप असते.
ते भाषण ऐकताना, स्वच्छ भारताच्या मुद्द्यापाठोपाठ मनात साचलेली ही काही दृश्ये जिवंत झाली, आणि स्वच्छता हे मानसिक विकासाचे पहिले लक्षण आहे, असा निष्कर्ष मी काढला. आजकाल मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी, रस्त्याकडेच्या भिंतींवर देवतांच्या वगैरे प्रतिमा रंगविल्या जातात. देवादिकांचे फोटोही लावले जातात. त्यांच्यासमोर कचरा वगैरे फेकण्याएवढा बेमुर्वतपणा माणसाच्या अंगी सरसकटपणे नसतो, असा त्यामागचा विचार असावा. पण स्वच्छतेचे महत्व सांगणाऱ्या एखाद्या होर्डींगच्या खालीच कचरापट्टी झालेलीही इथे पाहायला मिळते.
मानसिक विकासाचा अनुशेष भरून काढायला आपल्याला किती वर्षे लागणार, या विचाराने मनात काहूर माजते. पंतप्रधान मात्र, आपल्या प्रत्येक भाषणात स्वच्छ भारताचा मंत्र देतच असतात...